रोजच्या रहाटगाडग्यात पिसलेला तो एका बेसावध क्षणी जागो होतो. उघड्या डोळ्यांनी एक स्वप्न पाहतो. स्वप्नाला स्वप्न जोडत धाडसी स्वप्नाळूंची एक टोळी जमते आणि सुरु होतो स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा थरारक, रोमहर्षक प्रवास…
ड्रीमर्स अॅन्ड डूअर्स वाचताना आपण लेखकासोबत गाडीवर मागे बसून या प्रवासाचे भागीदार होतो. येतील ती आव्हानं वरदान म्हणून झेलतो, पेलतो, समृद्ध होतो. सात देशांचा इतिहास, भुगोल, वर्तमान, निसर्ग, अर्थकारण, समाजकारण, अवस्था, व्यवस्था, राहणीमान, खानपान… याची देही याची डोळा अनुभवतो. आजूबाजूच्या जगण्याकडं डोळसपणे पाहत त्या त्या भागातील माणसांच माणूसपण काळजात साठवतो.
फिरण्याचा, जगण्याचा अन् जगाकडं पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन, नवी उर्मी, नवा आत्मविश्वास देणारं… स्वप्नपूर्तीची दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत करणारं आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मोहीमांचे स्वप्न पाहणारांना उत्तम मार्गदर्शन करणारं आवर्जून वाचावं असं पुस्तक !