अरे थांबा ! थांबा ! अशी हाकाटी आली आणि मी ब्रेक मारून बुलेट रस्त्याच्या कडेला घेतली. पुणे-सिंगापूर-पुणे या २०,००० किमीच्या बाईक मोहिमेदरम्यान आम्ही थायलंडमधून प्रवास करत होतो. दुतर्फा हिरवेकंच डोंगर आणि गुळगुळीत डांबरी रस्ते बाइकिंग ची मजा वाढवत होते. ह्या काळ्या डांबरी लोण्याच्या गोळ्यावरून बाईकचं टायर बर्फावर स्केटिंग करावं तसं फिरत होतं. आजूबाजूच्या थाई वाड्यावस्त्यांतून शिजणाऱ्या अन्नपदार्थांचा वास घेऊन हवेची थंडगार झुळूक ‘वळवळणाऱ्या थाई जेवणाला या हो!’ असं आवताण देत होती. थाई भाषेला एक विशिष्ट लय आहे. इथले लोकही हळुवार मृदू सुरात बोलतात. रस्त्याच्या बाजूला गप्पा मारणारे लोक गाणं गुणगुणताहेत असं वाटतं. मी भांडणारे थाई बघितले नाहीत अजून… पण ते सुद्धा तमाशातील सवाल जबाबासारखे गाण्यात भांडत असावेत. असो.
ह्या सुखासीन प्रवासात ‘थांबा थांबा’च्या हाकाटीने व्यत्यय आणला होता. “अरे हे बघा, कसली मूर्ती आहे इथं”. रस्त्याच्या कडेची उभी असलेली ती मूर्ती बघून आमचे बायकर्स थांबले होते. “मित्रांनो, हे तर आपले गणपती बाप्पा,” मी उत्साहाने म्हणालो. रस्त्याच्या डाव्या बाजूला एक खोपटं होतं. आणि त्या खोपट्यासमोर तुंदिलतनुधारी थाई बाप्पा आपल्या सुबक ठेंगण्या थाई भक्तांना आशीर्वादाची पोझ देत उभे होते.
.

थायलंडमध्ये गणपतीला ‘फ्रा फिकनेट’ असं म्हणतात. चांगली दोन वित लांब अगरबत्ती लावून त्याची पूजा केली जाते. थायलंड सरकारच्या ‘ललित कला खात्याचं’ प्रतीक गणेशाची प्रतिमा आहे. येथील मोठ्या मोठ्या टीव्ही कंपन्यांच्या आवारात बाप्पाची स्थापना केलेली असते. म्हणजे अख्ख्या देशाला ‘दूरदर्शन’ घडवणाऱ्यांचा दिवस बाप्पाच्या ‘दर्शनाने’ होतो तर! थायलंड मधील सर्वांत जुनी गणेश मूर्ती ‘फांग ना’ इथं आहे. ही मूर्ती १०व्या शतकातील आहे. येथील ‘चाचोंग साओ’ गणपतीचं शहर म्हणून ओळखलं जातं. ह्या शहरात गणेशाच्या तीन अवाढव्य मूर्ती आहेत. त्यातील ‘फ्रा अंकाट’ मंदिरात तर ४९ मीटर उंचीचे बाप्पा बसलेत. ही मूर्ती थायलंडमधील सर्वांत उंच मूर्ती आहे.
आम्ही सर्व बायकर बाईकउतार झालो. ह्या थाई बाप्पासमोर हात जोडले. आमची ही मोहीम कोणतेही विघ्न न येता पार पडू दे असं साकडं घातलं. आपल्या विसर्जनाच्या मिरवणुकीत ‘धतर ततर..धतर ततर’ असं ढोल ताश्याच्या तालावर मुक्तछंदातलं नृत्य करणाऱ्या भारतीय भक्तांकडे बाप्पाने गंभीर नजरेनं पाहिलं आणि “तुम भी क्या याद करोगे ” असं म्हणत ‘तथास्तु’ म्हटलं.
‘ड्रीमर अँड डूअर्स’ च्या या सात देशांतील बुलेट मोहिमेदरम्यान असे अनोखे क्षण वेळोवेळी अनुभवायला मिळाले. ह्या क्षणांना पुस्तक रूपात बांधताना संपूर्ण मोहीम परत जगायला मिळाली.

खुप सुंदर वर्णन.
Very good experience satish
Very nice article and information
Very nice, Dr. Satish
We are proud of you.
Wonderful satish
प्रत्यक्ष थायलंड पाहिल्याचा आनंद झाला.
आपल्या मुळे
” जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी ”
अश्या सर्वत्र असणारया
” गणपती बाप्पांचे ” दर्शन झाले.
आणि
परमेश्वर सर्वांचा असतो.
याचेही प्रत्यक्ष दर्शन आपण घडविले.
” गणपती बाप्पांना ”
आणि
” थायलंडच्या भक्तांना ”
सस्नेह नमस्कार.