महत्वाचा फवारा सहाय्यक: स्प्रेडर

महत्वाचा फवारा सहाय्यक: स्प्रेडर post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 11 July , 2021

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

मागच्या लेखात आपण फवारा साहाय्यकाची माहिती घेतली. आज फवारा साहाय्यक कुळातील ‘स्प्रेडर’ या प्रकारची माहिती जाणून घेऊया. सगळ्यात पहिले स्प्रेडर ची गरज का पडावी? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

आपल्या शत्रूपासून वाचण्यासाठी किडे पानाच्या मागील बाजूस राहणे पसंत करतात. खरूज जशी अवघड जागी होते, तसेच पावडरी मिलड्यु सारख्या बुरशीचे डागही पानाच्या खालच्या अंगालाच उठतात. मिलीबग, पांढरी माशी हे रस शोधणारे किडे, पानाखालील, पांढऱ्या रंगाच्या पावडरीखाली आपली अंडीपिल्ली टाकतात. ही पावडर तेलकट असल्याने कीटकनाशक अंड्या-पिल्ल्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. 

कीडरोगापर्यंत शेतीऔषध पोहोचवायची ही कसरत सतत सुरु असते. काहीवेळेस हा मार्ग आपले स्प्रे पंप तिला अजून कठीण बनवतात. वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे पंप आपण वापरतो. काहीजण पाठीला बांधायचा नॅपसॅक पंप वापरतात, काहीजण बॅटरी वरचा, तर काहीजण पावर स्प्रे वापरतात. प्रगत शेतकरी इलेकट्रोस्टॅटीक पंपापासारखे अत्याधुनिक पंपाने फवारतात. आपण फवारात असलेले शेतीऔषध, वापरात असलेले पाणी आणि स्प्रेपंप, यावर, फवारा कीडरोगापर्यंत पोहोचेल का नाही? हे अवलंबून असतं. स्पर्शजन्य कीटकनाशक फवारतांना तर फवाऱ्याचा स्पर्श किड्याला होणं आत्यावश्यक आहे. पण बरेच शेतकरी तीर्थ टाकल्यासारखं फवारतात आणि किडा सुरक्षित राहून शेतात किडे करत राहतो

झाडाच्या पानावर तेलाचा थर असतो. फवारलेलं औषध बऱ्याचदा पानावरुन निथळून खाली पडतं. वेगवेगळ्या झाडांचा तेलकटपणाही वेगवेगळा असतो. आळु, कमळ आणि रबरच्या पानांवर पचपचीत तेलकटपणा असतो. त्यामुळे फवारलेलं पाणी पाऱ्यासारखं घरंगळत वाहून जात. पण वेलवर्गीय पिकात तो कमी असतो. म्हणून त्यांची पानं लवकर ओली होतात. किड्यांच्या शरीरवरही आपल्यासारखाच तेलाचा थर असतो. फवारलेलं औषध दवबिंदूसारखं त्याच्या शरीराबाहेरच रोखलं जातं, आणि किडा बचावतो.

या वेगवेगळ्या अडचणींमुळे शेतीऔषधतात स्प्रेडरचा वापर आवश्यक आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल, की, शेतीऔषधात स्प्रेडर टाकलेलं नसतं का? ते वरून टाकायची काय गरज पडावी? याचं उत्तर असं आहे की, जर शेतीऔषधाचा सक्रिय घटक, पाण्यात मिसळणारा नसेल, तर पाण्यात मिश्रणक्षम होण्यासाठी ‘ऍडजुवंट’ म्हणजे ‘सहायक’ त्या प्रॉडक्ट मध्ये वापरला जातो. जेणेकरून फवारणीच्या पाण्यात तो नीट मिसळतो. पण त्यामुळे त्याचं स्प्रेडींग होईलच असं नाही.

‘जैसा नाम वैसा काम’ या उक्तीप्रमाणे ‘स्प्रेडर’ या नावातच त्याचा उपयोग दडलाय. तो फवाऱ्याला पिकाच्या पानांवर पसरवण्याचं काम करतो. स्प्रेडर म्हणजे स्वभावाने साबण. आणि साबण म्हणजे तेलातील चरबीयुक्त आम्ला पासून बनलेलं मीठ. आपण लहानपणी खेळाखेळात बनवलेला साबण आठवत असेल. तेलामध्ये अल्कली टाकून साबण बनवतात. तेलाचे प्रकार आणि अल्कली बदलली, तर साबणाचा प्रकार बदलला. हा साबण बनवतांना घाणा नीट जमला नाही, अल्कलीचं प्रमाण जास्तकमी झालं की मग प्रॉडक्टचा सामू बदलतो. 

 स्प्रेडरच्या या साबणचं एक टोक, तेलकट असतं तर दुसरं त्याच्या उलट पाण्याच्या जातीचं असतं. जेव्हा आपण हे स्प्रेडर, कीटकनाशकाबरोबर फवाऱ्याच्या पाण्यात टाकतो, तेव्हा या साबणाचा तेलकट भाग, औषधाच्या आणि झाडाच्या पानावरील तेलकट थराला चिकटतो. त्याचवेळेस दुसऱ्या टोकावरील पानकट भाग, त्यांना विरुद्ध बाजूला पाण्यात ओढतो. या ओढाताणीत, फवाऱ्याचा पृष्ठीय ताण कमी होऊन पाण्याचा थेंब झाडावर पसरतो.  

जसं ऑपरेशनच्या आगोदर पेशंटला भूल दिली जाते. भुलीच्या औषधाचा डोस पेशंटच्या वजनानुसार ठरवला जातो. त्याचप्रमाणे एक एकरमधील पिकाच्या पानांवरील किती क्षेत्रफळावर शेतीऔषधाचा फवारा पसरवायचा आहे त्यानुसार प्रतिएकर डोस ठरतो. पण आता प्रश्न हा आहे की, काही ग्राम शेतीऔषध, एकरभर पिकावर एकसमान कसं पसरावयाचं? कीडरोगापर्यंत पोहिचण्यासाठी एवढ्याश्या औषधाला किती धावपळ करावी लागेल? या कामासाठी गुणवत्तायुक्त स्प्रेडर आवश्यक आहे.

स्प्रेडर ची गुणवत्ता तपासतांना, त्याचं पाणी पसरवणं आणि ते पसरवण्याला लागणार वेळ या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. सध्या स्प्रेडरची गुणवत्ता तपासतांना

पाण्याचा एक थेंब पानावर टाकतात आणि त्याला स्प्रेडरमध्ये बुडवलेल्या सुईचा स्पर्श करतात. मग जादूगाराने मंत्र टाकावा तसं ते पाणी वेगाने पसरू लागत. पण स्प्रेडर ची गुणवत्ता तपासायची ही पद्धत योग्य नाहीये. पाण्याच्या एका थेंबात अर्ध्या मिलीपेक्षा कमी पाणी मावतं. आणि सुईच्या टोकावर पाव मिली तरी स्प्रेडर चिकटलेला असतो. म्हणजे सुईने गुणवत्ता तपासतांना एका लिटर पाण्यात, अर्धा लिटर स्प्रेडर या मापाने आपण डोस घेत असतो. जे पूर्णपणे अशास्त्रीय आहे. यासाठी योग्य आणि सोपी पद्धत मी सांगतो. स्प्रेडर च्या बाटलीवरील लेबल लिहलेला डोस तपासा. समजा तिथं १ मिली प्रति लिटर डोस दिला असेल, तर एका लिटर स्वच्छ  पाण्यात एक मिली स्प्रेडर टाका. जर एक मिली एवढं छोटं प्रमाण मोजन्यासाठी योग्य माप आपल्याकडे नसेल, तर मापात पाप न करता, बादलीत दहा लिटर पाणी घेऊन त्यात दहा मिली स्प्रेडर टाका. इथं खोकल्याच्या औषधाच्या बुचाचं माप वापरता येईल. स्टिकर टाकल्यावर पाण्याला चांगलं हलवून घ्या आणि पाच मिनिटे शांत होऊ द्या. त्यानंतर या पाण्याचे दोन थेंब झाडाच्या पानावर टाका. दोन थेंबाततलं अंतर साधारणतः एक ते दोन इंच ठेवा. जर हे थेंब तीनचार मिनिटात पसरत पसरत एकदुसऱ्यात मिळाले तर स्प्रेडर ची गुणवत्ता चांगली आहे असं समजावं.

स्प्रेडरचा सामू तपासने महत्वाचे आहे. काहीजण स्वस्त स्प्रेडरच्या नादात निकृष्ठ दर्जाचा साबण वापरतात. त्याचा सामू व्यवस्थित सातपर्यंत आणला जात नाही आणि  तो उदासीन होत नाही. स्प्रेडरचा सामू योग्य नसेल तर तो शेतीऔषधाची परिणामकारकता कमी करतो. त्यामुळे स्प्रेडरचा सामू तपासणे महत्वाचे आहे. त्यासाठी १०० मिली पाण्यात पाच मिली स्प्रेडर टाका. या द्रावणाला चांगलं हलवा. पाच मिनिटे त्याला शांत होऊ द्या. त्यानंतर या पाण्यात पीएच पेपर बुडवा. जर याचा सामू साडे सहा ते साडेसात दरम्यान असेल तर ते स्प्रेडर योग्य गुणवत्तेचं आहे असं समजावं.

स्प्रेडर वापरतांना खालील बाबींचा विचार करावा:

– बऱ्याचदा कीटकनाशकात आगोदरच ऍडजुवंट किंवा स्प्रेडर टाकलेला असतो. त्यामुळे अजून स्प्रेडर टाकला कि डबल डोस होतो आणि स्कॉर्चिंग होऊ शकते. त्यासाठी वरून स्प्रेडर टाकण्याआगोदर कीटकनाशकाच्या बाटलीवरील लेबल वाचा.

– योग्य स्प्रेडर निवडतांना बाटलीवरील मजकूर काळजीपूर्वक वाचावा. शक्य झाल्यास कंपनीच्या वेबसाईट ला भेट द्यावी.

– सेंद्रियदृष्टया प्रमाणित उत्पादन असेल तर प्राधान्य द्यावं. सेंद्रिय प्राणपत्र आंतरराष्ट्रीय असेल तर उत्तम.

– शिफारस केलेल्या डोस पेक्षा जास्त स्प्रेडर वापरू नये. त्यामुळे पानं जळू शकतात. 

– उन्हात स्प्रेडर फवारू नये.

– स्प्रेडर फवारतांना झाडाला पाण्याचा ताण नसावा.

– बऱ्याच प्रॉडक्ट मध्ये स्प्रेडर वापरू नये अश्या सूचना असतात. काही वाढनियंत्रकात तश्या शिफारशी असतात. त्या पाळाव्यात.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “महत्वाचा फवारा सहाय्यक: स्प्रेडर”

  1. सर,गुड मॉर्निंग.तुमचे चारी लेख वाचले.अयोथायावरचा,स्पेडरवरचे दोन्ही आणि वळवळणाऱ्या प्रथिनांवरचा.मी मुळातला शाकाहारी आहे.त्यामुळे आज ना उद्या प्रथिनांसाठी आपल्याला या वळवळणाऱ्यांजीवांवरच अवलंबून राहावे लागणार आहे या तुमच्या भाकिताचा मी धसकाच घेतला आहे.पण ती वेळ येई पर्यंत मी या जगात नसेन मी फार चांगली गोष्ट होय.रामाला मानणारे त्या एरियातले बरेच देश आहेत हे मी बाजपेयींच्या एका व्याख्यानात ऐकले आहे.कंबोडियाची मंदिरे तरी वर्ल्ड हेरिटेज म्हणून प्रसिद्धच आहेत.स्प्रेडर आम्हीही विकतो.पण आयोनिक व नाॅनआयोनिक म्हणजे काय व त्यात काय फरक असतो.कुठले जास्त चांगले याबाबत मला काही माहिती नाही.कदाचित तुमच्या पुढच्या लेखात त्याचा उलगडा होईल.मला तुमच्या आणखी एका गोष्टीचे विशेष वाटते.ते असे की लालित्याची खूप पखरण करुनी झाली,स्थान महात्म्य म्हणून तिथली खूप माहिती देऊन झाली तरी हे आपण शेतकरी मित्रांसाठी लिहितो आहोत याचे भान तुम्ही सुटू देत नाहीत.म्हणून अयोथायावर सगळे लिहून होताच तुम्ही शेवटी तिथली भातशेती,तिथला आत्ताचा निमॅटोडचा प्राॅब्लेम व त्यावरचा आंतरप्रवाही औषधौपचार व ती एक नवी समस्या या सगळ्या गोष्टींवर न चुकता येता.मला वाटते तुम्ही जर अशाच पद्धतीची वर्ल्ड टूर केली तर सगळ्या जगातल्या ॲग्रीकल्चरचे आज काय स्टेटस आहे,याचा तो आरसा असेल.हे इतके तुमच्याशिवाय दुसरे कुणी चांगले करु शकणार नाही.असो.सध्या सिझन आहे.धावपळ चालू आहे.या सगळ्या धावपळीत तुमचे लेख म्हणजे मेजवानी असतात.असो.थांबतो इथे.Have a nice day ahead!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

रसायनामा- भाग ४रसायनामा- भाग ४

सुपंथ ! मित्रांनो रसायननामा या मालिकेतील हा शेवटचा भाग. आज उत्पादक, विक्रेता, शासन आणि शेतकरी यांच्या सम्यक सहभागाबद्दल बोलूया. मला एक प्रसंग आठवतो. काही वर्षांपूर्वी माझ्याकडे तेलंगणामधून एक कीटकनाशक उत्पादक आला.

थाई बिजा पोटी… फळे रसाळ गोमटीथाई बिजा पोटी… फळे रसाळ गोमटी

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 31 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पावसाची रिपरिप सुरु होती. गेले काही दिवस रोज संध्याकाळी चारनंतर, कर्जवसुली करणाऱ्या सावकारागत तो,

कीटकनाशकाच्या बाटलीचा दिल्ली ते गल्लीपर्यंतचा प्रवास !कीटकनाशकाच्या बाटलीचा दिल्ली ते गल्लीपर्यंतचा प्रवास !

जैविक असो किंवा रासायनिक,  कीटकनाशकाची बाटली आपल्यापर्यंत कशी पोहोचते? याचा प्रवास आजच्या लेखात पाहूया. आपल्या शेतात, बागेत वापरत असलेलं कीटकनाशक आपल्या बंधाशी येईपर्यंत कोणकोणत्या दिव्यातून पार पडतं हे जाणून घेणं