म्यानमारी वाळूचे कण रगडिता… तेलही गळे

म्यानमारी वाळूचे कण रगडिता… तेलही गळे post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 27 March, 2020

Published by: अग्रोवन

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

धूळभरल्या रस्त्यावर दुपारच्या जेवणासाठी थांबलो. ऊन बऱ्यापैकी होतं. हॉटेलात पाय ठेवल्याठेवल्या तेथील मुलीने हसून म्यानमारी भाषेत काहीतरी पुटपुटत हातावर गुळाचा खडा आणि तिळीचे दाणे ठेवले. त्यासोबत थंडगार पाण्याचा ग्लास हातात दिला. कदाचित ‘तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला’ म्हणाली असावी असा समज करून घेत तिला गोडगोड धन्यवाद दिले. उन्हातून आल्यावर हातात गूळ देण्याची गोड भारतीय प्रथा इथपर्यंत पाझरलेली पाहून छान वाटलं. आत गेल्यावर एक बाई मोठ्या पातेल्यात गूळ बनवत बसलेली दिसली. म्हणजे मघाशी मी खाल्लेला गूळ घरी बनवलेला सेंद्रिय गूळ होता तर! नकळत एक छानशी गोड सेंद्रिय संवेदना पोटातून मेंदूकडे सरकत गेली.

ज्या हॉटेलमध्ये जेवलो, त्याच्याजवळच एक लाकडी घाणा होता. ‘रिंगा रिंगा रोजेस’च्या चालीवर बैल आणि मालक दोघंही तिळीचं तेल काढण्यात गुंग झाले होते. मला पाहिल्यावर ते थांबले. आणि ढेप चाखून बघायची आहे का? या अर्थाने इशारा केला. मी होकारार्थी मान डोलावल्यावर त्याने गरमागरम ढेपेचा तुकडा हातावर ठेवला. ढेप चाखून पाहिली. छान चव होती. लहानपणी आम्हाला खाऊ म्हणून शाळेत ढेपच मिळायची. ही म्यानमारची ढेप मला पार भूतकाळात घेऊन गेली.

तेलबियांचं पीक इथं मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. म्यानमारच्या एकूण शेतीपैकी १६ टक्के शेतात तेलबियांचं पीक घेतलं जातं. ‘तिळा तिळा दार उघड’ असं म्हणत तेलपिकांच्या यादीत तीळ सर्वांत वरती जाऊन बसले. त्यामुळे जगातील सर्वांत मोठ्या तीळ उत्पादक देशांच्या पंगतीत बसायचा मान म्यानमारला जातो.  त्यापाठोपाठ टणाटणा उडत शेंगदाणा दुसऱ्या नंबरवर येऊन बसतो. म्यानमारचं  तिळीचं सरासरी एकरी उत्पन्नही इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. 

एवढं तेलबियांचं उत्पादन असूनसुद्धा तेलउत्पादनाच्या बाबतीत मात्र हा देश बराच मागे आहे. तेलाचे कारखाने इथं जास्त नाहीत. त्यामुळे तेलनिर्यातीच्या शर्यतीत ते कासवाच्या गतीने धावताहेत. पण पारंपरिक लाकडी घाणे मात्र इथं जागोजागी दिसतात.

जेवण आटोपून निघालो. तीळशेंगदाण्याच्या या तेलशेतीला अगदी वेगळा जोडधंदा असेल याची आता सुतराम कल्पना असायचं काहीही कारण नव्हतं. या तेलकट विचारांना झटकत गाडी पुढे दामटली. म्यानमारच्या डोंगररांगांतून बुलेट धडधडत निघाली. सुरुवातीला तुरळक असणारे डोंगर जरा जास्तच गर्दी करायला लागलेत. डोंगररांगा सुरू झाल्या आणि रस्ता अतिखराब प्रकाराकडे झुकला. घाटवाट अजून बिकट होत चालली होती. शेतीतील कामं आटोपून गोलगोल टोपीवाले थकलेभागले शेतमजूर घराकडे निघाले होते. संध्याकाळचा सूर्य क्षितिजावर टेकण्याआधी जास्त उशीर न करता मला मुक्कामी टेकायला हवं. घाटरस्ता उतरताना एक लहानसं गाव नजरेच्या टप्प्यात आलं. पन्नास साठ झोपड्यांचं हे गाव काहीसं वेगळं दिसतंय. पाच दहा मिनिटात तिथं पोहोचलो. तेव्हा  जे काही पाहिलं, त्यानं विस्मयचकित व्हायला झालं. पेट्रोलसम्राट आखाती देशांच्या पंक्तीत मानाने

बसू शकेल, असं हे छोटंसं गाव आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण या गावाचा मुख्य धंदा आहे, इंधन तेल पिकवण्याचा! आश्चर्याचा धक्का बसला ना… होय! या गावात चक्क तेलाच्या विहिरी आहेत. त्याही लोकांच्या मालकीच्या, शासनाच्या नव्हे. लहानपणची म्हण आठवली…एखाद्या बडेजाव दाखवणाऱ्याला  ‘तुझ्या बापाच्या तेलाच्या विहिरी आहेत कारे भो!’ असा सवाल केला जायचा. पण या सवालाला इथला शेंबडा पोरगाही होकार देईल.

हे लोक जमिनीत हजार पंधराशे फूट खोल बोअर खोदतात. त्यावर 40-50 फूट उंच लोखंडाचे दोन खांब आणि बांबूचा आधार देऊन तिपाई बनवतात. त्या तिपाईवर पुली लावून त्यावरून डब्बा जोडलेली तार सरळ बोअरवेलमध्ये जाते. काही जण हाताने तर काही जनरेटरच्या मदतीने ती तार खेचतात. मग त्या तारेला बांधलेला डब्बा खालून तेलाने भरून येतो. ते ओतून झाल्यावर डबा परत खाली सोडला जातो. ज्याच्या बोअरवेलला जास्त तेल असेल, तो सरळ पाईप आतमध्ये टाकून डिझेल पंपाने तेल बाहेर ओढतो. एका बोअरवेलपासून दिवसभरात एक बॅरल तेल मिळतं. हे सर्व तेल एकत्र गोळा करून संध्याकाळी येणाऱ्या कंपनीच्या गाडीला दिलं जातं. मग ही कंपनी पुढे त्यापासून पेट्रोल-डिझेल बनवते. एका बोअरवेलमधून दररोज चार- पाचशे रुपयांची कमाई होते. इथले लोक रस्त्यावर फक्त मौल्यवान रत्नं विकत नाहीत, तर इंधनतेलही  विकतात तर! अजून पुढे रस्त्यावर कायकाय विकायला ठेवलेलं दिसतंय, हे ब्रह्मदेशी ब्रह्मदेवच जाणे.

म्यानमारमध्ये तेलाचे साठे भरपूर आहेत. इंधनतेलाच्या निर्यातीला १८५३ मध्येच  सुरुवात झाली होती. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, मिलिटरी राज आणि लोकशाहीचा अभाव, अमेरिका, युरोपसारख्या देशांनी लावलेले निर्बंध इ. घटकांमुळे हा व्यवसाय वाढू शकला नाही. त्यामुळे घरी कामधेनू.. पुढे ताक मागे, अशी त्यांची गत झालीय.

JaggeryPlant

हा तेलाच्या विहिरीचा धंदा सुरू करायला फक्त तीन -चार लाख रुपये खर्च आहे. जमीन विकत किंवा भाड्याने घ्यायची. बोअरची गाडी बोलावून जमिनीत बोअर मारायचा. नशिबाने साथ दिली तर तेल लागेल. मग जनरेटर, पाईप, लोखंडी दोर आणि पुली आणून जुगाड टेक्नॉलॉजीने तेल काढायला सुरुवात करायची. जमिनीत तेल मिळालं नाही तर मात्र पैसे गेले तेल लावत. तेलासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्या गरीब लोकांचं आयुष्य या भूमीला फुटलेल्या तैल पाझरावर अवलंबून आहे. काही गरीब शेतकरी तेलबिया पिकणारी शेती विकून या पेट्रोलच्या शेतीसाठी जमीनतुकडा विकत घेतात. पण तिलाही तेल लागलं नाही तर मात्र तेलही गेले तूपही गेले, अशी गत होते. पूर्वी जमिनीला चांगला फुटायचा पान्हा. जास्त तेल मिळायचं. पण आता जो तो  ऊठसूठ बोअर मारतो. त्यामुळे दिवसेंदिवस तेल कमी होत चाललंय, असा तक्रारीचा सूर येथील लोकांकडून ऐकायला मिळाला.

पूर्वीसारखा या भूमातेला पान्हा फुटत नसल्याने त्यांची आर्थिक उपासमार होतेय अशी खंत येथील लोकांनी व्यक्त केली. अशी तेलकट खेडी म्यानमारमध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत. क्रुड ऑईलवर आधारित अर्थव्यवस्था असणाऱ्या गावाला निरोप देत पुढे निघालो. आयुष्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तेलविहिरी पाहत होतो. अंगाला तेलाचा एकही डाग पडू न देता मजुरांना राबवून जगभर तेलसाम्राज्य चालवणारे पांढरेशुभ्र अरब पाहून स्वतःच्या तेलविहिरींवर राबणाऱ्या या मळकटलेल्या मालकांचा अभिमान वाटला. म्यानमारी मातीचे कण रगडून तेल काढणाऱ्या या कष्टाळू लोकांना सलाम करत बुलेटला किक मारली.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “म्यानमारी वाळूचे कण रगडिता… तेलही गळे”

  1. डॉक्टरसाहेब ,
    खुपचं छान !!!!!

    सर ,
    आमच्या लहानपणी म्हणजे १९७०-७१ ला शिंदखेडा येथे सरकारी दवाखान्या समोर अशाच तेलाचा घाणा होता तेथे पाच पैशाला कच्च्या ढेपाचा मोठा तुकडा मिळायचा तो खातांना हाताबरोबर कपडे भरायचे
    आणि घरी रागवण्या बरोबर मार पण मिळायचा.

  2. सर
    तुमचे खूप खूप आभार
    तुम्ही तुमच्या बरोबर आम्हालाही फिरवून आणताय
    खूप छान लिहिता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

भगवान विष्णूच्या देशात !भगवान विष्णूच्या देशात !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 04 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडमधील प्रवास आज संपलाये . माझी बाईक थायलंड- कंबोडियाच्या बॉर्डरवर उभी आहे. थायलंडच्या हिरव्यागार

मौल्यवान रत्नांची शेतीमौल्यवान रत्नांची शेती

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 27 March, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ ब्रह्माच्या या देशातून माझ्या बुलेटरथातून हिंडतोय. वाऱ्याशी स्पर्धा करत माझा वारू उधळलाय. रस्त्याच्या

लवचिक थाई शेतीलवचिक थाई शेती

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 14 August , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ दक्षिण-पूर्व थायलंड मधून माझा बाईक प्रवास सुरु आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडे दाटीवाटीने वर्षावनात उभी