रसायनांच्या देशातील सेंद्रिय शेती

रसायनांच्या देशातील सेंद्रिय शेती post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 28 August , 2021

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

आज जेवणात थाई करी आणि भाताचा बेत आहे. पण  जेवणात म्हणावी तशी मजा येत नाहीये. गेल्या काही दिवसात, येथील रासायनिक शेतीची माहिती कळल्यापासून, प्रत्येक पदार्थात रसायनं वळवळतांना दिसताहेत. येवढा सुंदर देश रसायनांच्या विळख्यात अडकून ‘उडता थायलंड’ झाल्याचा भास होतोय. उत्पादकता आणि निर्यात वाढवायचं शिवधनुष्य उचलायच्या नादात, भरमसाठ रसायने वापरली गेली. त्यामुळे फळे आणि भाजीपाल्यात कीटकनाशकांचे बक्कळ अंश सापडू लागली. हजारो शेतकऱ्यांना दरवर्षी विषबाधा झाल्या. मी विचार करू लागलो, रसायनांचा एवढा मारा होत असतांना आणि त्याचे दुष्परिणाम दिसत असतांना ही लोकं  काहीच का करत नाहीत? या रासायनिक सापळ्यापासून वाचण्यासाठी, हा देश पावलं का उचलत नाही? या प्रश्नांचा किडा डोक्यात भुणभुण करू लागला. डोक्यातल्या या किड्याला शांत करण्याशिवाय गत्यंतर नव्हती.

थाईलँडमध्ये शेतीव्यवसाय हा देशाचा कणा आहे. बहुतांश जनता उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. इथं शेतीसाठी योग्य वातावरण असल्यामुळे, शेतमाल निर्यातदारांच्या पहिल्या दहात थायलंड आहे. सेंद्रिय शेती थायलंडला तशी नवीन नाही. १९८० पासून सेंद्रिय शेतीची चळवळ थाईलँडमध्ये सुरु झाली होती. १९८९ मध्येच इथं ‘पर्यायी शेती गट’ स्थापन झाला होता. त्यानंतर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय, आर्थिक, राजनैतिक संक्रमणातून ही पर्यावरणपूरक शेती गेली.  पण ही लोकसहभागातून निर्माण झालेली मोहीम होती. यामध्ये सरकारचा सहभाग नव्हता. शेतकरी आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र येत हे पाऊल उचललं होत. या संस्थांनीच सेंद्रिय जनजागृतीचा काम करायला सुरवात केली.

सुरवातीला येथील सेंद्रिय शेतीला सरकारचा पाठिंबा नव्हता, पण नंतर त्यांना उपरती आली आणि १९९० मध्ये सरकारने सेंद्रिय प्रमाणीकरण संस्था स्थापन करून यात उडी घेतली. पुढे अजून संशोधन करत सेंद्रिय मासेउत्पादन, पशुसंवर्धन, फळभाज्या, तृणधान्य आणि डाळी यांच्यासाठी नियमावली आणि कायदे बनवले. अजून एक पाऊल पुढे जाऊन १९९७ ते २००८ दरम्यानच्या सातव्या विकास योजनेत सेंद्रिय शेतीला स्थान दिलं.

थाईलंडमध्ये हळूहळू सेंद्रिय पिकाच्या लागवडीखालील शेती वाढत गेली. २०१३ पर्यंत ९२१८ शेतकऱ्यांनी ती ८३००० एकरवर नेली. ही प्रमाणीत सेंद्रिय शेतीची आकडेवारी आहे. इथं दोन प्रकारचे सेंद्रिय उत्पादक सापडतील. पहिले, ‘साहेब आम्ही रासायनिक खताचा एक दाणाबी टाकत नाहीत शेतात’ असं म्हणणारे स्वयंघोषित सेंद्रिय शेतकरी. पण या स्वयंघोषित सेंद्रिय मालावर ग्राहक सहजासहजी विश्वास ठेवत नाही. स्वतःच अंपायर आणि खेळाडू, असा डबलरोलवाल्या सामन्याच्या निकालावर कोण विश्वास ठेवणार? दुसऱ्या प्रकारात मात्र, आपल्या पिकाचं प्रमाणीकरण करून घेऊन, देशपरदेशात सेंद्रिय माल विकणारे उद्योजक शेतकरी आहेत. ते कायद्याची शिस्त पाळत, सेंद्रिय प्रमाणीकरण करून घेतात. ‘आमचं प्रॉडक्ट सेंद्रिय आहे’ असं पॅकेट वर छापून, उजळ माथ्याने बाजारात विकतात.  आता तुम्ही विचारालं ‘इथले सेंद्रिय शेतकरी पिकं तरी कोणती घेतात?’ तर सर्वात जास्त म्हणजे ४९००० एकरवर भाताचं साम्राज्य आहे. त्यानंतर इतर पिकांचा नंबर लागतो. या व्यवसायात लहान शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. जास्तकरून वयस्कर शेतकरी शेतात राबताना दिसतो. डोक्यातल्या शहरी हवेने तरुण पोरांना शहराकडे उडवून नेलंय. 

सेंद्रिय शेतीला सुवर्णकाळ येण्यासाठी, तीचं हवं तसं मार्केटिंग व्हायला हवं. मार्केटिंग आणि अर्थशास्त्र या दोन विषयात शेतकरी कायम कच्चा आहे. हे विषय नेहमी  ऑप्शनला टाकलेले असतात. हे हेरून थायलंडमधील काही कंपन्या पुढे आल्या. त्यांनी लहानलहान शेतकऱ्यांना एकत्र आणून गटशेती सुरु केली. शेतकऱ्यांबरोबर करार करून सेंद्रिय मार्केट विकसित करायला सुरवात केलीय. शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाबरोबरच ग्राहकजागृतीचं कामही ते करताहेत. देशभर सेंद्रिय उत्पादने वितरित करण्यासाठी यंत्रणा उभी केलीय. सेंद्रिय चहाकॉफीचं मार्केटही वाढतंय. सोशल मेडियामुळे सेंद्रिय ज्ञान तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होतेय.

त्यांनी घेतलेली मेहनतीत रंग भरतेय. पाकीट किंवा बाटलीबंद सेंद्रिय अन्नपदार्थ आणि पेय यांची ८.६ टक्के वाढ २०१९ मध्ये नोंदवली गेली. रुपयात मोजायची झाल्यास ती दीडशे कोटी एवढी भरते. थायलंडच्या लोकांमध्ये सेंद्रिय सजगता वाढलीये याची ही पावती. खासकरून लहान मुले, आजारी आणि म्हाताऱ्या माणसांसाठी सेंद्रिय खाद्यपदार्थाची मागणी वाढतेय. कमी झालेला जन्मदर आणि पालकांच्या वेळेच्या मर्यादा, यामुळे मुलांना जास्तीत जास्त सकस आहार देण्याची विचारधारा मुळ धरतेय. हे सेंद्रिय अन्नाच्या पथ्यावर पडलंय.  लहान मुलांच्या सेंद्रिय अन्नपदार्थातील वाढ तब्बल १२ टक्के एवढी आहे. म्हणजे आपल्या बाळाला रसायनविरहित अन्न खाऊ घालण्याकडे थाई मातांचा कल वाढतोय तर. इथली सेंद्रिय अन्नपदार्थांची स्थानिक बाजारपेठ २०२४ पर्यंत पूर्णपणे विकसित होईल असा विश्वास आहे.

असेंद्रिय पेयात साखर आणि ते टिकवण्यासाठी वापरलेले रसायनांमुळे, लोकांना सेंद्रिय ओढा निर्माण झाला खरा. पण त्यात म्हणावी तेवढी वाढ दिसत नाही. सेंद्रिय कॉफीच्या विक्रीत अंमळ एका टक्क्याची वाढ नोंदवली गेली खरी, पण त्याचबरोबर तिच्या किमतीतही घट झाली. सेंद्रिय पदार्थाचा खप वाढवण्यासाठी सध्या काही मर्यादा आहेत. पारंपरिक प्रॉडक्ट पेक्षा जास्त किंमत ही सेंद्रिय उत्पादनाची सर्वात मोठी मर्यादा आहे. त्यावरही इथं काम होतंय. किमती कमी कश्या होतील यासाठी प्रयत्न केले जाताहेत. सेंद्रिय अन्नाची चैन फक्त  श्रीमंत लोकांना परवडणारी आहे ही धारणा बदलण्यासाठी ते झटताहेत.

निर्यातविद्येत धंद्यात पारंगत असलेल्या थाईलंडने, सेंद्रिय मालाच्या निर्यातीला देखील सुरवात केलीय. युरोप आणि अमेरिकेत भात, डाळी, फळभाज्या, कोळंबी, मासे, हर्बल चहा, पामतेल यासारखे सेंद्रिय पदार्थ निर्यात होतेय. परंपरागत पिकाच्या मानाने ही आकडेवारी अगदीच किरकोळ आहे, पण सुरवात मात्र झालीये. सेंद्रिय निर्यातीचं हे बाळ सध्या रांगतंय, पण लवकरच ते दुडक्या चालीने का असेना पाळायला सुरवात होईल अशी आशा करूया.

थायलंड सरकारने पावलं उचलत नियम कडक केले. काही कीटकनाशकांवर बंदी घातली. त्यामध्ये ग्लायफोसेट वर देखील बंदी घालायचं ठरलं पण अमेरिकी कंपन्यांनी शासनदरबारी आपलं वजन वापरलं. अमेरिकी सरकारकडून  थाईलंडवर दबाव वाढला आणि ग्लायफोसेट बंदीचा निर्णय डब्यात बंद झाला. सरकारने ग्लायफोसेट वरील बंदी मागे घेत आपला निर्णय अन-डू केला. ‘भारतातल्या रासायनिक कीटकनाशकांच्या देशी बंदीचा बार फुसका होण्यामागे असाच परदेशी जोर असेल का?, डोक्यात शंकेची रासायनिक पाल चुकचुकली. 

इथून काहीही खरेदी न करता बाहेर पडलो. पुढे टपरी सापडली. बाईक रस्त्याच्या कडेला दाबली. तिथल्या अन्नपदार्थांवर लांबूनच एक नजर टाकली. ‘त्यात तणनाशकाचे रेणू वळवळतांना दिसताहेत का? बघ जरा, अश्या नकारात्मक, रासायनिक विचारांचे तण डोक्यात माजू लागले. ‘जाऊदे !’ असं म्हणतं, सकारात्मक विचारांचं तणनाशक मारून त्याला नष्ट केलं. जेवण ऑर्डर केलं. क्षुधाशांती केली. वरुन जठराग्नीच्या होमकुंडात स्वाःहा म्हणत कॉफीच तुप ओतलं आणि रस्त्याला लागलो.

थाईलँडमध्ये फक्त रासायनिक शेतीचाच बोलबाला नाहीये हे समजल्यावर बरं वाटलं. रसायनांच्या चिखलात सेंद्रिय कमळ फुलायला सुरवात झालीय हे पाहून सुखावलो. प्रश्नांचे भुंगे अजून शांत झाले नाहीयेत. सेंद्रिय शेतीच्या दिंडीत लहान शेतकरीच का दिसतात? मोठे शेतकरी कुठायेत? जास्तकरून वयस्कर लोकच शेती करतांना का दिसतात? शेतीव्यवसायातील तरुण कुठे गायब झालाय?  अश्या अनेक नवीन प्रश्नांच्या भुंग्यांची भुणभुण मागे लागली. मी एक्सलरेटर पिळत बाईक पिटाळली आणि त्या भुंग्यांना मागे टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागलो.  

इतके दिवस या पृथ्वीवरील स्वर्गात बाइकिंगचा आनंद लुटतोय. थाईलंडमध्ये, मी आणि माझ्या बाईकने बरेच दिवस घालवलेत. इथले सामिष-आमिष पदार्थ चाखलेत. इथल्या सुंदर निसर्गाचा मनमुराद आस्वाद घेतलाय. आकाशाचे रंग शोषून घेणाऱ्या निळ्याशार समुद्रापासून ते डोंगरदऱ्यांच्या मायाळू हिरव्या दुलईपर्यंत, निसर्गाविष्कार अनुभवलेत. पण थाईलंडमधला प्रवास आता संपत आलाय. या सुंदर देशाचा निरोप घेणं जीवावर आलंय. जड पावलाने या सौंदर्याला निरोप दिला आणि भारतीय संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या कंबोडियाकडे बाईकचं तोंड वळवलं.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “रसायनांच्या देशातील सेंद्रिय शेती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

थायलंडचं चावणारं पीकथायलंडचं चावणारं पीक

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 17 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ झिंगूर म्हणजेच क्रिकेटची चव चाखून पहिली. झिंगूर बरोबरच, बांबूतल्या अळ्या, रेशीम किड्याच्या अळ्या,

थायलंडचे साखर सम्राटथायलंडचे साखर सम्राट

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 26 Jun , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थाकसिन विद्यापीठातील चर्चा आता रंगलीय. अजून एक गरमागरम ‘ग्रीन टी’ चा कप

मलयदेशीचा मलमली प्रवासमलयदेशीचा मलमली प्रवास

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 20 November , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भारतातून निघालेली माझी बुलेट आणि मी, आता मलेशियात येऊन पोहोचलो आहोत. भारत, भूतान,