Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 04 September , 2021

थायलंडमधील प्रवास आज संपलाये . माझी बाईक थायलंड- कंबोडियाच्या बॉर्डरवर उभी आहे. थायलंडच्या हिरव्यागार भूमीला सॅल्यूट ठोकला आणि बॉर्डर चेक पोस्टकडे निघालो. सीमेवरील कागदोपत्री सोपस्कार आटोपून कंबोडियाच्या धूळभरल्या भूमीला माझ्या बाईकचं काळंभोर टायर टेकलं.

कंबोडियाला खमेर भाषेत कंपूचीया असंही म्हणतात. ‘नॉम पेन’ ही त्याची राजधानी. थायलंड, लाओस आणि व्हिएतनाम असा शेजार राखत सुमारे एक लाख ऐंशी हजार वर्ग किलोमीटरवर कंबोडिया पसरला आहे. इथली लोकसंख्या दीड कोटीच्या घरात आहे. कंबोडिया हे बौद्ध राष्ट्र आहे, म्हणजे त्यांचा शासकीय राष्ट्रधर्म बौध्द आहे. अख्ख्या जगात भूतान आणि कंबोडिया या दोनच देशांचा राष्ट्रीय धर्म बौद्ध आहे. इथं ९७ टक्के बौद्ध धर्मीय लोकं राहतात. या देशात अल्पसंख्यांकांची संख्या तशी अत्यल्प आहे. यामध्ये व्हिएतनामी, चिनी, चाम लोकांबरोबरच ३० प्रकारच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी जमातींचा समावेश होतो. कंबोडियात घटनात्मक राजेशाही आहे. म्हणजे राजा फक्त नावालाच असतो. पण सगळे अधिकार पंतप्रधानाला असतात. साध्याचे पंतप्रधान ‘हुन सेन’ हे आग्नेय आशियातील सर्वात जास्त काळ सत्तेत असलेले आणि शाही घराण्याशी निगडित नसलेले नेते आहेत. १९८५ पासून ते सत्तेत आहेत. त्यांच्या सत्तेची गाडी गेली ३६ वर्षे अविरत पळतोय.
जमिनीवरील बॉर्डर ओलांडली. आताशा पोटातील कावळे खमेर भाषेत ओरडायला लागले आहेत. ‘काहीतरी खायला हवं’ कावळ्यांनी मागणी केली आणि त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून बाईक गल्लीतील लहानश्या रेस्टोरंटसमोर थांबवली. इमारतीच्या पुढे पत्र्याची शेड टाकून ४-५ टेबलं टाकलेली होती. बाहेरील पाठिंब्यावर टिकलेल्या सरकारसारख्या, हवेच्या जराश्या झोताने अस्थिर डोलणाऱ्या खुर्च्या, गिऱ्हाईकांची वाट पाहत होत्या. मी अस्थिर खुर्चीवर बूड टेकवत तिला स्थिर केलं आणि नाश्ता आणि कॉफीची ऑर्डर केली. नाश्ता आटोपल्यावर, बिल किती झालं असं विचारत खिशात हात घालून डॉलर बाहेर काढले. डॉलर चालेल का? मी विचारलं. डॉलर पाहून त्याचे डोळे चमकले. ‘यश सर!’ असं म्हणत त्याने डॉलरचा ताबा घेतला. कंबोडियातील चलन आहे ‘रियाल’. पण ‘रियाल’ पेक्षा इथं डॉलर जरा जास्त प्रसिद्ध चलन आहे असं दिसलं. तुमच्याकडे ‘रियाल’ नसले तरी काम अडत नाही. इथले दुकानदार डॉलर घेतात. ‘रियाल’ हे नाव मेकॉंक नदीतील ‘रिअल’ माश्यावरून हे नाव पडलंय असं लोक म्हणतात. १९७५ ते १९८० दरम्यान ‘खमेर रुश ‘ मुळे इथं चलनवलन ठप्प होतं. रियालची किंमत भारतीय रुपयापेक्षा फारच कमजोर आहे. आपला एक रुपया म्हणजे पंचावन्न रियाल. म्हणजे खिशात एक हजार रुपये असतील तर पंचावन्न हजाराचा तोरा दाखवता येतो. कंबोडियात पाऊल ठेवल्यापासून मला उगाचच श्रीमंत झाल्यासारखं वाटायलाय लागलंय.
पोटातील कावळे आता कंबोडियन भाषेत शांत बसले होते. बाईकला किक मारली आणि निघालो. नवीन देश, नवीन निसर्ग, नवीन लोकं यांचा नवीन अनुभव घेत मी आणि माझी बाईक ‘सियाम रीप’ च्या दिशेने निघालोय. रास्ता चांगला आहे. थाईलंडएवढा चकचकीत नाहीये, पण बाईकची कुरकुर नाही म्हणजे चांगलाच असणार. रस्त्याच्या दुतर्फा मोकळे शेतं दिसतायेत. महिन्याभरापूर्वीच भाताची कापणी झालेली दिसतेय. शेतभर उभे असलेले, सुकायच्या मार्गावरील भाताचे खुंट त्याची ग्वाही देत होते. इतर दक्षिणपूर्व आशियायी देशांप्रमाणेच भात हे इथलं मुख्य पीक आहे. कंबोडियात भाताच्या हजारो जाती आहेत. वर्षानुवर्षे काळी माती तुडवत कंबोडियन शेतकरी पांढरे दाणे पिकवतोय. इथं अधून मधून पडणाऱ्या दुष्काळामुळे भाताचं उत्पादन कमी व्हायचं. यावर उपाय म्हणून सरकारने, शेतकऱ्यांना भातावर अवलंबून न राहता इतर पीकाकडे वळायला सांगितलं आणि भाताला दुसऱ्या पिकांची कंपनी मिळाली.

भाताबरोबरच मका, साबुकंद, रताळे, भुईमूग, सोयाबीन, तीळ, बीन्स आणि रबर यासारखी पिकेही इथं घेतली जातात. इथं जास्त बटाटा पिकत नाही. पण इथल्या लोकांच्या जेवणात बटाटा पोहोचला. बटाट्याची चटक जिभेला लागली आणि डोक्यात बटाटा पक्का बसला. त्यामुळे बटाट्याचा खप वाढू लागला. गेल्या दशकात लोकांचा बटाटे खाण्याचा वाढलेला कल पाहून शासनाने २०१४ मध्ये, बटाटे पिकवा असं शेतकऱ्यांना सांगायला सुरवात केली.एवढच नाही तर २०१६ मध्ये बटाटा संशोधन केंद्र स्थापन केलं. दक्षिण कोरियाच्या मदतीने बटाट्यावर संशोधन सुरु केलं.
गावागावातून जातांना शेतकरी म्हशी, बैल हाकत नेतांना दिसताहेत. पशुधन येथील शेतीचा अविभाज्य भाग आहे. कंबोडियन शेतकरी पशुधन राखतो. बैल आणि म्हशींची संख्या इथं जास्त दिसतेय. अजून एक गोष्ट जाणवली, तो म्हणजे आपल्याकडे शेतीची कामं करायला बैलाचा वापर होतो, पण कंबोडियात शेतात काम करण्यासाठी म्हशीचा वापर होतो. इथला शेतकरी म्हशीसह भातशेतीत राबत असतो.
तोंडावाटे शेतीरसायन गेल्यावर विष सरळ पोटात असर करते. हे पोटविष जीवघेणं ठरते. म्हणून फवारल्यावर तंबाखू, गुटखा किंवा इतर काहीही खाऊ नये. फवारा तोंडात जाणार नाही याची काळजी घ्यावी.


प्रोटीन-कार्बोहाइड्रेडचा समतोल साधत आपल्याकडे भाताच्या कर्बोदकाला जशी वरणाच्या प्रथिनाची साथ लागते, तशीच इथं भाताला माश्याचे प्रोटीन सोबत करतं. गोड्या पाण्यातील मासेमारी इथं जुन्या काळापासून होते. मेकाँग, बासेक सारख्या मोठ्या नद्या आणि बेडूक गिळून पडलेल्या सापासारख्या आकाराचं अवाढव्य ‘तोनले साप’ तळे, ही मासेमारीसाठी महत्वाची ठिकाणं आहेत. कंबोडियाच्या प्रोटीनच्या पुरवठ्यात मत्स्यव्यवसायाचा मोठा हात आहे.
गावागावातून मुलंमाणसं शेतात जातांना दिसताहेत. इथल्या शेतीव्यवसायात मोठ्या प्रमाणात बालकामगार राबतात असा अमेरिकेचा आरोप आहे. २०१४ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय कामगार ब्युरो’ ने कंबोडियातल्या ११ मालाची यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये बालकामगारांच्या वापर केला गेला असा त्यांचा दावा होता. येथील लोकं मुलांना भाताच्या नर्सरीआधी शाळेतील नर्सरीत टाकतील असा आशावाद बाळगत पुढे जात राहिलो.
कंबोडियन लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय. बहुतांश जनता शेती किंवा शेतीशी निगडित व्यवसायात काम करते. १९८५ मध्ये ९० टक्के जिडीपी शेतीवर आधारित होता आणि ८० टक्के लोकांना शेतीतून रोजगार मिळायचा. नंतर मात्र जागतिकीकरणाच्या रेट्यात औद्योगिक क्षेत्राची वाढ होऊ लागली आणि शेतीवरील जिडीपी घसरू लागला. हाडाचा शेतकरी मात्र अजूनही खांद्यावर भाताचे आणि देशाचे ओझे वाहत शेतीत राबतोय.

कंबोडियाची भारताशी प्राचीन काळापासून नाळ जुळलीय. इथली संस्कृती आपल्याशी मिळतीजुळती आहे. या देशात फिरतांना, २५-३० वर्षांपूर्वीच्या भारतात फिरतोय असा भास होतोय. जुन्या भारतीय संस्कृतीशी संबंध दर्शवणारे, शेकडो प्राचीन मंदिरं, धार्मिक स्थळं इथं आहेत. जगातील सर्वात मोठं धार्मिक स्थळ, अंगकोरवाटचं सुप्रसिद्ध विष्णु मंदिर कंबोडियातच आहे. कधी एकदा हे पाहतो असं झालंय. बाईकचा एक्सेलरेटर पिळला आणि मला येत नसलेलं विष्णुस्त्रोत्र म्हणत अंगकोरवाटच्या विष्णुमंदिराच्या वाटेला लागलो.
………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

आपल्या मुळे ” भगवान विष्णू ” चा देश
प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष पाहता आला.
खूपच छान.आधी ॲग्रीकल्चर नंतर इतिहास हेच योग्य आहे. पुढच्या लेखात अंगकोरवाट असेल.वाट पाहतो.तिथला पुजारी विष्णुसहस्र्रनाम म्हणतो की नाही ते ही सांगा.टिळक विद्यापीठाच्या इंडॉलॉजी डिपार्टमेंट कडून वर्ल्ड हेरिटेज मधे एक प्रोग्राम कंबोडिया वर होता.मी त्याला उपस्थित होतो.तेव्हा पासूनच या देशाने माझ्या मनात घर केले आहे.पण मी इतका भाग्यवान नाही की मला त्याचे प्रत्यक्ष दर्शन घडेल.पण इतका भाग्यवान निश्चित आहे की त्याचे तंतोतंत दर्शन मला तुमच्या लेखातून घरबसल्या तेही अति रोचक शैलीत प्राप्त व्हावे.तुमचे खूप खूप आभार व धन्यवाद.