पायरी न ओलांडणारी पायऱ्यांची शेती !

पायरी न ओलांडणारी पायऱ्यांची शेती ! post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 20 February, 2020

Published by: अग्रोवन

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

भूतानमधून खाली उतरत उतरत परत भारतात आलोय. नागालँड मार्गे मणिपूरच सीमोल्लन्घन केलय. अगदी भूतान मधून निघाल्यापासून अधूनमधून डोंगरांच्या टोकाकडे जाणारी शेती लक्ष वेधून घेतेय. या प्रदेशात सपाट जमीन नाही. म्हणून दात कोरून पोट भरावं तस इथं लोकं डोंगर कोरून शेती करतात. एवढ्या कठीण परिस्थितीत शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्याला साष्टांग नमस्कार करावासा वाटला, पण बाईक वरून तोल जाईल म्हणून तो बेत रहित केला. हां ! पण मनातल्या मनात मात्र हे काम उरकलं. .

जगण्याच्या शर्यतीत, जगातील प्रत्येक जीव निसर्गाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. किडे, सरड्यासारखे प्राणी, जीव वाचवण्यासाठी आणि शिकार मिळवण्यासाठी झाडापानात लपून, रंग बदलायला शिकलेत, पाण्यात राहून शिकारीला पाण्यात पाहणाऱ्या शार्क माश्याने, मैलभर अंतरावरून रक्ताचा वास काढण्याचे कसब विकसित केलय. ध्रुवीय प्रदेशातील बर्फाळ थंडीपासून वाचण्यासाठी ध्रुवीय अस्वलानं जाड, केसाळ ब्लॅंकेट मिळवलय. अश्याच प्रकारे माणसाने निसर्गाशी जुळवून घेत उत्क्रांतीच्या चक्रात बाजी मारलीय.  केनियाच्या रिफ्ट व्हॅलीत मानववंशाच रोपटं लागलं आणी त्याचा वेलू पृथ्वीभर पसरला. स्थलांतर करत मनुष्यप्राणी जगाच्या काण्याकोपऱ्यात पोहोचला. त्याने दऱ्याखोऱ्यात, बर्फाळ प्रदेशात, मैदानी प्रदेशात तग धरत, आलेल्या अडचणींवर मात करत, निसर्गाशी जुळवून घेत तिथं वस्ती केली. मैदानी प्रदेशात शेती करणं सोपं होतं, पण डोंगराळ प्रदेशात शेती पिकवणं मोठं जिकरीचं. पण हार न मानता त्याने डोंगरात शेतीच तंत्र विकसित करून पोटापाण्याची सोय केली. डोंगर पोखरून उंदीर काढणाऱ्यांच्या जगात या लोकांनी डोंगर पोखरून पिकं काढली. हां ! आपल्याकडे शहरात डोंगर पोखरून बहुमजली बिल्डिंग काढतात ती गोष्ट अलहिदा. 

या पायऱ्यांच्या शेतीला टेरेस शेती असही म्हणतात. डोंगराळ भागात, उतारावर लांब पायऱ्यांच्या आकाराचे चरे देऊन  शेतीयोग्य जमीन तयार करायची. या पायऱ्यांवर पिकं उगवायची आणि निसर्गाची पायरी सांभाळून शेती करायची.

काय म्हणता? या शेतीचा इतिहास काय आहे? सांगतो !, हा पायरी इतिहास पार पुरातन संस्कृतींपर्यंत जातो. १३ व्या आणी १४ व्या शतकात अँडीज पर्वतात, इंका संस्कृतीत या प्रकारची शेती केली जायची. दक्षिण अमिरिकेतील माचूपिचू इथं आजही त्याचे अवशेच आढळतात. फिलिपाइन्स च्या डोंगररांगांमधील पायऱ्यांची शेतीही हजारो वर्ष जुनी आहे. तिला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केलं गेलय.

दक्षिणपूर्व आशियात याच प्रकारे भाताचं पीक घेतलं जातं. भात पिकाला पाणी जास्त लागतं. पावसाचं किंवा वरती साठवून ठेवलेलं पाणी पायऱ्यापायऱ्यांनी संपूर्ण शेतभर फिरवत भाताला पाजता येतं. व्हिएतनाम, थायलंड, फिलिपिन्स यासारख्या देशातून पिकवला जाणारा बहुतांश भात, डोंगरांच्या टेरेस वर पिकवला जातो. आपल्याकडेही दक्षिण आणि ईशान्य भारतात पायऱ्यांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

या पायरीच्या शेतीचे भरपूर फायदे आहेत. एकतर सपाट जमीन नसली तरीही डोंगरावर शेतीक्षेत्र वाढवता येतं. पण यापेक्षाही मोठा फायदा म्हणजे माती आणि पाणी संवर्धन. हो ! इथं शेतातील पाण्याचा लोंढा धसमुसळेपणा करत वाहून जात नाही. तो पायऱ्यांच्या वळणावळणाने वळत, बागडणाऱ्या लहान मुलागात ‘रिंगा रिंगा रोजेस’ असं गात ते शेतभर गोलगोल फिरत, हुंदडतं, झुळूझुळू वाहत पायथ्याकडे येतो. म्हणून जमिनीची धुप कमी होते, अन्नद्रव्य वाहून जात नाही आणि पर्यायाने जमिनीतीचा कस टिकून राहतो. पाण्याच्या या सम्यक प्रवाहामुळे शेतातील रसायने, गाळ पाण्याबरोबर वाहून जात नाही. त्यामुळे नदीनाले आणि समुद्र प्रदूषित करायच्या पापात ते शामिल होत नाही. प्रदूषण कमी होतं, कारण कमी होतं, कारण पायऱ्यापायऱ्यातून फिरतांना ही रसायनं मातीत, पायऱ्यांच्या कडेला शोषली जातात. तेथील जीवाणू रसायने विघटित करून ते हलाहल पचवायचं काम अंगावर घेतात . सपाट जमीन नसल्याने शेतीकामात करतांना शेतीकामात अडचणी येतात. पण हे आव्हानही येथील शेतकरी आनंदाने पेलतो.

आता लवकरच प्रवासाच्या पुढच्या पायरीवर पोहोचायचं आहे. बाईकचा एक्सेलरेटर पिळला. समोरचा घाट ओलांडल्यावर समोरच्या डोंगराच्या डोक्यावर भलं मोठं टक्कल पडलेलं दिसलं. अरे! या डोंगरबाप्पाला टक्कल कसं? थोडं पुढे जाऊन पाहिल्यावर माझ्या टक्कूऱ्यात प्रकाश पडला. अरे! ही तर ‘शिफ्ट शेती’ म्हणजे सरकणारी शेती. दहा वर्षांपूर्वी मणिपूरला ऑफिसच्या कामासाठी आलो होतो. तेव्हा एक गोरी मॅडम “शिफ्ट ऍग्रीकल्चर” वर संशोधन करायला आली होती. तिच्याबरोबरच संभाषण चौकस आठवलं. 

या सरकणाऱ्या शेतीचे संदर्भ काळाबरोबर सरकत ख्रिस्तपूर्व ८००० वर्षे मागे जातात. अगदी ‘निओलिथनीक’ काळातही या शेतीची सरसर सुरु होती हे वेगवेगळ्या उत्खननातून सिद्ध झालाय.

बालवाडीतून पोराने प्राथमिक शाळेतील ‘पाहिलीत’ यावं, तसंच भटक्या, शिकारी माणसाचा शेतकरी होण्याच्या प्रक्रियेतील सरकणारी शेती म्हणजे ‘पहिली’ इयत्ता. शिकारीत दुसऱ्याचा जीव घेऊन उदरभरण करण्याला, दुसरा अहिंसक मार्ग आहे, तो म्हणजे पिकात जीव ओतून शेती करण्याचा. हे त्याला कळलं. मग काय, जंगल तोडून, जमिनी साफ करायची. जंगल साफ करायला अगदीच कठीण असेल तर सरळ काडी लाऊन त्याचं खांडववन करायचं.  साफ झालेल्या जमिनीवर पिकं घायची. दोन-चार वर्ष या जमिनीचा वापर करायचा. नंतर मात्र काडीमोड घेऊन तिथून दुसरीकडे स्थलांतर करायचं, नवा गडी नवं राज्य या उक्तीप्रमाणे परत नवीन ठिकाणी जंगल तोडायचं आणि शेती करायची. अशी ही तोडातोडी ची भटकी शेती पिढ्यानपिढ्या करत राहायची. नवीन जागा असल्याने माती सुपीक असते, तीत पिकं चांगली येतात. आजही मध्य आफ्रिका, मध्य अमेरिका आणि दक्षिणपूर्व आशियात ही सरकणारी शेती केली जाते.

या शेतीला वेगवेगळी नावाने ओळखतात. ईशान्य भारतात हिला ‘जुम किंवा झुम’ म्हणतात. साहेबांच्या भाषेत ‘स्लॅश अँड बर्न’ असं नांव आहे. इंडोनेशियात ‘लाडक्मग’, फिलिपिन्स मध्ये ‘काइंजिन’, मेक्सिको आणि मध्य अमेरिकेत ‘मिलपा’, व्हिएतनाम मध्ये ‘रे’ काँगो आणि मध्य आफ्रिकेत ‘मासोल’ आणी ब्राझील मध्ये ‘रोका’ म्हणतात. या सर्व नावात ब्राझील चं नाव मला समर्पक वाटतं. “रोका !”. कारण ही शेती पर्यावरणपुरक नाहीये. हिला ‘रोकलंच’ पाहिजे. या सरकणाऱ्या शेतीमुळे हजारो एकर जंगलं तोडली आणि जाळली जातात. त्यामुळे पर्यावरणाची वाट लागतेय. किती विपर्यास आहे ना? इथं पायऱ्यांची शेती आपली आणि निसर्गाची पायरी सांभाळून आहे पण सरकणारी शेती मात्र आपली पायरी सोडून निसर्गाचं टाळकं सरकवतेय.

ईशान्य भारतातून बुलेट धडधडत निघालीय. तिची धडधड हिमालयाच्या कान्याकोपऱ्यातून पायऱ्यांच्या आणि सरकणाऱ्या शेतीला आम्ही येत असल्याचा सांगावा पोहोचवतेय. निसर्गाचा बाज राखणारी आणि त्याचा ह्रास करणारी, अश्या दोन्ही सवती-शेती सांभाळत हिमालय मात्र अविचल उभा आहे.

भूतान मधून परत भारतात मणिपूरला आलोय. इथून पुढे म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश आम्हाला खुणावतोय. सरकणाऱ्या शेतीपासून होणारा पर्यावरणऱ्हास वाचव असं ब्रह्मदेवाला विनवत ब्रह्मदेशाकडे गाडी पिटाळली. 

 

लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

1 thought on “पायरी न ओलांडणारी पायऱ्यांची शेती !”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

मलयदेशीचा मलमली प्रवासमलयदेशीचा मलमली प्रवास

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 20 November , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भारतातून निघालेली माझी बुलेट आणि मी, आता मलेशियात येऊन पोहोचलो आहोत. भारत, भूतान,

भगवान विष्णूच्या देशात !भगवान विष्णूच्या देशात !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 04 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडमधील प्रवास आज संपलाये . माझी बाईक थायलंड- कंबोडियाच्या बॉर्डरवर उभी आहे. थायलंडच्या हिरव्यागार

अस्मानी संकट, की कर्माची फळं ?अस्मानी संकट, की कर्माची फळं ?

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 23 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ गेल्या काही दिवसात युरोपमधील पुराच्या बातम्या आपण ऐकतोय. जवळपास २०० लोकांचे बळी गेले आहेत.