drsatilalpatil Tondpatilki भाग- २३. रेन! रेन! गो अवे

भाग- २३. रेन! रेन! गो अवे

भाग- २३. रेन! रेन! गो अवे post thumbnail image

अंगकोरवाट म्हणजेच कंबोडियाच्या सांस्कृतिक राजधानीतून सायकलिंग करत आम्ही थायलंडमध्ये प्रवेश केला होता. उत्तर थायलंडच्या रॅनॉन्ग या शहरात आम्ही पोहोचलो. दिवसभरच्या पायडलपीटीने जरा दमछाक झाली होती. संध्याकाळची वेळ होती. शॉवर घेतला आणि खाण्यासाठी एखादं चांगलं हॉटेल मिळतं का हे शोधायला बाहेर पडलो.  थोड्या शोधाअंती लहानसं, स्वच्छ असं रेस्टारंट मिळालं. छोट्याश्या हिरव्यागार टेकडीवजा उंचवट्यावर ते दिमाखात बसलं होत. आजूबाजूची झाडी आणि हिरवळ त्याच्या सौंदर्यात भर टाकत होती. ‘सवादी साssर अशी मंजुळ साद घालत ती थाई ललना मेनूकार्ड घेऊन आली. २-३ पदार्थांवर बोट ठेवत ऑर्डर पक्की केली. ‘खामखुन खाssआ!’ असं म्युझिकल धन्यवाद देत ती आली तशी किणकिणत किचनच्या दिशेने निघून गेली.

जेवण येईपर्यंत येथील परिसराचा अंदाज घेऊ लागलो. या हॉटेलमध्ये सगळीकडे आकाशकंदिला सारख्या पताका लावल्या होत्या. इथं उत्सव वगैरे आहे का? म्हणून विचारलं. यावर, ‘त्या पावसाला पळवण्यासाठी लावल्या आहेत’ असं उत्तर मिळालं. काय? पावसाला पळवायला? मी उडालोच. आपल्याकडे ‘येरे! येरे! पावसा’ म्हणतात, पण इकडे मात्र ‘जारे! जारे ! पावसा’ म्हणत पताका बांधतात. कुतूहल चाळवलं आणि अजून माहिती काढायला सुरवात केली. इकडे भरमसाठ पाऊस कोसळतो. कधीकधी तो चिकट पाहुण्यासारखा लांबचा मुक्काम ठोकतो. मग नद्यानाल्यांना पूर येतात. शेतीचं नुकसान होतं, लोकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प होतात. त्यामुळे पाऊस थांबवा म्हणून असे तोटके केले जातात.

अशीच अजून एक धारणा पाऊस थांबवण्यासाठी थायलंड मध्ये वापरली जाते. एखाद्या कुमारिकेला गवती चहा द्यायचा आणि तिला तो मातीत खोचायला सांगायचा. त्यामुळे पाऊण येणार नाही आणि दिवसभर सूर्य तळपत राहील अशी थाई समाजात समज आहे. या प्रथेला ‘बपाक क्ता क्राई’ असं म्हणतात. याच वर्षी बँगकॉक मधील पेपरातल्या  बातमीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पावसाने वैतागलेल्या भाजीपाल्याच्या दुकानदाराने एक किलो गवती चहा बायकांना फुकट वाटला होता म्हणे. याच आशेवर की, त्यातल्या कुमारिका तो मातीत लावतील आणि हा पाऊस थांबेल. या उपायामुळे पाऊस थांबेल की नाही, ते माहित नाही पण ओल्या दुष्काळात कुमारिकांना जोडधंदा म्हणून पाऊस पळवायची कामं मिळू शकतील अशी ओली आशावादी कोटी मात्र मनात तरळून गेली. 

आपल्याकडे देखील वेगवेगळ्या आदिवासी जमातींमध्ये पाऊस पाडण्याचे आणि पळावयाचे तोटके वापरले जातात. माझ्या लहानपणी, धनगर लोकांच्या बाबतीत ऐकलेली गोष्ट म्हणजे. हे लोकं गारपीट रोखण्यासाठी करंगळी कापून देवाला आवाहन करायचे आणि त्यामुळे गारा थांबायच्या असं मोठे सांगायचे. गावाबाहेरच्या शेतात आपला पाल टाकून बसलेले धनगर त्यामुळे नेहमी कुतूहलाचे विषय असायचे. यावर्षी तर पावसाने वैतागलेल्या नेटकऱ्यांनी बेडकांचा घटस्फोट करायचा मिश्किल सल्ला देखील दिला. 

पावसाच्या पळवापळवीचे संदर्भ जगभरात आढळतात. अगदी सध्याच्या आधुनिक काळात देखील. मंत्रोपच्चाराने पाऊस पळवायचा व्यवसाय इंडोनेशिया मध्ये तेजीत आहे. इथे मोकळ्या मैदानात कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर आयोजक ‘रेन मास्टर’ म्हणजे पाऊस थांबवणाऱ्याला पाचारण करतात. कार्यक्रमाआधी हा ‘पाऊस मास्तर’ पाली भाषेतील मंत्रोपच्चार करतो. पर्जन्यदेवाला फळं, अंडी आणि पेयपानाचा नैवद्य दिला जातो. एका कार्यक्रमासाठी पाऊसबंदी करायची त्याची फी असते फक्त तीस लाख रुपये! दचकू नका, हे इंडोनेशियन रुपये आहेत. भारतीय रुपयात ते होतात साधारणतः पंधरा हजार. बालीमधील एक कंपनी तर ‘पाऊस पळवून मिळेल होs s ! अशी इंटरनेटवर जाहिरात देखील करते. या पाऊसबंदीला तसा शास्त्रीय आधार नाहीये पण तरीही इंडोनेशियामध्ये लग्नसमारंभ, संगीताचे कार्यक्रम आणि क्रीडास्पर्धांमध्ये पाऊसमस्तरांची सेवा न चुकता घेतली जाते हे मात्र खरं.

दक्षिण आफ्रिकेतील काही जमातीमध्येही पाऊस पळवणारे लोक आहेत. पण मलेशियन लोकांचा पाऊस पळवण्याचा कार्यक्रम मात्र अगदी स्वस्त आहे. त्यासाठी ते कांदा आणि मिरची एका काठीला टोचतात आणि जमिनीत उभे खोचतात. अमेरिकेसारख्या प्रगत देशातदेखील पाऊस पाळावयाची प्रथा आहे. येथील ‘सांता क्लारा’ मध्ये  पाऊस थांबवण्यासाठी चर्चमध्ये अंडी वाहतात. आयरिश कॅथॉलिक प्रथेनुसार ‘चाईल्ड ऑफ प्राग’ या देवाचा पुतळा अंगणात ठेवायचा म्हणजे तो पावसाला थांबवतो.

यावर्षीचा पाऊस फक्त आपल्याकडे कोसळला असं नाहीये. पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला ‘ग्रीनलॅन्ड मध्येदेखील तो पडला. पण त्याचं इथलं पडणं जगावेगळं होतं. ग्रीनलॅन्ड हा उत्तर ध्रुवाजवळील देश. आर्टिक आणि ऍटलांटिक महासागरांमध्ये बसलेलं हे जगातलं सगळ्यात मोठं बेट आहे. या वर्षी ग्रीनलंड मध्ये पाऊस झाला खरा पण संपूर्ण जगाने त्याची दाखल घेतली. हा पाऊस एवढा खास का आहे की जगाने त्याची दाखल घ्यावी? कारण ग्रीनलँडच्या इतिहासात इथं पहिल्यांदा पाऊस पडला. या देशाचा बहुतांश पृष्ठभाग वर्षभर बर्फाखाली असतो. ग्रीनलँडची बर्फाची ढाल सुमारे साडेसहा लाख मैल पसरलीय. म्हणून इथलं तापमान कायम शून्य शंखाली असतं. त्यामुळे इथं पाऊस पडत नाही, तर डायरेक्ट बर्फवृष्टी होते. ‘लै पावसाळे बघितलेत!’ असा मात्र डायलॉग इथल्या लोकांना मारता येत नाही.

ग्रीनलॅन्ड चा हा पाऊस कोसळला तो तब्ब्ल ३३७००० मैलां वर. म्हणजे संपूर्ण देशातील बर्फाच्या निम्म्या भागावर, तीन दिवस पाऊस कोसळत होता. आपल्याकडे पाऊस आला की थंडी वाढते. पण आगोदरच थंड असलेल्या ग्रिलँडमध्ये गोठणबिंदूच्या खाली तापमान असल्याने. पाऊस आला की तापमान गोठणबिंदूच्या वर येते आणि बर्फ वितळायला लागतो. या तीन दिवसात ७०० कोटी लिटर पाणी या बर्फावर बदाबदा कोसळलं. त्यामुळे उबदार वातावरण झालं. त्यांचं उबदार म्हणजे शून्याच्या वर. त्यामुळे बर्फ वितळण्याला सुरवात झाली.

अमेरिकेच्या ‘यूएस नॅशनल स्नो अँड आईस डेटा सेन्टर’ १९५० पासून नोंदी बर्फाच्या घेतायेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढलंय. ज्या दिवशी हा पहिला पाऊस झाला त्या दिवशी बर्फ वितळण्याचा वेग नेहमीपेक्षा सात पटीने जास्त होता. ग्रीनलंडने या वर्षी दशकातला सर्वात मोठा वितळण्याचा सोहळा अनुभवला होता. एका दिवसात तब्ब्ल ८५० कोटी टन बर्फ वितळला होता.

युनाइटेड नेशन्स ची ‘कोड रेड’ अहवालानुसार जीवाष्म इंधनाच्या ज्वलनामुळे गेल्या २० वर्षात ग्रीनलँडची इसक्रीम वितळतेय. २०१९ मध्ये ५३२० कोटी टन बर्फ वितळून समुद्रात स्वाहा झाला होता. त्यामुळे जगभरातल्या समुद्राची पातळी १.५ मिलीमीटरने वाढली. हवामान शास्रज्ञ म्हणताहेत की बारमाही बर्फाच्या दुलईत लपलेला आर्टिक महासागरात २०५० पर्यंत बिनबर्फाचा उन्हाळा पाहायला मिळेल. त्यामुळे मुंबई, न्यूयॉर्क आणि अमस्टरडॅम सारखे शहरं पाण्याखाली जातील. ग्रीनलंड वासियांसाठी हा पहिला पाऊस मात्र जगबुडीची नांदी देणारा पाऊस ठरतोय हे नक्की.

 

जागतिक तापमानवाढीमुळे पर्जन्यचक्राचं पोट बिघडलय. भारतात जेंव्हा पाऊस कोसळत होता, पाकिस्तानला पुर पार ‘पुरा’तन काळात ओढून नेत होता, त्याचवेळी हिरव्यागार युरोप, अमेरिका आणि चीनमध्ये नद्यानाले कोरडे पडत होते. हा विरोधाभास या वर्षी जरा जास्त जाणवला. मानवाच्या पावलागणिक निसर्गाचा ह्रास होतोय. पर्यावरणाचा लचका तोडत आपण या खेळातला नियम आगोदर मोडला आणि रडीचा डाव खेळलाय. त्यामुळे निसर्गचक्रांनी देखील बेतालपणे, नियम मोडत हा खेळ खेळायला सुरवात केलीय. आता आपल्याला नियम नसलेल्या खेळात  भाग घ्यावा लागतोय.

या पुढे पाऊस पडला तर, एकदम जोरात, एकाच ठिकाणी कोसळेल, किंवा गुपचूप दडी मारून बसेल. कधी आठवडे, महिने मुक्काम करेल तर कधी फिरकणारसुद्धा नाही. दुष्काळी भागात सुकाळ येईल आणि सुकाळी पट्ट्यात ‘ड्राय डे’ ची पाळी येईल. आपल्याला पावसाचा लहरीपणा लक्षात घेऊन शेतीची कामं, दैनंदिन व्यवहाराचं नियोजन करायला लागेल. वेळेनुसार ‘येरे! येरे! पावसा बरोबर ‘रेन! रेन! गो अवे’ म्हणायची मानसिक तयारी ठेवावी लागेल.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “भाग- २३. रेन! रेन! गो अवे”

  1. भारी. पाऊस थांबवण्याच्या क्लृप्त्या वाचून मजा आली. उद्बोधक माहिती.

Leave a Reply to Prashant Pimpalnerkar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

भाग- १६.  ये जवळ ये… !भाग- १६.  ये जवळ ये… !

घरातून ऐकू येणाऱ्या गोंगाटामुळे, अंगणात बसून पुस्तकात रमण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिंटूचे लक्ष विचलित झाले. पुस्तक बाजूला ठेऊन तो घरात आला. नेहमीप्रमाणे त्याचे वडील आणि काकांचे भांडण सुरु होते. त्याचे वडील

भाग-५: अ-विश्वासभाग-५: अ-विश्वास

भाग ५ : अ-विश्वास डोळ्यावर काळाकुट्ट अंधार पसरला होता. वातावरणात स्पिरिटचा मंद दर्प रुंजी घालत होता. लांबवर कुठेशी हळू आवाजात कुजबुज ऐकू येत होती. आपण नेमके कुठे आहोत हे  रावसाहेबांना

भाग- २२. कागज के फुल !भाग- २२. कागज के फुल !

जेव्हा मी पहिल्यांदा भारताबाहेर गेलो तेव्हा एका गोष्टीने माझी गोची केली होती, आणि ते म्हणजे तिथल्या संडासात नसलेले पाण्याचे जेट फ्लॅश. विमानतळ, हॉटेल, सार्वजनिक संडास, अगदी सगळीकडे बिनपाण्याचा कार्यक्रम होता.