Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 18 September , 2021

भगवान विष्णूच्या या देशात मी आणि माझी बाईक फिरतोय. ‘अंगकोर वाट’ मंदिराचं दर्शन घेतल्यापासून, भारतीय नाळ जुळलेल्या या देशाबद्दल भावकीची आपुलकी निर्माण झालीय. इथं फिरतांना ३०-४० वर्षापूर्वीच्या भारतात फिरल्याचा भास होतोय. हा देश तसा गरीब आहे. शहरातील लोकांची परिस्थिती बरी दिसतेय, पण गावातील लोकांचा आर्थिक स्तर अजून जमिनीलगतच आहे. हळूहळू हा देश गरिबीतून बाहेर येतोय. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक वास्तूचं निर्माण करणारा देश किती त्याकाळी समृद्ध असेल? हा प्रश्न डोक्यात परतपरत डोकावतोय. संपूर्ण इजिप्तच्या पिरॅमिडच्या दगडांना एकत्र मांडल्यावर देखील ते कमी पडतील एवढे मोठे दगडं वाहून आणायला किती कामगार लागले असतील? या बांधकामाला खर्च किती आला असेल? वास्तुकलेचा आधुनिक ज्ञान असलेले वास्तुविशारद ज्यांच्याकडे होते, ते राज्य त्याकाळी किती विकसित असेल? मग कोणे एके काळी संपन्न असलेल्या या देशाची आजची अवस्था का झाली असावी?

अंगकोर वाटचं मंदिर पाहतांना टूर गाईडने ‘खमेर रूज’ चा उल्लेख आला होता. या देशाने मोठी यादवी पचवली होती. युद्धाचे आणि गृहयुद्धाचे वाईट दिवस नुसते अनुभवले नव्हते, तर भोगले होते. कंबोडियाची फरफट सुरु होते अमेरिका-व्हिएतनाम युद्धापासून. बळी तो कान पिळी या म्हणीप्रमाणे, अमेरिकन बळीने व्हिएतनामचा कान पिळायची गुस्ताखी केली आणि त्यात लाखो लोकांचा बळी गेला. शेवटी अमेरिकेच्या पदरी पराभवाची नामुष्की पडली. पण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ‘निक्सन’ च्या निर्णयाने कंबोडियाला मोठं नुकसान सोसावं लागलं. शेजार जळत असल्यावर धग ती लागणारच. व्हिएतनाम युद्धात चीनचा लाल प्रभाव असलेली ‘व्हिएत काँग’ सेना ही फ्रान्स-अमेरिका सैन्याशी लढत होती. या उजव्या डाव्यांच्या, युद्धात कंबोडिया भरडलं गेलं. व्हिएतनाम मधील चायनीज कम्युनिझमचा संसर्ग शेजारी लाओस आणि कंबोडियामध्ये देखील झाला.
कंबोडियात लपलेल्या कम्युनिस्ट बंडखोरांना चाप लावण्यासाठी, १९६९ मध्ये अमेरिकेने पूर्व कंबोडियात तुफान बॉम्बिंग केलं. हा बाँम्बत्याचार, १९७३ पर्यंत म्हणजे तब्ब्ल चार वर्षे चालला होता. अमेरिकेने एकूण एक लाख दहा हजार टन बॉम्ब या देशावर टाकले. त्यात लाखभर निष्पात लोकांचा बळी गेला आणि साधारणतः २० लाख लोकं बेघर झाली. आजही अमेरिकेच्या बॉम्बमुळे पडलेले खड्डे सर्वत्र दिसतात. अमेरिकेच्या या अत्याचाराने ‘खमेर रूज’ जन्माला आलं. ‘खमेर रुज’ हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ कंपुचीय’ म्हणजेच कंबोडियन कम्युनिस्ट पक्षालाचं नाव आहे. कंबोडियाला ‘कंपूचीया’ म्हणायचे. १९७५ ते १९८९ दरम्यानच्या या पार्टीच्या कार्यकाळाला ‘खमेर रूज’ म्हणतात. खमेर पार्टीने १९६० उत्तरार्धात कंबोडियाच्या पूर्वेकडील जंगलात हळूहळू बस्तान बसवायला सुरवात केली होती.
याच काळात त्यांचा नवा नेता ‘पोलपॉट’ उदयास आला. पोलपॉट हा एका शेतकऱ्याचा मुलगा. लहानपणी तो आणि त्याचा भाऊ भाताच्या शेतात काम करायचे. कंबोडियात फ्रांसचं राज्य असल्याने त्यांचं प्राथमिक शिक्षण फ्रेंच शाळेत झालं. पुढे तो उच्च शिक्षणासाठी फ्रांस ला गेला. १९५० मध्ये खमेर विद्यार्थ्यांनी पॅरिस मध्ये कम्युनिस्ट पार्टी सुरु केली. मायदेशात क्रांती घडून आणण्यासाची विचारधारा, फ्रान्समधे शिक्षण घेतांना आकार घेत होती. पोलपॉट कंबोडियात परत आला, ते क्रांतीचे विचार डोक्यात घेऊनच. आपले पूर्वज अंगकोरवाट सारखं, जगात भारी मंदिर बंधू शकतात तर, आपण काहीही करू शकतो अशी दर्पोक्ती तो करायचा.

‘कंबोडियन कम्युनिस्ट’ पार्टीला पाठबळ होतं ते चीनमधील माओच्या ‘चायनीज कम्युनिस्ट’ पार्टीचं. त्यांना ९० टक्के अर्थसहाय्य चीनमधून येत होतं. उजवं सरकार पाडून सामान्य लोकांचं, कामगारांचं डावं सरकार आणण्यासाठी कंबोडियाची कम्युनिस्ट पार्टीने कम्बर कसली. १९७५ मध्ये त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्यांनी कंबोडियन सरकार उलथून पाडत सत्ता काबीज केली.
सत्ता मिळाल्यामिळाल्या त्यांच्यातील क्रूरकर्मा जागा झाला. त्यांचं असली रूप समोर येऊ लागलं. विरोधकांचा सुपडा साफ करण्यासाठी आणि स्वतःचे नियम लागू करण्यासाठी सुरवातीला देशाला जगापासून तोडलं, शाळा बंद केल्या, हॉस्पिटल आणि फॅक्टरी ला कुलूप लावलं. बँका, वित्तीय व्यवहार, चलन बंद केले. नोटा मोडीत काढल्या. सुरवातीच्या काळात जगापासून अलिप्त होऊन भविष्याच्या संपन्नतेसाठी तयार होता येईल असं त्यांचं मत होतं.

त्यांचा अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होता. शहरातील लोकांना घर, शहर सोडून ३-४ किलोमीटर बाहेर जाऊन राहायला सांगितलं जायचं. घराबाहेर जातांना घराला कुलूप नाही लावायचं. घराची काळजी नको, सरकार आपल्या घराची काळजी घेईल असं लोकांना सांगितलं जायचं. एखाद्याने घराबाहेर पडायला नकार दिला तर सरळ गोळी घातली जायची किंवा त्याच्या घराला आग लावली जायची. शहराबाहेर पडलेल्या लोकांना लांब अंतरापर्यंत मार्च करायला लावायचे. त्यामध्ये कित्येय लहान मुले आणि म्हाताऱ्याकोतारे मेले. शहरं खाली केली आणि शहरी लोकांना जबरदस्तीने गावागावात सामूहिक शेती करायला मजूर म्हणून पाठवलं.
शहरातून नेलेल्या लोकांतून कुशल कामगारांना शहरात परत पाठवलं जायचं. बंद पडलेल्या फॅक्टरीत त्यांची रवानगी केली जायची. अकुशल लोकांना सरकारी मालकीच्या सामूहिक शेतीत काम करायला ठेवायचे. त्या काळी कंबोडियात एका हेक्टर शेतात, एक टन भात पिकायचा. पण पोलपॉट साहेबांनी, प्रतिहेक्टर तीन टनाचं टार्गेट दिल. शेतीत पिकलेल्या अन्नाचा खाण्यासाठी उपयोग ठाऊक असणाऱ्या शहरी लोकांना, शेती कशाशी खातात हेही माहीत नव्हतं. त्यांना शेती जमणार कशी? आणि डायरेक्ट तिप्पट उत्पन्न ते काढणार कसं? शहरातून आलेल्या या शहरी शेतकऱ्यांना गावातील लोकांचा पाठिंबा नव्हता. ते त्यांना मदत करायला उदासीन असायचे किंवा ‘खमेर रूज’ ला घाबरून मदतीचा हात पुढे करायला कचरायचे. जंगली फळं किंवा रानमेवा तोडणंदेखील गुन्हा होता. आणि या गुन्ह्याची सजा होती ‘मौत’. दिवसभर राबवून पुरेसं अन्न आणि आराम मिळायचा नाही. त्यामुळेदेखील हजारो लोक मेली.
त्यानंतर ‘खमेर रूज’ ने सुशिक्षित लोकांना संपवण्याचा त्यांनी सपाट लावला. व्यावसायिक, विचारवंत, परदेशी भाषा जाणणारे असा प्रत्येक शिकलेला माणूस मारायचा सपाटा त्यांनी लावला. त्यामध्ये कलाकार, संगीतकार, लेखक यांचा समावेश होता. सुशिक्षित, विचारवंत लोकं म्हणजे आपल्या साम्राज्याला धोका, ही भीती त्याच्या मनात होती. या भीतीपोटी त्यांनी लाखो लोकांचा जीव घेतला. चष्मा घालणं म्हणजे सुशिक्षित असल्याचं लक्षण. म्हणून चष्मा घालणारा माणूस दिसला कि गोळ्या घालायचे. भीतीपोटी लोकांनी चष्मा घालणं बंद केलं. पण नाकावर चष्म्याच्या वापरामुळे पडलेलं चिन्ह पाहून त्यांना मारलं जाऊ लागलं.

हे गृहयुद्ध झालं तेव्हा कंबोडियाची लोकसंख्या होती ७५ लाख. पण १९७५ ते १९७८ या चार वर्षात त्यांनी २० लाख लोकांचा निप्पात केला. म्हणजे अख्या देशातील लोकसंख्येपैकी २५ टक्क्यांपेक्षाही जास्त लोकांना पोलपॉट ने मारून टाकलं. या कंबोडियान हिटलरच्या क्रौर्यासमोर जर्मन हिटलरदेखील हेल ‘पोलपॉट’ असं वाकून म्हटलं असता. ही काळी घटना जगभरात ‘कंबोडियन नरसंहार’ या नावाने कुप्रसिद्ध आहे.
पुराणकाळात समृद्ध असलेल्या देशाच्या वाट्याला आलेलं औदासीन्य पाहून वाईट वाटलं. चीनमधून आलेला संसर्गजन्य ‘खमेर रोगामुळे’ त्यांच्याच लोकांनी त्यांना गाळात घातलं होत. शेतकऱ्याचा पोरगा असलेल्या ‘पोळपाट’ ने देशावर ‘लाटणं’ फिरवलं होत.
” पोल ” सारखी विचारधारा असणारयां सर्वांची ,
” खाल ” काढावी.