drsatilalpatil Agrowon Article प्रथिने पुरवणारी वळवळणारी थाई शेती !

प्रथिने पुरवणारी वळवळणारी थाई शेती !

प्रथिने पुरवणारी वळवळणारी थाई शेती ! post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 10 July , 2021

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

पटायाच्या झगमगीत रस्त्यावरून आमच्या बाईक या सदाहरित शहरात प्रवेश करत्या झाल्या. रात्र जागवणारं हे शहर देशविदेशातील पर्यटकांनी फुललेलं आहे. हॉटेलवर बाईक लावून, बाजारात चक्कर मारायला निघालो. सूर्य पश्चिमेच्या समुद्रात बुडाला होता. जीवाचं थायलंड करायला आलेले निशाचर, रस्त्यावर गर्दी करायला लागले होते. 

रस्त्यावर समोरच स्थानिक अन्नपदार्थाची हातगाडी होती. काय आहे म्हणून डोकावलं तर उडालोच.  झिंगुर, अळ्या, विंचू, भुंगे, बेडूक असे वेगवेगळे तळलेले पदार्थ आपल्याकडे जसे फरसान, डाळ, भडंग, चुरमुरे, शेंगदाणे डब्यांमध्ये भरुन ठेवलेले असतात तसे ठेवलेले होते. गोल चेहऱ्याचे गिऱ्हाईकं, हातगाडीभोवती गर्दी करुन मस्त आवडीने त्या किडान्नावर हात मारत होते.

थायलंडमध्ये गल्लोगल्ली अश्या प्रकारचे किड्याचे पक्वान्न विकले जातात. नाकतोडे, रेशमाचा किडा, माशीच्या अळ्या, मुंग्यांचे अंडे आणि वाळवी याच बरोबर रस्त्यावर तळलेले विंचू, बेडूक आणि झुरळं देखील विकायला असतात. किडे खाणारे लोकं जास्तकरून ईशान्य थायलंड मधले आहेत. हा भाग चीनच्या सीमेलगत आहे. थाई प्लेटमधील ही किड्यांची वळवळ नक्कीच चीनमधून आली असणार. जशी कोंबडी पोल्ट्रीफार्म मध्ये वाढवतात तसेच हजारो किड्ससंगोपन फार्म थाईलँडमध्ये आहेत. आपल्याकडे जसे कोंबड्या बकऱ्या पाळून जोडधंदा केला जातो. तसाच किडेपालनाचा हा वळवळणारा जोडधंदा थाई शेतकरी करतो. किडे खाण्याची पद्धत थाईलंडमध्ये परंपरागत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात हे किडे भाव खाऊन जातात. थाई शेतकऱ्याला इतर पिकांपेक्षा, किड्याची शेती जास्त पैसे कमवुन देते.  

किड्यांमध्ये सर्वात जास्त प्रोटीन आहे. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या पोषणासाठी, मुबलक प्रमाणात प्रोटीन उपलब्ध करणे हे भविष्यातील मोठं आव्हान ठरणार आहे. गोरगरीब, पोषणासाठी चिकनची तंगडी तोडणार नाहीत की त्यांची मुलं, ‘आय अँम प्रोटीन बॉय’ असं म्हणत, डब्यातल्या प्रोटीनपेयाचा कप ओठाला लावणार नाहीत. वाढत्या प्रोटीनची कमतरता भरून काढायची क्षमता किड्याच्या शेतीत आहे असं  ‘जागतिक आरोग्य संघटनेचं’ मत आहे. त्यांच्या मते, कमी चाऱ्यात, जास्त प्रोटीन किड्यांमध्ये मिळतं, त्यांची शेती इतर प्राण्यांपेक्षा पर्यावरणपूरक आहे, वातावरणातील प्रदूषण टाळून, त्यांचं सेंद्रिय संगोपन शक्य आहे. या प्रोटीनच्या उत्पादनात ग्रीन हाऊस गॅसेस आणि आमोनियाचं कमी उत्सर्जन होतं. इतर मांसाच्या तुलनेत, किड्यांच्या प्रोटीन उत्पादनात १०० पट, कमी ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्पादन होतं. गुराढोरांच्या मानाने, किड्यांच्या संगोपनात पाण्याची गरज अगदी नगण्य आहे. किड्यांचा हा व्यापार २०१७ मध्ये ते ४०७ कोटी रुपये होता. जागतिक बाजारपेठेच्या अंदाजानुसार २०२४ पर्यंत तो बावन्न हजार कोटीच्या पार जाईल. 

मी विचार केला, आपणही चाखून बघुयात का हे पदार्थ ? काय हरकत आहे ? जगातील करोडो लोकांच अन्न आहे ते, निदान चाखून तरी बघुयात.  रसग्रंथीमध्ये त्या चवीचा रेफरन्स स्टॅन्डर्ड तरी साठवूयात. चवच घ्यायचीय, पोटभर नाही खायचं. स्वतः अनुभव घ्यावा, मग तुलना करावी आणि चांगलं की वाईट यावर बोलावं. या मताचा मी असल्याने थाई आणि चायनीज लोकांना त्यांच्या अन्नावरुन चिडवण्याअगोदर ते चाखायची आलेली चांगली संधी दवडायची नव्हती. हातगाडीवाल्यासमोर उभा राहिलो. त्याने माझ्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहिलं. गोल गरगरीत चेहऱ्यांच्या गिऱ्हाईकांत मी एकटाच भारतीय चेहऱ्याचा. पन्नास बाथ त्याच्या हातावर टेकवले आणि प्रत्येक पदार्थाचे थोडे थोडे नमुने द्यायला सांगितलं. त्यानेही सत्यनारायणाच्या प्रसादासारखे द्रोण भरुन पाच प्रकारचे पदार्थ दिले. खातानाचे माझ्या चेहऱ्यावरचे संभाव्य हावभाव पाहून इतर खवय्यांची अन्नावरुन वासना उडू नये म्हणून जरा लांब गेलो. बाकावर बसून सर्व द्रोणसमोर मांडले. एका ड्रोनमधील किडा उचलला. तो झुरळासारखा क्रिकेट किडा, ‘झिंगुर’ होता.

थाईलंडमध्ये ‘झिंगुर’ची शेती करायला साधारणतः वीस वर्षांपूर्वी सुरवात झाली. आज देशाच्या एकूण २६ प्रभागात ही शेती केली जाते. जास्तकरून यांचं उत्पादन उत्तर आणि दक्षिण थाईलँडमध्ये होतं. शेतकरी घरगुती पद्धतीने त्यांचं उत्पादन करतातच. पण मध्यम ते मोठ्या आकाराचे व्यावसायिक झिंगुरी फार्म देखील इथं आहेत. या किडेसंगोपन शेतकऱ्यांची, सहकारी संस्था देखील आहे. उत्पादनातील  तांत्रिक बाबी, मार्केटिंग, सोसायटीचं राजकारण अश्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर संस्थेचे मेंबर किडे करत असतात.

‘क्रिकेट लॅब’ हा जगातील सर्वात मोठा झिंगुर फार्म ‘चांगमई’ इथं आहे. ‘फ्युचर प्रोटीन ग्रुप’ ने सुरु केलेली ही स्टार्टअप कंपनी आहे. जगातला भविष्यातील प्रोटीनचा श्रोत किड्यांमध्ये आहे हे भविष्य या कंपनीने बरोबर जाणलंय. इथं ‘व्हर्टीकल’ पद्धतीने झिंगुर शेती केली जाते. या झिंगुरला वाळवून, दळून त्याचं पीठ बनवतात. प्रोटीनयुक्त पीठ वेगवेगळ्या पाककृतीत वापरलं जात.   झिंगुरमध्ये, प्रोटीन आणि फायबर सारखे पौष्टिक तत्व भरपूर आहेत. १०० ग्राम झिंगुर मध्ये १२.९ ग्रॅम प्रोटीन, ५.५ ग्रॅम फॅट ५.१ ग्रॅम कर्बोदके आणि १२१ कॅलरी आहेत. त्याचबरोबर कॅलशीअम, लोह, फॉस्फरस, थायमिन, राइबोफ्लेवीन या सारखी अन्नद्रव्ये आहेत. झिंगुरला विशिष्ट वास नसतो. चवही तशी वाईट नसते. पण लोकांना झिंगुरची नैसर्गिक चव कळू नये म्हणून कंपन्या वेगवेगळ्या चवीत झिंगुर पदार्थ बाजारात आणतात. सध्या बाजारात अननस, नारळ, टोमॅटो, तुळशी, चॉकलेट या चवीचे झिंगुर पदार्थ उपलब्ध आहेत.

फ्युचर प्रोटीन ग्रुप’ ला करोडो रुपयाची परदेशी गुंतवणूक मिळालीय. किड्याला संगणकनियंत्रित मशीनने खाणं आणि पाणी देऊन, नवनवीन प्रकारचे खाद्यान्न बनवून, आधुनिक झिंगुर संगोपनपद्धती ते विकसित करताहेत. या पद्धतीमुळे झिंगुरची उत्पादनक्षमता चारपटीने वाढेल असा त्यांना विश्वास आहे. झिंगुरची शेती, थायलंडमधील उद्योजक आणि शेतकरी यांच्यासाठी फायद्याची ठरतेय. हे सहा पायाचं पशुधन, सुबक ठेंगण्या थाई लक्ष्मीला, शेतकऱ्याच्या दारात घेऊन आलंय.

मी हे किडान्न खाऊ शकेल का? असा विचार मनात किडा करून गेला. पण आपल्याकडेही किडे खाल्ले जातातच की, हा विचार मनाला आधार देऊन गेला. माझ्या लहानपणी आम्ही शेतातून मधाची पोळी काढून आणायचो. मधमाश्याच्या पोळ्यातून मध काढून झाल्यावर, त्यातील मेणाचा भाग सोडून उरलेलं पोळी खा, असा सल्ला दिला जायचा. त्या पोळ्यातील अळ्या खाल्याने डोकं दुखत नाही असं बुजुर्ग मंडळी सांगायची. मनाचा हिय्या करून एक तळलेला झिंगुर उचलला, त्याच्यावर एक नजर टाकली. आणि जास्त विचार न करता तोंडात टाकला.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “प्रथिने पुरवणारी वळवळणारी थाई शेती !”

 1. डॉक्टर साहेब
  आपण सुध्दा सर्वजण नकळत किडे खात असतो.
  आपल्या घरातील गहू , बाजरी , ज्वारी , दादर , तांदूळ
  कडधान्य ( हरभरे , मठ , मुग , चवळी , आणि इतर )
  तेलबिया ( शेंगदाणे , तिळ , आणि इतर )
  या सर्वांना किड लागते आपल्या घरातील महिला ते साफ करतात पण ते शंभर टक्के स्वच्छ झालेले असतेच असे नाही.
  म्हणून आपण ही नकळत किडे खाऊन प्रोटीन मिळवीत असतो.

 2. थोडं विचित्रच वाटतं…झूरळ हातात घेतलं तरी वांती होईल.. amazing

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो.……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो.

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 27 February, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ धाड s धाड s धाड s धाड s असा आवाज करत आमच्या बुलेटी

मलयदेशीचा मलमली प्रवासमलयदेशीचा मलमली प्रवास

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 20 November , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भारतातून निघालेली माझी बुलेट आणि मी, आता मलेशियात येऊन पोहोचलो आहोत. भारत, भूतान,

ड्रॅगनच्या विळख्यातला – टोनले सापड्रॅगनच्या विळख्यातला – टोनले साप

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 16 October , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भारताशी सांस्कृतिक भावकी असणाऱ्या देशात बाईकने फिरतोय. थायलंड आणि व्हिएतनाम अश्या दोन दमदार