drsatilalpatil Uncategorized कीटकनाशकांची जन्मकहाणी

कीटकनाशकांची जन्मकहाणी

आपल्याला कहाणीमध्ये लै रस असतो. मग ती शेजार(नी)च्या घरातील असो की टीव्ही मधल्या डेलीसोप मालिकांमधली. मग आपल्या रोजच्या आयुष्यातील एक भाग बनलेल्या शेतीरासायनांची कहाणी जाणून घेण्यात तुम्हाला नक्की रस असेल हे गृहीत धरून आजचा लेख लिहितोय. आपल्याला ज्ञात असलेला कीटकनाशकांचा इतिहास, ख्रिस्तपूर्व २००० वर्षे मागे जातो. साधारणतः साडेचार हजार वर्षापूर्वी प्राचीन मेसोपोटेमिया मध्ये सल्फरचा कीडनियंत्रणात उपयोग केल्याचे दाखले मिळतात. मेसोपोटेमिया म्हणजे सध्याचा इराण, इराक, कुवैत, सीरिया आणि टर्की हा भाग.

अजून संदर्भ धुंडाल्यावर पुढे १५ व्या शतकात अर्सेनिक, पारा, शिसे असे वेगवेगळे विषारी पदार्थ किड्यांच्या नाशासाठी वापरले गेल्याचे दाखले मिळतात. सतराव्या शतकात तंबाखूपासून निकोटीन सल्फेट वेगळे करून कीटकनाशकाच्या यादीत घातले गेले. काही वर्षांनी जंगली शेवंतीच्या फुलांच्या अर्कापासून पायरेथ्रम जैविक हे कीटकनाशक विकसित झाले. माणूस लई हावरट प्राणी. ये दिल मांगे मोर च्या नादात शेवंतीच्या पायरेथ्रमला, प्रयोगशाळेत रासायनिक पद्धतीने बनवले जाऊ लागले. आता शेवंतीच्या फुलांची गरज संपली.  जास्त तीव्र आणि भरवशाचे रासायनिक पायरेथ्रम, रासायनिक कच्चा माल वापरून कृत्रिमरीत्या फॅक्टरीत बनवले जाऊ लागले. शेवंतीपासून बनवलेल्या नैसर्गिक पायरेथ्रमचा प्रवास पुढे सायपरमेथ्रीन, डेल्टामेथ्रीन, सायहॅलोथ्रीन अश्या रासायनिक भावकीत झाला.

१८७४ मध्ये ‘ऑथमर झेदर’ या ऑस्ट्रियन संशोधकाने डीडीटी बनवले आणि रासायनिक कीटकनाशकाच्या व्यवसायाने वेगळे वळण घेतले. जेव्हा डीडीटी बनले तेव्हा त्याच्या जन्मदात्याला त्याचा कीटकनाशक म्हणून उपयोग होईल याची किंचितही कल्पना नव्हती. डीडीटीचा कीटकनाशक म्हणून उपयोग होऊ शकतो हे गमक स्विस शास्त्रज्ञ ‘पॉल हर्मन मुलर’ याला १९३९ मध्ये गवसले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात झाला. मुलरला त्यासाठी नोबेल पुरस्कार देखील मिळाला. 

चारपाच दशके घराघरात आणि शेताशेतात डीडीटीचा वापर झाला. सरकारनेदेखील त्याच्या प्रसारात मोठी भूमिका बजावली. हे सरकारमान्य विष बिनदिक्कत सर्वव्यापी संचार करत होते. पण १९६२ मध्ये ‘रिचेल कार्सन’ या लेखिकेचे ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक प्रकाशित झाले आणि डीडीटीचे काळे कारनामे प्रकाशात आले. डीडीटी मुळे पर्यावरणावर, पशुपक्षी, माणसावर होणाऱ्या दुष्परिणामांवर त्यांनी लिहले. माणसांमध्ये कॅन्सरचे कारण डीडीटी आहे हे त्यांनी जगासमोर आणले. रासायनिक कीटकनाशक उद्योजकांना सत्य लपवल्या बद्दल त्यांनी जबाबदार धरलं.  डासांना मारण्यासाठी विमानातून फवारल्या गेलेल्या डीडीमुळे चिमण्या नष्ट झाल्या. वसंत ऋतूमध्ये किलबिलनाऱ्या चिमण्या दिसेनाशा झाल्या. भर वसंतात भयाण निरव शांतता पसरली आणि पर्यावरणाचा तोल ढासळला. यावरूनच त्यांनी ‘निशब्द वसंत’ म्हणजे सायमेन्ट स्प्रिंग असं नाव त्यांच्या पुस्तकाला दिलं. रिचेल कार्सन यांच्या पुस्तकामुळे जनजागृती झाली. वाढत्या जनाक्रोशामुळे १९७२ मध्ये अमेरिकेत डीडीटी वर बंदी घातली गेली.  अमेरिकेत ते बंद झाले खरे पण जगभरात पुढचे ३२ वर्षे त्याचा सर्रास वापर सुरु होता. पुढे २००४ च्या स्टोकहोम परिषदेत डीडीटीवर जागतिक बंदी घातली गेली आणि ‘ऑथमर झेदर’ ने बाटलीबाहेर काढलेल्या ब्रह्मराक्षसाला कुलूपबंद केले गेले. पण इतिहासजमा झालेले डीडीटी खरंच इतिहासात जमा झालेय का? हे उत्तर देणे कठीण आहे. डीडीटीचा अर्धायुष्य काळ पंधरा वर्षापर्यंतच्या आहे. म्हणजे एकदा वापरलेले डीडीटी पंधरा वर्षे वातावरणात टिकून राहते. पण त्याचे तुकडे डीडीटी पेक्षाही टिकाऊ आहेत. डीडीटीचा एक तुकडा ‘डीडीई’ हा २० वर्षे वातावरणात टिकू शकतो. डीडीई च्या तुकड्यांचे टिकाऊपण किती आहे ? असं विचारताय का? ते सांगणे कठीण आहे. अश्या प्रकारे डीडीटी संपूर्णपणे निसर्गातून नष्ट झालाय का हे सांगणे कठीण आहे. बाटलीतून अन्नात, अन्नातून प्राणीमात्रात आणि प्राणिमात्रातून निसर्गात असा त्याचा अश्वस्थम्यासारखा अस्वस्थ प्रवास सुरु आहे. वातावरणात सोडलेले रासायनिक ब्रह्मराक्षस अजूनही अतृप्त आत्म्यासारखे आपल्याला पछाडत निसर्गात भटकताहेत.

कीटकनाशकांचा इतिहास जाणून घेतला, आता त्याची जन्मकहाणी जाणून घेऊया. आपण वापरात असलेली शेतीरासायने बनवतात तरी कशी?याची ढोबळ मानाने का असेना पण कल्पना घेऊया. त्यासाठी त्यांच्या निर्मितीप्रक्रियेची छोटीशी सफर करूया. कीटकनाशकाचे सगळ्यात सुरवातीला सक्रिय तत्व शोधले जाते. रासायनिक किंवा सिंथेटिक कीटकनाशकात ते कसे बनवतात ते पाहूया. लहान मुलांच्या खेळात जसं वेगवेगळे ठोकळे जोडून घर, कार वैगरे आकार बनवले जातात, तसे रासायनिक कीटकनाशकात कार्बन, हैड्रोजन, नायट्रोजन, क्लोरीन, ब्रोमीन ई. सारख्या मूळ मूलद्रव्यांच्या अणूंचे ठोकळे जोडून वेगवेगळे रेणू बनवले जातात. या रेणूंची परिणामकारकता अपेक्षित कीड-रोगा वर तपासली जाते. असे शेकडो, नव्हे हजारो रेणू धुंडाळल्यावर एखादा परिणामकारक रेणू हाताशी लागतो. हा झाला सक्रिय घटक. रासायनिक कीटकनाशकांचे सक्रिय घटक असे बनवतात. जैविक किंवा अरासायनिक कीटकनाशकात सक्रिय घटक हा वनस्पती, प्राणी किंवा सूक्ष्मजीवांपासून बनवला जातो. उदारहर्णार्थ कडुलिंबापासून अझाडिरेक्टीन काढतात, ट्रायकोडर्मा सारख्या बुरशी किंवा बीटी सारखे जीवाणू वाढवून त्यांच्यापासून जैविक कीटकनाशके बनवले जातात.    

या सक्रिय तत्वाला फॉर्मुलेशन म्हणजे सुत्रीकरणात बांधण्याचं काम पुढच्या टप्प्यात केलं जातं.  या सुत्रीकरणात दोन महत्वाचे घटक असतात. पहिला म्हणजे सक्रिय तत्व आणि दुसरा म्हणजे त्या सक्रिय घटकाला टिकवून, योग्य जागी पोहोचवुन त्याच्याकडून अपेक्षित परिणाम मिळवून देणारे असक्रिय घटक. योग्य परिणामासाठी हे दोन्हीही घटक महत्वाचे आहेत. त्यातील पहिलं म्हणजे सक्रिय तत्व हे शेतीरासायनांच्या चित्रपटातील मुख्य हिरोची भूमिका बजावतं. शेतीऔषधात ज्या घटकामुळे कीड किंवा रोग नियंत्रणात येतात त्याला सक्रिय घटक असं म्हणतात. म्हणजे ‘अझाडिटेक्टीन ३०० पीपीएम’ या प्रॉडक्ट मध्ये ०.०३ टक्के अझाडिटेक्टीन आहे. हे झालं त्यामधील सक्रिय तत्व. उरलेलं ९९.९७ हे इतर घटक आहेत. या  इतर घटकांमध्ये सक्रिय तत्वाला शेवटपर्यंत बाटलीबंद अवस्थेत टिकवून ठेवणारे ‘स्थिरक’ म्हणजे स्टॅबिलायझर, त्याला फवारणीच्या वेळी पाण्यात मिसळून ठेवणारा साबण म्हणजे ‘इमल्सिफायर’ आणि शेवटी बाकी शंभर टक्के भरावी म्हणून भरावासाठी भाराभरती साठी टाकलेले ‘इनर्ट’ म्हणजे ‘निष्क्रिय’ पदार्थ यांचा समावेश आहे. हे निष्क्रिय पदार्थ साईड हिरोची भूमिका निभावतात. कीटकनाशकातील ‘सक्रिय’ हिरोच्या परिणामकारकतेसाठी या ‘निष्क्रिय’ साईड हिरोची भूमिका फार महत्वाची ठरते.

शेतीरासायनांचे फॉर्मुलेशन म्हणजे सुत्रीकरण महत्वाचे आहे. ईसी, डब्लूपी, डब्लूडीजी यासारखे सुत्रीकरणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. सक्रिय घटकाचा स्वभाव कसा आहे आणि त्याचा कोठे आणि कसा उपयोग करायचा आहे यावरून सुत्रीकरण सुत्रीकरणाचा प्रकार निवडला जातो. जर सक्रिय तत्व तेलकट द्रव असेल तर त्यामध्ये साबण टाकून त्याचे इमल्सीफायेबल कॉन्सन्ट्रेट म्हणजे ईसी सुत्रीकरण बनवतात. म्हणजे ते पाण्यात नीट मिसळून व्यवस्थित फवारात येईल. जात का सक्रिय घटक मातीत मिसळायचे असेल त्याचे ग्रॅनुल म्हणजे दाणेदार सुत्रीकरण केले जाते. त्यामुळे दाणेदार उत्पादन मातीत टाकणे सोपे जाते. शेतीरासायनाला किती दिवस डब्ब्यात ठेवायचे आहे म्हणजे त्याचे शेल्फ लाईफ किती असेल यासाठीदेखील सुत्रीकरण महत्वाचे आहे.

सुत्रीकरणाचा अजून एक फायदा म्हणजे किती सक्रिय तत्व कीडरोगापर्यंत पोहोचवायचे आहे हे ठरवणे. कोणतेही औषध कमी मात्रेत घेतल्यास औषध आणि जास्त घेतल्यास विष असते. आता ‘२, ४, डी’ या तणनाशकाचे उदाहरण घ्या. जास्त प्रमाणात वापरले की ते तणनाशक म्हणून काम करते आणि आणि कमी मात्रेत ते पीजीआर म्हणजे वाढनियंत्रकाचे काम करते. कीटकनाशकाच्या मात्रेची अति झाली की पिकाची माती झालीच समजा. माणसाचे देखील असेच असते बरं का.

नवनवीन सक्रिय तत्व आणि त्याचे फॉर्मुलेशन बनवण्याचे काम कंपनीच्या ‘आर अँड डी’ म्हणजेच संशोधन आणि विकास विभागात केले जाते. हे खर्चिक आणि वेळखाऊ काम आहे. मोठमोठ्या कंपन्यांकडे संशोधन विभाग नवीन उत्पादन विकसित करण्यात कार्यरत असतो. त्यामध्ये करोडो रुपये खर्च होतात.

एकदा का सक्रिय तत्व बनवले, त्याचे फॉर्मुलेशन केले कि मग त्याला बाटलीबंद केले जाते. कीटकनाशक द्रव आहे कि घन यावरून पॅकिंगचा प्रकार ठरतो. यासाठी कायद्याने कोणते पॅकिंग मटेरियल वापरायला हवे याचे बंधन घालून दिले आहे. कारण कीटकनाशकाने बाटलीच्या प्लॅस्टिकांबरोबर किंवा बॉक्सबरोबर अभिक्रिया करू नये आणि ठरवलेल्या काळापर्यंत पॅकिंगमध्ये स्थिर असावे हा त्यामागचा हेतू.

शेतीरासायनाचा इतिहासआपण जाणून घेतला. त्यांच्या निर्मितीपासून ते बाटलीबंद होण्याचा प्रवास पहिला. पुढील भागात शेतीरसायना संबंधीचे कायदे, विक्री, वितरण आणि योग्य वापर याची माहिती घेऊया. 

 

2 thoughts on “कीटकनाशकांची जन्मकहाणी”

Leave a Reply to Ketan Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

महत्वाचा फवारा सहाय्यक: स्प्रेडरमहत्वाचा फवारा सहाय्यक: स्प्रेडर

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 11 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ मागच्या लेखात आपण फवारा साहाय्यकाची माहिती घेतली. आज फवारा साहाय्यक कुळातील ‘स्प्रेडर’ या प्रकारची

कीटकनाशकाच्या बाटलीचा दिल्ली ते गल्लीपर्यंतचा प्रवास !कीटकनाशकाच्या बाटलीचा दिल्ली ते गल्लीपर्यंतचा प्रवास !

जैविक असो किंवा रासायनिक,  कीटकनाशकाची बाटली आपल्यापर्यंत कशी पोहोचते? याचा प्रवास आजच्या लेखात पाहूया. आपल्या शेतात, बागेत वापरत असलेलं कीटकनाशक आपल्या बंधाशी येईपर्यंत कोणकोणत्या दिव्यातून पार पडतं हे जाणून घेणं

गो… गोचीड… गो ! (भाग-१)गो… गोचीड… गो ! (भाग-१)

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 13 June , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ शेतकरी आणि पाळीव प्राण्यांच्या मालकात सध्या गोचीड ही मोठी डोकेदुखी ठरलीय. मेडिकलच्या दुकानातून गोचीडाच्या