drsatilalpatil Uncategorized रसायननामा भाग-१

रसायननामा भाग-१

रासायनिक कीटकनाशकांच्या निर्मितीपासून ते निर्माल्यापर्यंतच्या प्रवासावर टाकलेला प्रकाश.

गेल्या महिन्यात केरळ हायकोर्टाने शबरीमाला मंदिर ट्रस्टला ते भक्तांना वाटत असलेला प्रसाद न वाटण्याचे आदेश दिले. असं काय झालं की कोर्टाला देवाचा प्रसाद थांबवण्याचे आदेश द्यावे लागले. त्याचं झालं असं की एका एफएसएसआई  प्रमाणित प्रयोगशाळेने शबरीमाला मंदिरातील प्रसादाचे नमुने तपासले. तपासाअंती हा प्रसाद विषारी असल्याचं दिसून आलं. या प्रसादात त्यांना कीटकनाशकांचे अंश मोठ्या प्रमाणात सापडले. प्रसाद बनवायला जो वेलदोडा वापरला गेला त्यामधून हे कीटकनाशके प्रसादात आली असं लक्षात आलं. ठेकेदाराने जे वेलदोडे पुरवले होते त्यामध्ये १४.०४ मिलिग्रॅम प्रतिकिलो डायथायोकार्बामेट मिळाले. एमआरएल म्हणजे मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट. एखाद्या पदार्थात जास्तीत जास्त किती रासायनिक कीटकनाशके असावीत त्यानुसार हे प्रमाण ठरते. या मानकानुसार डायथायोकार्बामेटचे प्रमाण ०.०१ मिलिग्रॅम प्रतिकिलो पेक्षा कमी असायला हवे होते. म्हणजे मर्यादेपेक्षा हजार पट जास्त डायथायोकार्बामेट प्रसादात सापडले. त्याव्यतिरिक्त दुसरे कीटकनाशक सायपरमेथ्रीन चे प्रसादातील प्रमाण हे १.१० मिलिग्रॅम आढळले. जे की ०.०१ मिलिग्रॅम प्रतिकिलो पेक्षा कमी असणे अपेक्षित होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात कीटकनाशके मिळून सुद्धा, ठेकेदाराचा कोर्टात दावा होता की प्रसादात अत्यल्प प्रमाणात वेलदोडे टाकले जातात. प्रसाद बनवतांना २०० डिग्री तापमानाला ते तापवले जातात. एवढ्या तापमानात कीटकनाशके कसे टिकतील? पण एक गोष्ट ते विसरले की सायपरमेथ्रीन २२० डिग्री तापमानापर्यंत तापवलं तरी विघटित होत नाही. अगदी गुगल केलं तरी ही माहिती मिळू शकते.  बऱ्याचदा विघटन झालेल्या किटकनाशकाचे मेटॅबोलाईट देखील नुकसान पोहोचवतात. सायपरमेथ्रीन पेक्षा त्याच्या विघटनातून तयार होणारे मेटॅबोलाईट जास्त विषारी असतात हे संशोधनांती सिद्ध झालंय.

हे मेटॅबोलाईट म्हणजे काय भानगड आहे हे समजून घेऊया. मेटॅबोलाईट म्हणजे कीटकनाशकाचे होणारे संभाव्य तुकडे. थोडक्यात सांगायचे झाल्यास एखाद्या कीटकनाशकाचे तुकडे होत होत शेवटी पाणी, कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजन सारख्या मूळ घटकांपर्यंत त्याचे विघटन होणे. हे तुकडे सुद्धा बऱ्याचदा घातक असतात. किंबहुना मूळ कीटकनाशकापेक्षा ते जास्त विषारी असू शकतात. प्रयोगशाळेत तपासतांना आपण कीटकनाशकांचे अंश शोधत असतो पण त्यांचे मेटॅबोलाईट मात्र त्यातून सुटतात. युरोप अमेरिकेत कीटकनाशकांच्या अंशाबरोबर त्यांचे मेटॅबोलाईटचे प्रमाण देखील तपासले जाते. वेगवेगळ्या देशात कीटकनाशकां एमआरल चे प्रमाण ठरलेले आहे. भारतात साधारणतः २६८ शेतीरासायनांचे अंश तपासले जातात. हीच यादी युरोपमध्ये आठशेच्यावर जाते.

आपण म्हणाल या कीटकनाशकांचे नक्की काय परिणाम होतात? हे जाणून घेण्यासाठी त्या कीटकनाशकाची किड्यांवर काम करण्याची पद्धत लक्षात घ्यावी लागेल. काही कीटकनाशके पोटविष प्रकारात मोडतात, काही हवेतून किड्याच्या श्वसनसंस्थेमार्फत हल्ला करतात तर काही त्याच्या संपर्कात आल्यावर किड्याच्या त्वचेमधून जाऊन विषारी गुणधर्म दाखवतात. जसे ते किड्याच्या पोटात, त्वचेवर आणि श्वसनसंस्थेवर हल्ला करतात त्याच पद्धतीने माणूस आणि पशुपक्षांवर देखील दुष्परिणाम घडवतात.

कीटकनाशकांचे मुख्यतः दोन प्रकारे दुष्परिणाम जाणवतात. पहिला अक्यूट, बोले तो तीव्र म्हणजे लगेच जाणवणारे दुष्परिणाम आणि दुसरे म्हणजे क्रोनिक म्हणजे दीर्घकालीन. ज्यामध्ये खूप दिवसांनी, महिने किंवा वर्षांनी उध्दभवणारे दुष्परिणाम. पहिल्या प्रकारात उलटी, जुलाब, डोकेदुखी, चक्कर येणे, खाज येणे, सूज येणे या सारखे लक्षणं दिसतात. दीर्घकालीन परिणामात कॅन्सर, जन्मदोष, वांझपणा, रोगप्रतिकारक क्षमता कमी होणे, अल्झायमर, लठ्ठपणा, ल्युकेमिया, पार्किन्सन यासारखे रोग उद्भवतात. एवढंच नाही  तर मधुमेहाच्या जागतिक पँडेमिक मध्ये कीटकनाशकांचा मोठा सहभाग आहे.

हे रसायनांचे अंश येतात तरी कुठून? आणि पसरतात कसे? तर याचं उत्तर आहे अन्न, पाणी आणि हवेतून.  माणसाच्या पंचेंद्रियांवर बाहेरून येणार विष काम करतं. तोंड, नाक आणि त्वचेद्वारे  ते शरीरात प्रवेश करतात. तुम्ही विचाराल की डोळे आणि कानांचे काय? तर त्याच्या द्वारे ही नको असलेल्या विचार आणि दृश्य मेंदूत आत जातात. ते ही एका प्रकारचं विषच आहे की.    

आता हे विष अन्नात कुठून येतं ते पाहूया. तुम्ही म्हणाल कीटकनाशकांचे अंश शेतातून येतात तर ते पूर्णसत्य नाहीये. आपल्याभोवतीच्या कीटकनाशकांच्या विषारी जाळ्याला फक्त शेतात फवारलेली कीटकाशके आणि खते जबाबदार आहेत असं नाहीये. शेतातून पीक बाहेर पडल्यावर पुढे काढणीपश्चात प्रक्रियेत, साठवणुकीदरम्यान वापरलेले रसायने देखील येतात. पुढे जाऊन खाद्यपदार्थांच्या प्रक्रियेत  देखील हे रसायने येतात. 

दुभत्या जनावरांच्या अंगावर रासायनिक कीटकनाशकांचा आठवडी किंवा मासिक फवारा पडतो. किड्यांपासून सुटका होण्यासाठी इंजेक्शन मारले जातात. एवढेच नाही तर दूध काढण्याआगोदर पान्हवण्यासाठी रोज इंजेक्शन टोचून दूध काढले जाते. फॅट वाढवण्यासाठी त्यामध्ये युरिया आणि अजून काहीबाही रसायने टाकले जातात. युरिया काय फक्त शेतात पडत नाही तर दुधाच्या कॅन मध्ये देखील पडतो. या प्राण्यांना खाऊ घातल्या जाणाऱ्या चाऱ्यावरदेखील रासायनिक कीटकनाशके पडतात. अश्या प्रकारे प्राण्यांच्या शरीरातून दुधामार्फत किंवा माणसामार्फत हे रसायन महाराज आपल्या ताटात अवतरतात.  सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत ताजे भाजीपाले आणि फळे खाणे कमी झालेय. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाण्याची फॅशन झालीये. ताज्या पदार्थाला टिकवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. नैसर्गिक रंगला अव्हेरून कृत्रिम रंगात रंगलेले पदार्थ खाल्ले जाताहेत. त्यामुळे अजून जास्त रसायने ताटात येऊन पडताहेत.

अजून एका चोरवाटेने रासायनिक कीटकनाशके आपल्या घरात येतात ते म्हणजे घरात केलेल्या पेस्ट कंट्रोल द्वारे फवारलेली कीटकनाशके. नैसर्गिक प्रायरेथ्रीन आणि बॅसिलस थुरिंजिनसीसी इस्रालीन्सीस (बीटीआय) सोडल्यास जैविक कीटकनाशकाची भारतात सीआयबी द्वारे शिफारस केलेली नाही. सेंद्रिय भाजीपाला आणि दूध ज्या किचन मध्ये वापरले जातात, त्याच स्वयंपाकघरात मुंग्या झुरळांच्या नियंत्रणासाठी फिफ्रोनील, इमिडाक्लोरीड, सायपरमेथ्रीन यासारखे रासायनिक कीटकनाशके  मानाने येऊन बसतात. 

भाजीपाला, फळे, मांस अंडी यासारख्या अन्नातून कीटकनाशके आपल्या शरीरात येतातच पण ते पाण्यातदेखील येतात. वापरलेली कीटकनाशके पावसाच्या पाण्याबरोबर नद्यानाल्यात पोहोचतात. जमिनीत झिरपून ते भूजल प्रदूषित करतात. हेच प्रदूषित पाणी आपल्या घरात येते. मला सांगा नदी, धरण,विहिरीतून आपल्या घरात येणाऱ्या पाण्याला फक्त गाळले जाते, त्याच्यावर तुरटीची प्रक्रिया केली जाते. त्याचा सामू, पाण्याचा जडपणा आणि ईसी तपासली जाते. त्यातील रसायनांचे अंश तपासले जात नाही.  याचबरोबर हवेत पसरलेल्या रसायनांचा फुफ्फुसांवर दुष्परिणाम होतो. अश्या प्रकारे जाळी स्थळी काष्ठी पाषाणी रसायने पोहोचली आहेत. देवासारखे हे रासायनिक व्हिलन सर्वव्यापी झाले आहेत.

कीटकनाशकांचा परिणाम फक्त माणसावरच होत नसून पशु, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव, जलचर, किडेमुंग्या यांच्यावर देखील होतो. गाईम्हशींवर फवारलेल्या कीटकनाशकांचे अंश त्यांच्या रक्तात उतरतात. रक्तातून ते दुधात, दह्यात आणि तुपातदेखील पोहोचतात. कोंबड्यांना दिलेले अँटीबायोटीक अंडी आणि चिकन मार्फत माणसात आपला कुप्रभाव दाखवताहेत. या कोंबडीच्या हार्मोन्समुळे मुलींमध्ये वेळेआधी मासिक पाळी येण्याची व्याधी जडलीये. अँटीबाईटीक टोचलेल्या जनावरांचं मांस खाणाऱ्या गिधाडांवर त्यांचा कुप्रभाव जाणवायला लागलाय.  गिधाडांची संख्या लक्षणीयरीत्या रोडावतेय. जलचरांवरदेखील कीटकनाशकांच्या अंशाचा विपरीत परिणाम होतोय. माश्यांच्या बऱ्याच प्रजाती नष्ट झाल्या आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. 

शेतात फवारले कीटकनाशके जरी शत्रूकिड्यापासून संरक्षण मिळण्यासाठी वापरले असले तरी हे रसायने मित्र किड्यांवर देखील वार करतात. परत जेव्हा शत्रूकीड येते तेव्हा तिला विरोध करायला मित्रकिड नसते. अश्या परिस्थितीत जास्त नुकसान होते. मधमाशी, गांधीलमाशी रसायनग्रस्त झाल्या आहेत.

मित्रांनो, रासायनिक कच्चा माल वापरून फॅक्टरीत तयार झालेले रासायनिक कीटकनाशकांचे उत्पादन, रजिस्ट्रेशन, वापर यापासून ते विघटन होऊन कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि पाणी अश्या मूळ पदार्थात निर्माल्य होईपर्यंतच्या प्रवासावर आपण ये लेखमालेत प्रकाश टाकणार आहोत.

चला तर मग प्रवासाला …

8 thoughts on “<strong>रसायननामा भाग-१</strong>”

  1. रासायनिक खताचा आपल्या आरोग्याला इतका दोखा आहे हे आज कळाले. अत्यंत गरजेच्या विषयावरील लेख. धन्यवाद.

  2. नमस्कार,डी डी टी वरचा लेख वाचला होता.मला वाटते. तो लेखांक दुसरा होता.हा वाचायचा राहिला होता.महत्वाच्या विषयाला तुम्ही हात घातला आहे.भारतात या विषयातले चाललेले मोठे खटले,त्यांचे न्याय निवाडे,झालेल्या शिक्षा यावरही जरुर शेवटच्या लेखात प्रकाश टाकला जावा, प्रबोधनाचा तो एक मार्ग.

  3. डॅाक्टर खुप सुंदर , साध्या व सोप्या भाषेत आपन केलेलं विश्लेषणामुळे या विषयाचं गांभीर्य समजलं . क्रुपया. या वरं काय कराव यांबद्दल मार्गदश्रन करावे . खुप गरजेचा विषय निवडलात . खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

    1. Not being much friendly with Marathi, I could translate this article in English using Chrome” translate feature.

      Hi Satish Sir,
      Thanks for bringing this issue with clear data and facts in your post. Very informative. This is a serious concern for our next generation if everything around us is polluted and full of chemicals. Hopefully government can work with people like you for solution of this crisis created by us, humans. Best wishes

Leave a Reply to प्रा सतीश पाटील. शिंदखेडा जि. धुळे Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

रसायनामा- भाग ४रसायनामा- भाग ४

सुपंथ ! मित्रांनो रसायननामा या मालिकेतील हा शेवटचा भाग. आज उत्पादक, विक्रेता, शासन आणि शेतकरी यांच्या सम्यक सहभागाबद्दल बोलूया. मला एक प्रसंग आठवतो. काही वर्षांपूर्वी माझ्याकडे तेलंगणामधून एक कीटकनाशक उत्पादक आला.

कीटकनाशकांची जन्मकहाणीकीटकनाशकांची जन्मकहाणी

आपल्याला कहाणीमध्ये लै रस असतो. मग ती शेजार(नी)च्या घरातील असो की टीव्ही मधल्या डेलीसोप मालिकांमधली. मग आपल्या रोजच्या आयुष्यातील एक भाग बनलेल्या शेतीरासायनांची कहाणी जाणून घेण्यात तुम्हाला नक्की रस असेल

थाई बिजा पोटी… फळे रसाळ गोमटीथाई बिजा पोटी… फळे रसाळ गोमटी

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 31 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पावसाची रिपरिप सुरु होती. गेले काही दिवस रोज संध्याकाळी चारनंतर, कर्जवसुली करणाऱ्या सावकारागत तो,