वाढदिवसाचा विंचू!

वाढदिवसाचा विंचू! post thumbnail image

सालाबादप्रमाणे यावर्षीही माझा(झे) यावर्षीचा(चे)  वाढदिवस जोशात साजरा(ये) झाला(ले). शनिवारी सकाळी ‘ड्रीमर अँड डुअर’ पुस्तकाचे फॅन विवेक काटकर, त्यांची बहीण आणि मुंबईहून श्री सिद्धार्थ पाटील भेटायला आले होते. सकाळी सकाळी केक कापला. सिद्धार्थ पाटलांनी ‘गडपुरुष आणि दुर्गविधानम्’ ही दोन पुस्तकं भेट दिली. रात्री १२ वाजता कुटुंबीय आणि सोसायटीतील मित्रांसोबत केक कापून सुरु झालेला वाढदिवस रविवारी सकाळी प्रमोद, धनंजय आणि राजेश या सायकलिंग मित्रांच्या बरोबर आणि  दुपारी लई भारी ग्रुपसोबत विजय हरगुडेच्याच्या घरी कापलेल्या केकने संपला. दिवसभरात शेकडो फोन आणि हजारो मेसेज आले. एवढं भरभरून प्रेम दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार.  बऱ्याच मित्रांचे फोन घेता आले नाही आणि मेसेजला उत्तर देऊ शकलो नाही याबद्दल माफ करा.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की पहिल्या ओळीत, कंसातल्या, वाक्याची लय बिघडवणाऱ्या शब्दांचा अर्थ आहे तरी काय? या अर्थाचा बेअर्थ करणाऱ्या शब्दांची आज उकल करतो.  २४/१० हे खडूने लिहलेले आकडे आमच्या गावातल्या लाकडी घराच्या छताच्या गेल्या कित्तेक ववर्षांपासून लिहलेले आहेत. ही माझी जन्मतारीख आहे.  माझा जन्म झाला तेव्हा घराघरात वीज आणि कॅलेंडर पोहोचले नव्हते. गावात पांढरेशुभ्र इस्त्रीचे कपडे घालणाऱ्या एखाद्याकडे ते असायचे. लक्षात राहावी म्हणून छतावर खडूने ती तारीख लिहून ठेवली होती. घराला वर्षानुवर्षे सांभाळनाऱ्या लाकडाने, माझी पुसट होत जाणारी जन्मतारीख सांभाळून ठेवलीय. लहानपणी कोणी विचारलं की, तुझी जन्मतारीख काय? तर मी छताकडे बोट दाखवायचो.  पण अजून एक आठवण माझ्या जन्मदिवसाच्या आठवण म्हणून सर्वांच्या लक्षात होती. ती म्हणजे माझा जन्म झाला त्या दिवशी दसरा होता. घराच्या छतावर लिहलेली तारीख आणि त्या दिवशी दसरा होता ही आठवण, या दोन गोष्टी माझ्या जन्मादिवसाची साक्ष द्यायच्या. पुढे पाहिलीत पहिल्यांदा पाऊल  टाकायला सज्ज झालो. त्याकाळी अंगणवाडी, बालवाडीच्या, यासारख्या ‘जॉनी जॉनी.. एस पप्पा’ म्हणत बालमनाला, इंग्रजी वळणाने वळण लावणाऱ्या ईयत्ता नव्हत्या. मग पाहिलीत नाव टाकतांना गुरुजींनी माझी जन्मतारीख २४/५ करून टाकली आणि मला राष्ट्रीय वाढदिवस महिन्यात सामील करून घेतलं. माझ्यासह वर्गातल्या बहुतेक मुलांची जन्मतारीख मे आणि जून मध्ये आली. तेव्हापासून आजपर्यंत २४ मे माझ्या शाळेच्या दाखल्यात, जन्माचा दाखला देत घुसली आणि पुढे पासपोर्ट आणि आधार कार्डला आधार देत चिकटून राहिली.

लहानपणी कधीमधी वाढदिवस साजरा व्हायचा. गावात वाढदिवस म्हणजे दिव्याने ओवाळणे आणि खायला शिरा वगैरेंसारखं गोढधोड करणे असा असायचा.

माझा वाढदिवस २४/१० ला साजरा व्हायला सुरवात झाली. पण संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान दसऱ्याला वाढदिवस साजरा करायला भाग पडत होता. अधूनमधून शासन दरबारातील लोकं ईमेल, पत्राद्वारे २४ मे ला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून माझ्या तिसऱ्या शासकीय वाढदिवसाची आठवण करून द्यायचे. असा माझा तीन वाढदिवसासह तिरपागडी प्रवास सुरु होता.

काही वर्षांपूर्वी असाच एकदा इंटरनेट चाळत बसलो होतो. डोक्यात विचार आला. ‘माझा जन्म झाला त्या वर्षी दसरा नक्की किती तारखेला होता हे इंटनेटवर शोधूया का?’ ऑनलाईन पंचांग शोधले आणि धक्का बसला. कुठून हे शोधायची दुर्बुद्धी झाली असं वाटलं. त्या साली दसरा २४ तारखेला नाही तर २५ तारखेला होता असं पंचांग वाकुल्या दाखवत मला सांगत होतं. अरे देवा ! म्हणजे आता चार चार वाढदिवस? २४ मे, २४ ऑक्टोबर, दसरा आणि आता २५ ऑक्टोबर !

२४ ऑक्टोबरची, २५ झाल्यामुळे अजून एक वैश्विक लोचा झाला होता. २४ तारखेनुसार माझी रास होती कुंभ. सकाळी पेपरातल्या राशिभविष्यात कुंभाच्या मडक्यात आज काय वाढून ठेवलंय हे पाहायचं. चांगलं लिहिलं असेल तर आजचा दिवस छान आहे असं म्हणत बाहेर पडायचं. आणि आजच भविष्य चांगलं नसलं की ‘हे पेपरवाले  काहीही छापतात, भविष्य वगैरे थोथांड आहे असं म्हणत पेपरला गठ्ठ्यात कोंबत रद्दी बनवायचो. पण आता २५ तारखेनुसार रास झाली होती वृश्चिक. म्हणजे आता पेपरात दोन दोन राशी बघायच्या? आगोदरच चार चार वाढदिवसांच्या कुंभांचं वजन ओढतांना आता वृश्चिकचा विंचू माझ्या राशीला डसला होता. 

एवढं भरभरून प्रेम दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. 

4 thoughts on “वाढदिवसाचा विंचू!”

  1. शब्दांना इतके लवचिक बनवून वापरण्याची कला तुमच्या कडूनच शिकावी. तुमच्या येणाऱ्या अगणित वाढदिवसांसोबत ती ही वृध्दिंगत होवो, ही शुभेच्छा!!

  2. Satish, now you can read the daily predictions for both Aquarius and Scorpio, and select best of both. Tumcha Zodiac madhye pan diversification zhaala aahe. 🙂

Leave a Reply to Sanjivanee S Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

आनंद पिकवणारा देश !आनंद पिकवणारा देश !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 23 January, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ नजर जाईल तेथवर रंगवलेलं हिरवंगार निसर्गचित्र. रस्त्याच्या दुतर्फा चहाचे मळे पार लांबवरच्या डोंगराकडे

भाग- १०. जरा थंड घे!भाग- १०. जरा थंड घे!

गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढलाय. तापमान आणि महागाई यांच्यात शर्यत लागलीय असं वाटतंय. माणूस आणि प्राणी हवालदिल झालेत. मिळेल तिथे सावली आणि गारवा शोधताहेत. ज्यांना पाय आहेत आणि जे

……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो.……आणि आम्ही वाममार्गावरून ढळलो.

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 27 February, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ धाड s धाड s धाड s धाड s असा आवाज करत आमच्या बुलेटी