drsatilalpatil Tondpatilki भाग- ११: दया कुछ तो गडबड है !

भाग- ११: दया कुछ तो गडबड है !

<strong>भाग- ११: दया कुछ तो गडबड है !</strong> post thumbnail image

मला लहानपणी, बस स्टॅण्डवर मिळतात तसली पॉकेट बुक्स वाचायची सवय लागली होती. खुनी कौन? गहरा सच, वगैरे डिटेक्टिव्ह कहाण्या वाचत बकऱ्या चारताना, शेतात बांधावर बसून, झाडावर बसून, अंगणात खाट टाकून किंवा छतावर चटई टाकून या रहस्यकथा वाचण्यात मी रंगून जायचो. मोठेपणी आपण डिटेक्टिव्ह होऊ असं ठरवलं होतं. कहाणीतील डिटेक्टीव्हने खुन्याला पकडला की, त्याची कॉलर पकडून मीच त्याला पोलिसांच्या तावडीत देतोय असं दिवास्वप्न मी पाहायचो. गावात एकमेव टीव्ही आला तेव्हा कृष्णधवल ‘व्योमकेश बक्षी’ ने त्या विचारांना अजून खतपाणी घातलं. मोठं झाल्यावर डिटेक्टिव्ह होता आलं नाही. पण ते कसब जागोजागी कामाला आलं. पुण्यनगरीत नोकरी शोधण्यासाठी, पीएचडी गाईड मिळवण्यासाठी, धंद्यात पडल्यावर लायसेन्स, रजिस्ट्रेशनची कसरत करण्यासाठी माझ्यातील डिटेक्टिव्हचं कसब पणाला लागलं. निदान मेडिकल डिटेक्टिव्ह तरी होता येईल का? या आशेने पुणे विद्यापीठाशेजारील फॉरेन्सिक प्रयोगशाळेसमोर शेकडो चक्कर मारले असतील.

म्हणूनच की काय, संशोधन, व्यवसाय, वाचन, प्रवास यासारख्या माझ्या दैनंदिन गोष्टींमध्ये काड्या करायची, त्याचं ऍनालिसिस करायची सवय लागली. या सवयीनुसार कीस काढून अभ्यास केलेली अशीच एक सत्य घटना आपल्याला सांगणार आहे.  तर मेहेरबान, कदरदान सावरून बसा आणि रहस्यमयी सत्यकथा ऐका. 

आफ्रिकन देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. खासकरून जंगल सफारी, वन्यजीव हे इथलं आकर्षण. जसं आपल्याकडे कृषिपर्यटन असतं ना, तसं त्यांच्याकडे ‘साहस पर्यटन’ असतं. या साहसपर्यटनासाठी खासगी जंगलं आहेत. म्हणजे लोकांनी, जंगलात हजारो एकरच्या जमिनीच्या तुकड्यावर खासगी ‘हंटिंग पार्क’ बनवलेत. त्या खासगी जंगलात हजारो वन्यप्राणी फिरत असतात. त्यांना काय माहित की ज्या जमिनीवर आपण चरतो आहोत तिच्या सातबारावर कुणाचं तरी इंग्रजाळलेलं आफ्रिकन   नाव लागलाय ते. मग हे साहस पर्यटनवाले शिकारीची पॅकेज विकतात. तुम्हाला कोणत्या प्राण्याची शिकार करायचीय, त्यानुसार भाव ठरलेला असतो. म्हणजे हरीण मारायचं असेल तर दोन लाख रुपये मोजायचे. सिंहाच्या शिकारीसाठी मात्र हरणाच्या तीनचार पट जास्त पैसे मोजावे लागतात. जंगलाच्या राजाच्या जीवाचं मोल जास्त असणं स्वाभाविकच आहे. त्याच्यात अजून पॅकेज आहेत. सिंहिणीसाठी जास्त भाव द्यावा लागतो, सिंह त्यामानाने जरा स्वस्तच. सिंह आणि सिंहीणीची जोडीने शिकार करायची असेल तर अंमळ डिस्काउंट देखील मिळतो. घरात मानिम्याव बनणारे, बंदुकीच्या आणि पैशांच्या जोरावर निरपराध जनावरांची शिकार करणारे तिरसिंगराव,  मोठा तीर मारला म्हणत, शिकारीबरोबर फोटोसेशन करतात.

अश्याच एका आफ्रिकेतल्या शिकारी फार्म वर घडलेली ही रहस्यमयी घटना आहे. १९८० च्या दशकातली ही गोष्ट आहे. देशात भीषण दुष्काळ पडला होता. माणसांनाच अन्नपाणी मिळणे दुरापास्त झालं होतं, तिथं जनावरांचे हाल कोण पुसणार. जंगली जनावरांसाठी चारा मिळनं कठीण झालं होत. इथं ‘कुडू’ जातीची हरणं मोठ्या प्रमाणात आहेत. दोनअडीचशे किलोच्या या प्राण्याची, दुष्काळात होरपळ सुरु होती. पाण्याअभावी, झाडं झुडुपं निष्पर्ण झाली होती. या दुष्काळात पानांचे काटे करून पाणीबचत करणाऱ्या काटेरी बाभळाव्यतिरिक्त, इतर झाडांनी नांगी टाकली होती. कुडू हरणांसाठी काटेरी बाभूळ हेच अन्न उरलं होत. कुडुंचा कळप काट्यातुन बाभळीची बारीक पाने निवडून खात, आपला गुजारा करत होता. पावसाळा येईपर्यंत तरी त्यांना असंच भागवावं लागणार होतं.

इथल्या जंगलात, दुष्काळाच्या काटकसरीच्या काळात, सगळं व्यवस्थित सुरु असतांना काही विचित्र घटना घडायला लागल्या. मोठ्या प्रमाणात मेलेली ‘कुडू हरणं’  जंगलात दिसू लागली. बरं मेलेली हरणं कोणत्याही शस्त्राने किंवा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात मेलेली दिसत नव्हती. त्यांच्या शरिरावर कोणतीही जखम नव्हती. अजून एक निरीक्षणात आलं की, पार्कच्या ज्या भागात जास्त ‘कुडू’ चरायचे, त्या भागात मृत्यूचं प्रमाण जास्त होत. दुसरीकडच्या भागात हरणांची संख्या तुरळक होती, तिकडे मृत्यूचं आढळून आलं नाही.

पार्कच्या मालकांनी डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी पोस्टमार्टेम केलं, कसून तपासणी केली. पण त्यांना कोणत्याही परोपजीवीचा किंवा रोगजंतूचा संसर्ग आढळून आला नाही. त्यांनाही कुडू हरणांच्या रहस्यमयी मृत्यूचं गूढ उलगडत नव्हतं. या रहस्याचा पर्दाफाश करण्यासाठी शेवटी शास्रज्ञांच्या चमूला बोलावलं गेलं.

कुडुंची पचनसंस्था गाईसारखी असते. गाईसारखं, पोटात अन्न आंबवून ते पचवतात. मेलेल्या हरणांच्या पोस्टमार्टेम नंतर एक गोष्ट लक्षात आली, की ज्या भागात जास्त कुडू चरायचे, आणि जिकडे मृत्यूचं प्रमाण जास्त होत, त्या भागातील हरणांच्या पोटातील अन्न आंबवण्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालं होतं. हरणांच्या पोटातील अन्न पचवण्याचा वेग फारच मंदावला होता. हे नमुने प्रयोगशाळेत तपासल्यावर, एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे मेलेल्या हरणांच्या शरीरात ‘टॅनीन’ या रसायनाचं प्रमाण जास्त होत. ‘टॅनीन’ हे रसायन काही झाडं, स्वतःचा रासायनिक डिफेन्स म्हणून वापर करतात. पाने खाणारे किडे आणि रोगजंतूंना, आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी ‘टॅनीनास्त्राचा’ उपयोग झाडं करतात. सामान्यतः झाडामध्ये ‘टॅनीन’ फारच कमी प्रमाणात तयार होतं. जिवाणू आणि किड्यांच्या नियंत्रणासाठी ही मात्र पुरेशी असते. पण कुडू हरणासारख्या मोठ्या प्राण्यांसाठी मात्र हे प्रमाण फारच शुल्लक होतं. झाडाची पाने खाऊन हरणांच्या पोटात आलेलं ‘टॅनीन’, त्यांच्या विष्ठेवाटे बाहेर पडतं. प्राण्याला त्याचा काहीही फरक पडत नाही. पण या केसमध्ये कुडू हरणांच्या पोटात मोठ्या प्रमाणात टॅनीन सापडलं होत. जास्त टॅनीन मुळे त्यांच्या पोटातील अन्नपचन प्रक्रिया मंद होऊन त्यांचा मृत्यू झाला होता हे आता सिद्ध झालं होतं.

आता प्रश्न हा होता की झाडांमध्ये कमी प्रमाणात असलेलं हे नैसर्गिक विष, एवढ्या मोठ्या प्रमाणात हरणांच्या पोटात कसं आलं? नैसर्गिकरित्या एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅनीन झाडांमध्ये तयार होणं अशक्य आहे. मग, एवढं टॅनिन इथं आलं कसं? कुणी टॅनिनची इंजेक्शन देऊन हरणांना मारलं असेल का? कुणी त्यांच्यावर विषप्रयोग तर केला नसेल? बेकायदेशीर शिकारी तर यामागे नसतील? अश्या विषारी शंकाकुशंका त्यांना येऊ लागल्या. पण जगभरात बेकायदेशीर असणारी शिकार ज्या देशात कायदेशीर आहे, तिथं बेकायदेशीर शिकारी काय करतील? हा प्रश्न मला पडला. असो, या केस वर मेडिकल डिटेक्टिव्ह बरोबर, पोलिसदेखील कामाला लागले.

सध्या शास्रज्ञांच्या हातात दोन पुरावे होते. एक म्हणजे, मोठ्या संख्येने, कळपात चरणाऱ्या हरणांमध्ये बळींची संख्या जास्त होती आणि दुसरा म्हणजे टॅनीन मुळेच मृत्यू झाले होते. एक मत असं होतं की बाभळीच्या झाडाने हरणांना मारलं. किड्यांना मारणाऱ्या, भरपूर वनस्पती निसर्गात अस्तित्वात आहेत. जवळपास ६५० मांसाहारी झाडं जगभरात आपलं मांसाहारी अस्तित्व टिकवून आहेत. पण बाभळाचं झाड, जास्तीत जास्त काट्याने काटा काढू शकतं, किंवा त्याच्यातील पिटुकलं ‘टॅनीन’ किड्याला पळवू शकतं. पण दोनअडीचशे किलोच्या ‘कुडू हरणाचा’ काटा काढायची ऐपत त्याची नक्कीच नव्हती. हे कोडं उलगडणं गरजेचं होत.

आता शास्रज्ञानी गुन्ह्याच्या जागेवर, म्हणजे जंगलात तपास करायचं ठरवलं. त्यांनी बाभळीच्या झाडाच्या काट्यांचे, पानांचे वेगवेगळे नमुने घेतले. प्रयोगशाळेत तपासले आणि त्यांना धक्काच बसला. साधारणतः जेवढ्या प्रमाणात टॅनिन झाडात असतं त्याच्यात तीनचार पट जास्त टॅनिन, त्या बाभळीच्या झाडात आढळून आलं. अजून खोलात गेल्यावर लक्षात आलं की, जंगलाच्या ज्या भागात मोठ्या संख्येने हरणं चारायची त्या भागातील बाभळीत टॅनिन जास्त होतं. कमी हरणांच्या भागात पानातील टॅनिन कमी होत. म्हणजे झाडाने, मोठ्या प्रमाणात येणारा शत्रू हेरला होता आणि त्याप्रमाणे आपले रासायनिक अस्त्र तयार ठेवलं होतं.

शास्रज्ञांचा इंटरेस्ट आता वाढला होता. त्यांनी अजून खोलवर जाऊन संशोधन करायला सुरवात केली. त्यांनी जंगलात जाऊन, हरणं चरताना ओरबडतात, तशी बाभळीच्या झाडाची पानं ओरबाडली. ज्या भागात पाने ओरबाडली होती त्या झाडांच्या पानांचे नमुने घेतले. त्यामध्ये टॅनिन जास्त आढळलं. पण आश्चर्य म्हणजे ओरबाळलेल्या झाडापासून पन्नास-शंभर फुटावरील झाडांमध्ये, ज्यांना हातदेखील लावला नव्हता, त्या झाडांमध्येदेखील टॅनिनची मात्र तेवढीच जास्त सापडली. हे कसं झालं?  एका झाडाने पन्नासशंभर फुटावरील दुसऱ्या झाडाला संदेश तरी कसा दिला? चक्रावलेल्या संशोधकांनी अजून एक प्रयोग केला. बाभळीच्या झाडाच्या फांद्यांना प्लॅस्टिकच्या पिशव्या बांधल्या आणि त्यांच्या पानांना ओरबाडायचा प्रयोग परत केला. त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमधली हवा तपासल्यावर, तिच्यामध्ये इथिलिन गॅस सापडला. आत्ता कुठं त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि रहस्यावरचा पडदा उघडला.

त्याचं झालं असं की, कुडू हरणं चरायला आली की सर्वात पुढे असलेलं बाभळीचं झाड, मोठ्या प्रमाणात टॅनिन तयार करायचं. त्याचबरोबर इथिलिन गॅस तयार करून दुसऱ्या झाडांकडे पाठवायचा. इथिलिन हा हलका वायू आहे. लगेच हवेमार्फत पसरतो. जवळपासची झाडं आपल्या शेजाऱ्याचा हा सांगावा टिपायचे आणि त्यांच्यामध्येदेखील टॅनिनचं आधण ठेवायची लगबग सुरु व्हायची. या हल्ल्याची भनकदेखील नसलेलं कुडू हरीण, पोटभर टॅनिनयुक्त चारा खायचं, आणि त्यात त्याचा  बळी जायचा. अश्या पद्धतीने बाभळीच्या झाडांनी आपल्या शेजाऱ्यांना सावध करत, शत्रूचा काटा काढला होता.

या सत्यकथेवरुन आपण बोध काय घ्यायचा? माणूस, पक्षी, प्राणी, वनस्पती यांच्यासह, निसर्गातील सर्वजण एकदुसऱ्याशी संवाद साधतायेत, कामी येतायेत. फक्त त्यांची संवादाची स्टाईल वेगळी आहे एवढंच. त्यांची शब्दावाचुन बोललेली भाषा समजून घायचा प्रयत्न आपण करतो का? आपलं शेत, पीक आपल्याशी बोलतं का? जर ते बोलत नसेल, त्याची हाक आपल्याला ऐकू येत नसेल तर मात्र… ‘दया.. कुछ तो गडबड है !’ 

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “<strong>भाग- ११: दया कुछ तो गडबड है !</strong>”

  1. अफलातून माहिती दिली आहे.पण इतकी संवेदनशीलता आता कुठल्याच शेतकऱ्यांमध्ये पहायला मिळणार नाही की ज्याला वाटेल आपल्या पिकानं आपल्याशी बोलायला हवं.केव्हा एकदा पिकांची अमाप राशी हातात येईल व मी ती कशी चढ भावाने विकेन अशी सगळ्यांना घाई झाली आहे.

Leave a Reply to प्रा सतिश पाटील. शिंदखेडा जि धुळे. Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

भाग- २३. रेन! रेन! गो अवेभाग- २३. रेन! रेन! गो अवे

अंगकोरवाट म्हणजेच कंबोडियाच्या सांस्कृतिक राजधानीतून सायकलिंग करत आम्ही थायलंडमध्ये प्रवेश केला होता. उत्तर थायलंडच्या रॅनॉन्ग या शहरात आम्ही पोहोचलो. दिवसभरच्या पायडलपीटीने जरा दमछाक झाली होती. संध्याकाळची वेळ होती. शॉवर घेतला

भाग- १६.  ये जवळ ये… !भाग- १६.  ये जवळ ये… !

घरातून ऐकू येणाऱ्या गोंगाटामुळे, अंगणात बसून पुस्तकात रमण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिंटूचे लक्ष विचलित झाले. पुस्तक बाजूला ठेऊन तो घरात आला. नेहमीप्रमाणे त्याचे वडील आणि काकांचे भांडण सुरु होते. त्याचे वडील

भाग- ९: शेतीला बांधलेला बॉम्ब! भाग- ९: शेतीला बांधलेला बॉम्ब!

सध्या युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु आहे. कोणत्या देशाने कोणाची बाजू घ्यावी यासाठी तोडपाणी, गटबाजी याला ऊत आलाय. लहानसहान देशांना आपल्या कंपूत ओढून घेण्यासाठी मोठ्यांची धावपळ सुरु आहे. रशिया कसा