
आटपाट गावात धोंडिबा नावाचा तरुण शेतकरी राहत होता. धोंडिबाचं घर नदीच्या या काठाला तर शेत नदीच्या दुसऱ्या काठाला होतं. पूर्वी नदीला बारमाही पाणी असायचं त्यामुळे घरातून नजरेच्या टप्प्यात असलेल्या नदीपल्याडच्या शेतात जाण्यासाठी, लांबच्या पुलापर्यंत पायपीट करत, पुलावरून नदी ओलांडून शेतात जावं लागायचं. पण गेल्या दोन दशकात पर्जन्यचक्राचा समतोल ढळला. पावसाचं चालचलन बिघडलं. वर्षभर नेमाने वाहणारी नदीची माया आटू लागली. मग शेतीसाठी, पिण्यासाठी वर्षभर नेमाने पाणी हवं, म्हणून लहानमोठे बांध घातले गेले. त्यामुळे नदीचा ओघ आटला. लहानपणी मित्रांबरोबर धावत जाऊन, पुलाचा लॉन्गकट मारून शेतात जाणारा धोंडिबा, तरुणपणी कोरड्या नदीपात्रातून पाच मिनिटात आपल्या बांधावर पोहोचू लागला.
धोंडिबाला तसं सुपारीचंही व्यसन नव्हतं. गावातल्या पेताड, गंजेडी, नशेडी, जुगारी ग्रुपपासून तो कायम सुरक्षित अंतर राखून होता. नवसागराचा घमघमाट येणाऱ्या गावाबाहेरील वस्तीपासूनदेखील तो लांब राहिला. पण सध्या एका वेगळ्या व्यसनात तो अडकला होता. त्याच्या घरी लँडलाईन फोन होता त्यामुळे मोबाईलची गरज पडली नव्हती. पण मुलांच्या आग्रहाखातर गेल्या वर्षी त्याने स्मार्टफोन घेतला होता. सुरवातीला वापरण्यात अडचणी आल्या. पण एकदा त्याला फोनमधील व्हाट्सअप, फेसबुक, युट्युब यामधील खजाना गावासल्यावर, फोनची चटक लागली. बांधावर बसून सोशल मीडिया चाळत बसणं हा धोंडिबाचा आवडता छंद झाला. व्हाट्सअप मधल्या खऱ्याखोट्या बातम्यांमध्ये तो अडकून राहू लागला. त्या इतरांना शेअर करू लागला. त्यामुळे कमी मित्र दुरावले. राजकारणी बातम्या शेअर केल्यामुळे त्याच्यावर शिक्के पडले. काही मित्रांच्या मते तो भक्त होता तर काहींच्या मते अभक्त. पण या चक्करमध्ये तो मित्रांपासून विभक्त झाला होता. सोशल मीडियाच्या दलदलीत तो जेवढी हालचाल करायचा तेवढा जास्त रुतु लागला. शेतातील काम सोडून तासंतास तो फोनमध्ये अडकून पडू लागला. त्यामुळे शेतीचे, घरचे कामं वेळेत संपणे दुरापास्त झाले. होणाऱ्या विलंबामुळे घरच्यांची चिडचिड व्हायची. पण दारुड्याला जशी त्याची चूक कळून येत नाही तसंच आपलं काही चुकतंय हे मात्र धोंडिबाच्या गावीही नव्हतं.
या वर्षी धोंडिबाने ज्वारीचं पीक घेतलं होतं. जमीन सुपीक असल्याने आणि पाऊस चांगला झाल्याने पीक चांगलंच तरारलं होत. त्याच्या या शेतात एका चिऊताईने घरटं बनवलं होत. या घरट्यात चिऊताईने तीन अंडे दिले. कालांतराने त्या अंड्यातून तीन गोंडस पिल्लं बाहेर पडली. आपल्या पिल्लाचं पोषण करण्यासाठी चिऊताईची दिवसभर लगबग असायची. चिऊताई सकाळी चारा आणायला शेतभर फिरायची. पिलांसाठी अन्न गोळा करायची. आणि संध्याकाळी घरट्यात परत यायची.
धोंडिबाचं पीक आता काढणीला आलं होत. टंच भरलेल्या कणसांवर भोरड्यांचा थवा झेपावयाचा. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी डबा बडवणे, कॅसेट्च्या प्लॅस्टिकच्या पट्ट्या लावणे यासारखे उपाय करतं पीक वाचवायचा आटापिटा चालवला होता. पण धोंडिबा मात्र या बाबतीत जास्त गंभीर नव्हता. त्याने शेतात बुजगावणं उभं केलं होतं. शेत बुजगावणेभरोसे सोडून, मोबाईलशी खेळत तो बांधावर दिवसभर बसून असायचा. आजूबाजूच्या शेतातील कापणीला जोर आला तेव्हा धोंडिबाला आपल्या कापणीला उशीर झाल्याचे जाणवलं. अधूनमधून आकाशात दाटून येणाऱ्या ढगांच्या काळ्या सावल्या अवकाळीची टांगती तलवार टोक्यावर लटकल्याची जाणीव करून देत होते. पाण्याने भरलेली ओंजळ घेऊन फिरणारे ढग, आता रोजच आकाशात हजेरी लावू लागले. त्या दिवशी ढगांच्या ओंजळीतून तर काही थेंब ओघळले देखील. धोंडिबाला मात्र आता घाई करणे आवश्यक होते. त्याने मोबाईल काढला आणि कापणीच्या कामाचं कंत्राट घेणाऱ्या सुभान्याला फोन केला. उद्या कोणत्याही परिस्थितीत माझ्या शेतात तुझी टोळी आली पाहिजे असं बजावत, तो बांधावर बसून मोबाईलमध्ये घुसला.
धोंडिबाचं मोबाईलवरील बोलणं चिमणीच्या पिलांनी ऐकलं आणि ते घाबरले. आपलं घरटं संकटात आहे याची त्यांना जाणीव झाली. संध्याकाळी चिमणी घरट्यात परतली तेव्हा त्यांनी धोंडिबाचं मोबाईलवरील बोलणं तिला सांगितलं. आपण आजच दुसरीकडे जायला हवं असंही सुचवलं. तेव्हा ‘बाळांनो घाबरू नका. उद्या हा शेतकरी ज्वारी कापणार नाही. त्यामुळे आपल्याला आज घाई करायची गरज नाही’. असं म्हणत चिमणीने पिल्लांना समजावलं आणि चारा खाऊ घातला.
दुसऱ्या दिवशी धोंडिबा शेतात आला. पण तिथं सुभान्या किंवा त्याची टोळी, यापैकी कोणाचाही पत्ता नव्हता. त्याने सुभान्याला फोन केल्यावर ‘धोंडिबा, दुसरं अर्जंट काम आलं बघ आमच्याकडे. पुढच्या आठवड्यात करतो तुझं काम’ असं म्हणत त्याची बोळवण केली. चरफळण्याशिवाय धोंडिबा काही करू शकत नव्हता. आकाशातून मिचकावणाऱ्या ढगांकडे पाहत धोंडिबा विचार करू लागला. आता काय करायचं. सध्या सगळेच घाईला येणार. मजुरांची मुजोरी वाढणार. त्यापेक्षा आपला भाऊबंधांना साकडं घातलेलं बरं. यापूर्वी कधी तशी गरज भासली नव्हती. पण आता निकड होती. त्याच्या चुलतभावांना मदतीसाठी साद घालायचं ठरवलं. त्यांच्याकडे प्रत्येकी २-३ गाडीमाणसे आणि त्यांची कुटुंब आश्रयाला होती. एका दिवसासाठी ती मंडळी कामाला आली तरी धोंडिबाचं काम होणार होतं. त्याने त्याच्या तीनही चुलतभावाला फोन केला. आम्ही गाडीमाणसांशी बोलून बघतो आणि उद्या तुझ्या शेतात पाठवतो असं आश्वासन तिघांनी दिलं. त्यांच्या आश्वासनाने धोंडिबाला दिलासा मिळाला. सुटकेचा श्वास सोडत त्याने बांधावर त्याच्या नेहमीच्या जागेवर बसकण मारली आणि मोबाईलमध्ये गुंगला.
आज संध्याकाळी चिमणी घरट्यात आली तेव्हा पिल्लांनी चिवचिवाट करून धोंडिबाच्या प्लॅन बद्दल सांगितलं. आजच आपण आपलं बिऱ्हाड दुसरीकडे हलवायला हवं असा आग्रह केला. यावर चिऊताईने हसत पिल्लाना पंखात घेत म्हटलं, ‘बाळांनो घाबरू नका. इथून आजच आपल्याला आपलं बिऱ्हाड हलवायची गरज नाहीये’. तिच्या उत्तरावर पिल्लांची जोरात चिवचिवाट करत विरोध दर्शवला. पण तिने पंखाखालील पिलांना दिलासा देत शांत केलं.
पुन्हा दुसरा दिवस उगवला. धोंडिबा शेतात हजार झाला. पण त्याला शेतात एकही गडी दिसला नाही. त्याने शेजाऱ्यांनादेखील विचारले. पण कुणीही त्यांना पाहिलं नव्हतं. धोंडिबाने फोन करून भाऊबंधांना विचारलं. त्यावर ‘या गाड्यांचं काय खरं नाही बघ, काल चांगलं सांगितलं की त्यांना. तरी गेली नाईत ती’. असं म्हणत वेळ मारून नेली.
आता मात्र धोंडिबा वैतागला होता. आज आकाश जरा जास्तच भरून आलं होतं. पाऊस आला तर मात्र हातातोंडाशी आलेलं पीक जाईल याची भीती ढगासारखी गडद होत होती. मोबाईल बाजूला ठेऊन हताशपणे तो बांधावरच बसला. इतके दिवस मोबाईलच्या नादात सोन्यासारखा वेळ वाया घालवला होता. लोकांनी घाई करून वेळेत कापणी करून घेतली होती. नजर जाईल तीथवरील ज्वारीची कापणी झालेली उघडी शेतं पसरली होती. फक्त धोंडिबाच्या शेतातील ज्वारी वाकुल्या दाखवत ढगाळ हवेवर डोलत उभी होती. या डोलणाऱ्या पिकावरून नजर फिरवतांना त्याला त्याची चूक लक्षात आली. मोबाईलच्या नादात त्याने बहुमूल्य वेळ वाया घालवला होता. आता त्याला पश्चाताप होत होता. आता हातपाय हलवले नाहीत तर मात्र काही खैर नाही याची त्याला जाणीव झाली. ‘बस्स झालं, उद्या शनिवार आहे. दोन्ही मुलांना दोन दिवस सुट्टी आहे. बायको आणि आईबाबांना देखील घेऊन येतो. आमच्या सहा लोकांचे बारा हात राबले तर दोन दिवसात काम संपेल. असं म्हणत तो उठला आणि तडक घराकडे निघाला.
धोंडिबाच्या हालचालींकडे चिमणीबाळे आपली चिमणी नजर ठेऊन होते. संध्याकाळी पिल्लांनी चिमणीला दिवसभराचा वृत्तांत कथन केला. आज देखील घाई करायची गरज नाही याची आता त्यांना खात्री झाली होती. पण एकदम चिमणी सतर्क झाली आणि तिने आवराआवरील सुरवात केली. ती पिल्लांना म्हणाली ‘बाळांनो, चला, सामान आवरा, आजच नवीन जागा शोधायला हवी’. पिल्लांची आश्चर्याने विचारलं, आई, गेले दोन दिवस तू या शेतकऱ्याचं म्हणणं सिरियसली घेतलं नाहीस. पण आज मात्र घाई करतेयस. असं का?’ यावर चिमणी म्हणाली, मजूर हे पैशाचे गुलाम, त्यामुळे जिकडे जास्त पैसे तिकडे ते जाणार. आणि सध्या मजूर म्हणजे मनका राजा, त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे पैसे घेऊन मत दिलेल्या उमेदवाराकडून, आश्वासनपूर्तीची अपेक्षा करण्यासारखं आहे. दुसरे भाऊबंद. त्यांच्या नावातच बंद असल्याने तुलना करण्यात आणि पाय ओढण्यातच ते पुढे. त्यामुळे गरजेच्या वेळी तिकडूनही अपेक्षा करणे व्यर्थ. शेवटी सगळे रस्ते बंद होतात तेव्हा कुटुंब कामी येतं. ते ऐनवेळी धोका नाही देणार. आत्ता कुठं या शेतकऱ्याला ‘आत्मनिर्भरतेचं’ महत्व समजलंय. ढगांच्या थंडगार हवेने त्याला जमिनीवर आणत मोबाईलच्या नशेतून जागं केलंय’.
………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

खूप छान.
Very much enjoyed and the words selected keeps you engaged till the finish. Great.
शेवटी कुटुंबच कामाला येत…………