drsatilalpatil Agrowon Article जेवणाला चव आणणारी थाई शेतीं

जेवणाला चव आणणारी थाई शेतीं

जेवणाला चव आणणारी थाई शेतीं post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 07 August , 2021

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

थायलंडच्या पूर्वेकडील भागातून प्रवास सुरु आहे. सामूत सखोम प्रदेशातून माझी बाईक दिमाखात निघालीय. नाजूक थाई रस्त्याला बाईकचे टायर गुदगुल्या करत पळताहेत. राजधानीचं शहर बँगकॉकपासून हा भाग सत्तर ऐंशी किलोमीटर दूर असेल. पण वातावरणात जमीन अस्मानाचा फरक आहे. गगनचुंबी इमारती आणि चमचमत्या रात्रीचं बँकॉक वेगळं, आणि अवखळ मुलगत, डोंगरातून शिट्या घालत, नारळाच्या बागांशी सलगी करणाऱ्या वाऱ्याच्या या प्रदेशातील वातावरण वेगळं. इथला निसर्ग अगदी मनमोहक आहे. एका बाजूला हिरवेगार डोंगर, दुसऱ्या बाजूला नजर जाईल इथवर पसरलेला शांत, अथांग निळाशार समुद्र. या हिरव्या निळ्या रंगांना विभागत काळाभोर डांबरी रास्ता, बेडूक गिळून पडलेल्या सापासारखा पसरलाय. या सापाला समुद्राचं निळं पाणी गुदगुल्या करतंय. अगदी समुद्राला खेटून रास्ता निघालाय. रस्त्याच्या दुतर्फा नारळाच्या झाडांची हिरवी गर्दी आहे. हा कोण धकधकत चाललाय ? असं म्हणत, कुतूहलाने गर्दी करणाऱ्या चौकस मुलांगत, ते रस्त्यावरून जाणाऱ्या माझ्या बाईककडे वाकुन पाहताहेत.

सामूत सखोम हा अतिशय सुंदर प्रदेश आहे. समुद्र इतका शांत आणि नितळ आहे की, पाण्याखालील वाळूच्या नक्षी, भिंगातून पाहिल्यागत स्पष्ट दिसताहेत. शेदीडशे किलोमीटर रास्ता समुद्राच्या काठाकाठाने पळत राहतो. गेल्या अडीचतीन तास समुद्र नजरेआड झाला नव्हता. मीही रस्त्याचं भान ठेवत त्याच्यावर नजर ठेऊन होतो. समुद्राची वाळू छान पांढरीस्वच्छ आहे. मात्र दूर किनाऱ्यावरची वाळू जरा जास्तच पांढरी दिसतेय. तिथं वाळूचे शेकडो ढीग, प्रार्थनेला जमलेल्या मुलगत रांगेत उभे आहेत. हा काय प्रकार आहे? असं म्हणत बाईक रस्त्याच्या कडेला दाबली. साईड स्टॅन्ड लावत, तिच्यावरून पायउतार झालो आणि वाळूत जरा पुढे गेलो. अरे! हे तर मिठागर आहे. मी उत्साहात उद्गारलो.      

या रस्त्यावर जागोजागी मिठागरं आहेत. थाई मजूर खांद्यावर पांढऱ्या मिठाच्या कावडी पेलत लगबगीने काम करतांना दिसतात. जगातल्या मीठ उत्पादक देशात थायलंडचा २६ वा आहे. या यादीत चीन आणि अमेरिकेनंतर भारत तिसऱ्या नंबरवर आहे. निर्यात करण्यात एक्सपर्ट असलेल्या थाईलंडने मात्र मिठाच्या निर्यातीत माती खाल्लीय. मीठ निर्यातदारांच्या यादीत त्यांचं नाव लांबलांबपर्यंत दिसत नाही. मिठाच्या निर्यातव्यावसायात चांगली कामगिरी करत भारताने मात्र ५ वा नंबर पटकावलाय.

खाण्याचं मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड. हे जास्तकरून समुद्राच्या पाण्यातून काढतात. त्याव्यतिरिक्त तळ्याच्या पाण्यातून आणि मातीतून काढलेलं खनिज मीठही वापरलं जातं. भारतातील लोणारच्या तळ्यातले मीठ दिल्लीपर्यंत खाल्ले जायचे. हिमालयाच्या पोटातून दगडाच्या रूपाने काढलेले गेलेले हिमालय मीठ जगभरात प्रसिद्ध आहे.      

जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार एका माणसाने एका दिवसात पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. म्हणजे २ ग्रॅमपेक्षा जास्त सोडियम पोटात जाऊ नये. रक्तातील मिठाचं प्रमाण हे रक्तदाब आणि हृदयरोगाला कारणीभूत असतं. जागतिक आरोग्य संघटनेने जरी पाच ग्राम ची मिठाळ  लक्ष्मणरेषा आखून दिली असली,  तरी सध्या जगभरात सरासरी ९ ते १२ ग्राम मीठ खाल्लं जातंय. विकसित देशातील लोक, खाल्ल्या मिठाला जरा जास्त जागतांना दिसतात. त्यांच्या जेवणातील ७५ टक्के मीठ हे, प्रक्रिया केलेल्या, घराबाहेरून आणलेल्या किंवा खाल्लेल्या अन्नातून त्यांच्या पोटात जातंय हे स्पष्ट झालाय. गरीब देशातील जास्तीचं मीठ घरात बनवल्या जाणाऱ्या स्वैयंपाकात किंवा सॉस, लोणचे यात वापरलेल्या मिठातून येतंय. जभरात वर्षाकाठी २५ लाख लोकं हार्ट अटॅक आणि स्ट्रोक ने मारतात. यात मिठबळींच प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. जेवणातील मिठाचं प्रमाण ५ ग्रॅमपेक्षा कमी आणण्याचं शिवधनुष्य आपण कसं पेलतो यावर आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य अवलंबून आहे. सध्याच्या पिढीत, प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचे वाढणारे वेड पाहून, आपल्यामागे लागलेलं मिठाचं भूत एवढ्या सहज जाईल असं वाटत नाही. टीव्ही मोबाईलच्या चमचमत्या जाहिरातीतून, आपले आवडते हिरो-हिरोईन, पॅकेटबंद प्रोसेस्ड खाद्यपदार्थामधून हे खारट विष आपल्याला भरवताहेत. तरीही या आधुनिक पूतनांचा उदोउदो करत आपण त्यांच्या तालावर नाचतोय.

तसं पाहिलं तर संपूर्ण पृथ्वी हा मोठा मिठाचा गोळा आहे. पावसाच्या पाण्याने मातीतील मीठ विरघळते. मग नद्या त्याला बोट धरून समुद्रात नेऊन सोडतात. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते आणि ते मिठाला तेथेच सोडून ढगांच्या प्रवासाला निघते. ढगाला कळ लागून, हे थेंबथेंब पाणी, अजून मिठाला भुलवून समुद्रात नेतं. अश्या पद्धतीने समुद्रात मिठाची गर्दी होते. समुद्राच्या पाण्यात साठलेलं मीठ, बांध घालून अडवतात आणि उन्हात त्यातील पाणी उडवून लावतात. खाली बसलेल्या मिठाच्या थराला गोळा करतात. हे मिठागरातून आणलेलं खडेमीठ पूर्वी घराघरात वापरलं जायचं. या मिठात १० टक्क्यापर्यंत इतर मीठं असतात. नंतर पश्चिमेच्या अतीशुद्धतेच्या फॅशनमुळे त्याला रिफाइन करून शुद्ध मीठ खाण्यासाठी वापरण्याची पद्धत सुरु झाली.

मीठ व्यवसायातील एक मोठं कोड, विक्रमाच्या वेताळागत, गेली कित्त्येक वर्षे माझ्या मानगुटीवर बसत उत्तर मागतंय. ते म्हणजे, पहिले स्वस्त देशी खडेमीठ वाईट आहे अशी आवई उठवली. त्यातील १० टक्के इतर मीठे काढून टाकण्यासाठी आणि शुद्ध करण्यासाठी प्रायव्हेट कंपन्यांना रिफाइन मीठ बनवण्याचे कारखाने टाकण्यासाठी प्रोहत्साहं देण्यात आलं. त्यानंतर या मिठात आयोडीन नाही म्हणून वरून आयोडीन असलेली इतर मिठे त्यात टाकून, ते महाग मीठ लोकांच्या गळ्यात मारलं गेलं.  गम्मत म्हणजे समुद्री मिठापेक्षा भरपूर प्रमाणात इतर मीठे असलेलं हिमालय मीठ (काळं मीठ) तब्बेतीसाठी उत्तम म्हणून बाजारात गाजावाजा करून विकलं जातंय. या रिफाइन मिठाच्या नादात, पारंपरिक मीठ व्यवसायावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांची मीठभाकरी हिरावून घेत, मलई कोणी खाल्ली ? हा प्रश्न कधीच विचारला गेला नाही, हे आश्चर्य.  

मी स्वतःला विचारलं, या मिठागरात जावं का? का इथूनच फोटो काढून, दुरून मिठाचे डोंगर साजरे असं म्हणत निघावं. माझ्यातील सकारात्मक ‘मी’ म्हणाला, ‘खाईन तर मिठाशी नाहीतर उपाशी’. त्याची इच्छा शिसावंद्य मानून, मी चालत मिठाच्या ढिगापाशी गेलो. जे मूठभर मीठ उचलत गांधीजींनी इंग्रजांची दांडी गुल केली होती, ते मीठ एका मुठीत उचललं. त्याचा खरमरीत स्पर्श मायदेशाची आठवण देऊन गेला. बरेच दिवस झालेत घर सोडून. परदेशी अन्नपरीक्षणात व्यग्र असलेल्या, जिभेला घरच्या मीठभाकरीची प्रकर्षाने आठवण आली. आजच्या प्रवासात मीठागराने  चव आणली होती. घरच्या आठवणीत बाईकला किक मारली.   

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “जेवणाला चव आणणारी थाई शेतीं”

 1. सुंदर वर्णन ,
  जणू आपण स्वतः एकाबाजूला उंच डोंगर पाहतो आहे.
  आणि
  एकाबाजूला शांत , अथांग निळाशार समुद्र सोबत घेऊन ,
  निळ्या आणि हिरव्या रंगाच्या मधून काळ्याभोर डांबरी रस्त्यावरून जाणे म्हणजे न पाहिलेले दिव्यस्वप्न च होय.

  1. मिठागरे आणि त्याबद्दल असणारी आत्ता पर्यंत ची माझी माहिती आपल्या ह्या विस्तृत.. सखोल माहितीमुळे पूर्ण झाली… त्याबद्दल आपला आभारी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

उपवासाचं थाई पीकउपवासाचं थाई पीक

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 24 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर माझा प्रवास सुरु आहे. आज बराच प्रवास झालाय. पोटात

शेतीच्या गप्पा आणी थायलंडचा बाप्पा !शेतीच्या गप्पा आणी थायलंडचा बाप्पा !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 01 May , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ म्यानमार ची सीमा ओलांडून आमच्या बुलेटी थायलंडच्या रस्त्याला लागल्या आणी चॅनल बदलावं

‘फूल’ बनवणारं मलेशियन ‘फुल’‘फूल’ बनवणारं मलेशियन ‘फुल’

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 04 December , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थंडगार हवेत लपेटलेली मलेशियन सकाळ. सीटवर पहुडलेल्या साखरझोपेतल्या दवबिंदूंना दूर सारत, बाईकवर मांड