Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 01 May , 2021
Published by: अग्रोवन

म्यानमार ची सीमा ओलांडून आमच्या बुलेटी थायलंडच्या रस्त्याला लागल्या आणी चॅनल बदलावं तसं चित्र बदललं. सुबक प्रशस्त रस्ते, नजर जाईल तिथपर्यंत हिवंगार जंगलं आणि शेती. सगळीकडे कशी मस्तपैकी स्वच्छता आणी टापटीप. लोकांच्या चेहऱ्यावरून सतत झिरपणारं स्मित हास्य आणि खेड्यापाड्यापासून ते शहरांपर्यंत नजरेत भरणारी सुबत्ता. सगळं कसं मनमोहक आहे.
थायलंड भारतापेक्षा विकसित देश आहे. दरडोई राष्ट्रीय सकल उत्पन्नात जिथं भारत १४२ व्या नंबरवर आहे तिथं इवल्याश्या थायलंडने ८२ वा नंबर पटकावलाय. यांचं चलन आहे ‘बाथ’. भारतीय रुपयांपेक्षा ‘बाथ’ दुप्पट भाव खाऊन जातो. एक बाथ म्हणजे दोन रुपये हे गणित पाहिल्यावर, वाह, क्या ‘बाथ’ है! असं म्हणावंसं वाटत.

थायलंडला ‘सियाम’ असंही म्हणतात. शेतीव्यवसावर आधारित उत्पादने थायलंड मधुन मोठ्या प्रमाणात निर्यात होतात आणी ते आंतरराष्ट्रीय बाजारात फार प्रसिद्ध आहेत. पाच लाख वर्ग किलोमीटरवर पसरलेला साडेसहा कोटी लोकांचा हा देश शेतीच्या बाबतीत खऱ्या अर्थाने विविधता बाळगून आहे.
इथल्या प्रमुख पिकांची यादी भात, नारळ, कॉफी, पाम, सोयाबीन, चवळी, ऊस, डूरीयन फळ, केळी, संत्रा, टॅपिओका म्हणजे साबुदाण्याचा कंद, टोमॅटो, वेगवेगळे भाजीपाले, रबर, हेम्प, रेशीमउद्योग अशी लांबत जाते. या यादीव्यतिरिक्त अजून एका प्रकारची शेती इथं मोठ्या प्रमाणात केली जाते, ती म्हणजे किड्यांची शेती. वेगवेगळ्या किड्यांचा यांच्या जेवणात समवेश आहे, त्यामुळे किड्यांचे संगोपन करणारे फार्म वळवळे फार्म थाईलँडमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.
थायलंडच्या विकासात शेतीव्यसायाचा मोठा वाटा आहे. शेतीत झालेल्या बदलांमुळे १९६० मध्ये ६०% असलेली बेरोजगारांची संख्या २००० पर्यंत १० टक्क्याच्या घरात आली होती. बालकुपोषितांची संख्या १७ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर घसरली होती. ही जादू साधली ती शासनाच्या पायाभूत सुविधा, शिक्षण आणी शेतीत खासगीकरण आणि गुंतवणुकीत घेतलेल्या मेहनतीमुळे. त्यामुळे येथील उद्योगधंद्यांना बरकत आली. गावागावात सिमेंटी आणी डांबरी रस्ते पोहोचलेत. रस्ते हे रक्तवाहिन्यांसारखे असतात. शासनाने रस्ते बांधले आणि लोकांनी त्यात पाय न घालता आपल्या गावातून आणि शेतातून जाऊ दिले. याच डांबरी रक्तवाहिन्यांमुळे शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणं शक्य होतंय.

यांच्या शेती आणि शेतकऱ्याच्या विकासाची प्रचिती वेगवेगळ्या पिकांच्या जागतिक यादीतील स्थान पाहिलं की येते. उस उत्पादनाच्या जागतिक यादीत ब्राझील, भारत आणि चीनसारख्या महाकाय देशानंतर थायलंडने ४ था नंबर राखलाय. भात उत्पादनात जगात ६ वा, साबुकंदात २ रा आणि पामतेलात मलेशिया आणि इंडोनेशिया नंतर ३ ऱ्या नंबरवर हा थायलंड आहे. नैसर्गिक रबरात तर त्यांनी बाजीच मारलीय. राबराला ताणून तुटेपर्यंत राजकारणात न आणल्याने या पिकात त्यांनी जगात अव्वल स्थान पटकावलय. आंब्याच्या पिकात ३रा नंबर तर काटेरी अननसानं चवथं स्थान धरून ठेवलय. देवाच्या करणीने ज्या नारळात पाण्याचा झरा फुटलाय त्या नारळाच्या उत्पादनात थायलंड जागतिक यादीत नववं स्थान पटकावून डॉलरचा झरा देशात आणलाय.

थायलंडची शेतीमालाची वार्षिक निर्यात एक लाख कोटी ‘बाथ’ म्हणजेच दोन लाख कोटी रुपये एवढी आहे. देशांतर्गत बाजारपेठेत चार लाख कोटी रुपयांचा शेतीमाल विकला जातो. हा देश अन्नधान्याचा मोठा निर्यातदार आहे. सर्वात जास्त निर्यात भाताची होते. जसा जेवणाच्या ताटात इतर पदार्थांच्या तुलनेत भाताचं मानाचं स्थान असतं त्याचप्रमाणे एकूण अन्नधान्य तुलनेत साडेसतरा टक्के भात निर्यात होतो. त्यानंतर नंबर लागतो तो चिकन, टुना मासा, साखर, साबुकंदाचं पीठ आणि झिंगे यांचा.
आख्या जगाच्या एकूण अन्ननिर्यातीत थायलँडचा वाटा आहे घसघशीत अडीच टक्के. आपल्यापेक्षा आकाराने आणी लोकसंख्येने मोठ्या देशांपेक्षाही शेतीमालाच्या निर्यातीत या लहानग्या देशाने मारलेली बाजी खरंच प्रशंसनीय आहे. अश्या या सुजलाम सुफलाम देशात फिरतांना मजा येतेय. लोकं प्रेमळ आणि सहृदय आहेत. वेळोवेळी मदतीसाठी तय्यार असतात. परकेपणाची भावना पार हद्दपार झालीय.

अरे थांबा ! थांबा ! अशी हाकाटी आली आणि ब्रेक मारून बुलेट रस्त्याच्या कडेला घेतली. पुणे-सिंगापूर-पुणे या २०,००० किमीच्या बाईक मोहिमेदरम्यान आम्ही थायलंडमधून प्रवास करत होतो. दुतर्फा हिरवेकंच डोंगर आणि गुळगुळीत डांबरी रस्ते बाइकिंग ची मजा वाढवत होते. ह्या काळ्या डांबरी लोण्याच्या मुलायम गोळ्यावरून बाईकचं टायर फिरत होतं. हिरव्यागार किनारीच्या चकाचक रस्त्यावर आम्ही बुलेटच्या डीजेच्या तालावर निघालो होतो. आजूबाजूच्या थाई वाड्यावस्त्यांतून शिजणाऱ्या अन्नपदार्थांचा वास घेऊन हवेची थंडगार झुळूक ‘वळवळणाऱ्या थाई जेवणाला या हो!’ असं आवताण देत गावभर हिंडत होती. थाई भाषेला एक विशिष्ट लय आहे. इथले लोकही हळुवार मृदू सुरात बोलतात. रस्त्याच्या बाजूला गप्पा मारणारे लोक गाणं गुणगुणताहेत असं वाटतं. मी भांडणारे थाई बघितले नाहीत अजून… पण ते सुद्धा तमाशातील सवाल जबाबासारखे गाण्यात भांडत असावेत. असो.
ह्या सुखासीन प्रवासात ‘थांबा थांबा’च्या हाकाटीने व्यत्यय आणला होता. “अरे ही बघा, कसली मूर्ती आहे इथं”. रस्त्याच्या कडेची उभी असलेली ती मूर्ती बघून आमचे बायकर्स थांबले होते. “मित्रांनो, हे तर आपले गणपती बाप्पा,” मी उत्साहाने उद्गारलो. रस्त्याच्या डाव्या बाजूला एक खोपटं होतं. आणि त्या खोपट्यासमोर तुंदिलतनुधारी सोनेरी थाई बाप्पा आपल्या सुबक ठेंगण्या थाई भक्तांना आशीर्वादाची पोझ देत उभे होते.

थायलंडमध्ये गणपतीला ‘फ्रा फिकनेट’ असं म्हणतात. चांगली वीत दोन वीत लांब अगरबत्ती लावून त्याची पूजा केली जाते. थायलंड सरकारच्या ‘ललित कला खात्याचं’ प्रतीक गणेशाची प्रतिमा आहे. येथील मोठ्या मोठ्या टीव्ही कंपन्यांच्या आवारात बाप्पाची स्थापना केलेली असते. म्हणजे अख्ख्या देशाला ‘दूरदर्शन’ घडवणाऱ्यांचा दिवस बाप्पाच्या ‘दर्शनाने’ होतो तर! थायलंड मधील सर्वांत जुनी गणेश मूर्ती ‘फांग ना’ इथं आहे. ही मूर्ती १०व्या शतकातील आहे. ‘चाचोंग साओ’ हे गणपतीचं शहर म्हणून ओळखलं जातं. ह्या शहरात गणेशाच्या तीन अवाढव्य मूर्ती आहेत. त्यातील ‘फ्रा अंकाट’ मंदिरात तर ४९ मीटर उंचीचे बाप्पा बसलेत. जगातील सर्वात उंच गणेशाची मूर्ती थायलँडमध्ये आहे असा येथील लोकांचा दावा आहे. ब्रॉन्झची ही विघ्नहर्त्याच्या मूर्ती थायलंडमधीलच नाही तर जगातील सर्वोच्च गणेशमूर्ती आहे असं लोक म्हणतात.
आम्ही सर्व बायकर बाईकउतार झालो. ह्या थाई बाप्पासमोर हात जोडले. आमची ही मोहीम ‘कोणतेही विघ्न न येता पार पडू दे रे बाप्पा!’ असं साकडं घातलं. आपल्या विसर्जनाच्या मिरवणुकीत ‘धतर ततर..धतर ततर’ असं ढोल ताश्याच्या तालावर मुक्तछंदातलं नृत्य करणाऱ्या भारतीय भक्तांकडे बाप्पाने गंभीर नजरेनं पाहिलं आणि “तुम भी क्या याद करोगे ” असं म्हणत ‘तथास्तु’ म्हटलं.

५ लाख वर्ग किलोमीटर वर वसलेल्या ,
६.५ कोटी लोकसंख्या असलेला देश म्हणजे
” मुर्ती लहान पण किर्ती महान. “