drsatilalpatil Agrowon Article हलाहल पचवणारा थाई शंकर

हलाहल पचवणारा थाई शंकर

हलाहल पचवणारा थाई शंकर post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 21 August , 2021

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

बराच वेळ गाडी चालवतोय. पोटात काहीतरी टाकूयात म्हणून मघापासून उपहारगृह शोधतोय. पण मिळत नाहीये. गावं अगदीच छोटी आहेत. त्यामुळे हॉटेल दिसत नाहीयेत. शेवटी किराणा मालाच्या दुकानात ब्रेड, चॉकलेट वगैरे मिळतं का पहावं म्हणून आत घुसलो. दुकानात शोधक नजर फिरत असताना धक्काच बसला. दुकानात किराणा सामानासोबत चक्क ग्लायफोसेट हे तणनाशक ठेवलेलं. लग्नात मनाच्या पंक्तीत शाकाहारी वारकरी पावण्याच्या शेजारी बेवड्या पाव्हण्याला जेवायला बसवावे तसं टोमॅटो केचअप च्या जोडीला दिमाखात ग्लायफोसेट बसलं होत. त्याच्या खालच्या फळकुटावर जाम च्या बाटल्या जाम गर्दीत दाटीवाटीने बसल्या होत्या.

ग्लायफोसेट हे रसायन शेतातील तण मारण्यासाठी वापरतात. सध्या जावई मिळणं सोपं पण शेतमजूर मिळणं कठीण झालय. त्यामुळे शेतातील तण काढण्यासाठी, निंदण्याखुरपण्यासाठी तणनाशकाची गरज पडते. मग जटील तणांवर नियंत्रणात ठेवण्यासाठी शॉर्टकट म्हणून तणनाशकाचा वापर केला जातो. शॉर्टकट म्हणून वापरलं जाणारं हे घातक रसायन कॅन्सरच आमंत्रण आहे. त्यापोटी आजपर्यंत लाखो डॉलर्सची भरपाई या तणनाशक उत्पादक कंपन्यांना करावी लागलीये. जगभरात हजारो लोकांना कॅन्सरच्या खाईत लोटणारं हे तणनाशक इथं टोमॅटो सॉसच्या पंगतीला मानाने बसलं होतं. थायलंडमधील कृषी खात्यावर कामाचा ताण जास्त असावा म्हणून ही जैवरासायनिक पंगत त्यांच्या नजरेतून सुटली असावी किंवा बाटलीत साधं पाणी भरून दिलं तरी त्यातून रासायनिक कीटकनाशकांची भेसळ काढण्याची सरकारी जादू त्यांना अवगत नसावी. 

एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम शेती करणारा थायलंड रासायनिक सापळ्यात अडकलाय. जास्त पिकवायचं म्हणजे जास्त खते आणि  कीटकनाशकांचा वापर आलाच. म्हणून इथं मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे शेतीरासायनांच्या  आयातीचा धंदाही जोरदार आहे. आयात होणाऱ्या शेतीरासायनात एक नंबरला तणनाशक आहे, त्यानंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा नंबर येतो. याचा परिणाम म्हणून अन्नधान्यात रसायनांचे अवशेष सापडू लागले. काही वर्षांपूर्वी, थायलंडमधील फळे आणि भाजीपाल्याचे नमुने घेऊन त्यातील रासायनिक शेतीऔषधांचे अंश तपासनी केली गेली. त्यातील निष्कर्ष धक्कादायक होते. जी  भाजीपाले आणि फळं तपासली गेली, त्यामध्ये एकूण  ४३ शेतीरासायनांचे अंश सापडले, त्यात २० ऑरगॅनो फॉस्फेट, ६ सिंथेटिक पायरेथ्रॉईड्स, १२ कार्बामेट, २ अबामेक्टीन, १ इमीडाक्लोप्रिड अशी कीटकनाशकांची पटसंख्या भरली. फक्त फळांचा विचार केल्यास, ८५ टक्के फळांमध्ये कीटकनाशकांचे अवशेष सापडले त्यापैकी ५५ टक्के फळात ही रसायनं कमाल मर्यादेपेक्षा जास्त होती. शेतात फवारणी केल्यामुळे, गावात कमी रसायनवाला भाजीपाला खाल्ला जातो आणि चकचकीत रासायनिक भाजीपाला शहरात पाठवला जातो या धारणेला तडा देत ग्रामीण भागातील  शहरी भागापेक्षा जास्त शेतीरासायनांचे अंश ससापडले. 

शेतीतील प्रगती ची किंमत थाईलंथ मोजतोय. कंपनीपासून निघालेले शेतीऔषधे, डीलर, शेतकरी असा प्रवास करत पार घराघरात पोहोचलेत. प्रत्येकजण हे जहर पचवायची कसरत करतोय. थायलंडचे हे आधुनिक शंकर रासायनिक हलाहल पचवण्यासाठी झगडतोय. 

हे हलाहल पचवणारा पहिला शंकर आहे शेतीरासायन विक्रेता, डीलर. शेतीरासायनांचा डीलर दिवसभर रसायनांचा वास आणि सहवास अनुभवत असतो. त्याच्या आरोग्यावर याचे विपरीत परिणाम दिसतात. नंपुसकता, चिडचिड होणे, डोक्यावर टक्कल पडणे, केस गळणे, ताण येणं ही रासायनिक कीटकनाशकांच्या कुसंगतीची लक्षणं. तरुण तडफदार, भरपूर केशसंभार असलेल्या डीलर साहेबांच्या डोक्यावरील चंद्र काही वर्षात बाहेर डोकावू लागतो. फर्टिलिटी क्लीनिक च्या चकरा वाढतात, मनमोकळा स्वभाव असलेले साहेब एकाकी चिडचिडे का झाले हे गिर्हाईकाला कळत नाही आणि आपण रसायनाच्या संगतीत त्याचेच गिर्हाईक झालोय हे डीलरसाहेबांना कळत नाही. अशी ही कळत-नकळत तब्बेतीची रासायनिक ससेहोलपट सुरु असते. रासायनिक कीटकनाशकांच्या धंद्यात कमावलेले पैसे डॉक्टरांच्या खिशाच्या प्रवासाला निघतात.

या साखळीत दुसरा शंकर आहे शेतकरी. रसायनांशी त्याचा सर्वात जवळचा संबंध येतो. बाटली फोडून, पाण्यात त्याला मिसळून शेतभर फवारणी करतांना तो रसायनमय होतो. कीटकनाशके वापरतांना हवी ती काळजी घेतली जात नाही.  शेतीरासायनची विषबाधा ही थायलंडमधील मोठी समस्या आहे. दरवर्षी ४९००० ते ६१००० लोक फवाऱ्याच्या औषधाने बाधित होतात. नावात जरी औषध असलं तरी किड्यांना मारण्याचं ते विष आहे. त्याला जपून काळजीपूर्वक वापरले पाहिजे. पण हवी तेवढी काळजी घेतली जात नाही, आणि त्यामुळे विषबाधा होते. २००७ ते २०१३ दरम्यान केलेल्या संशोधनात देशभरातील शेतीरासायन बाधित लोकांची आकडेवारी समोर आली. थाईलँडमध्ये एक लाख लोकांमागे ९६ लोकं कीटकनाशकांमुळे आजारी पडतात असं त्यात सांगितलं गेलं. आख्या देशात शेतीरासायनपीडीत लोक आढळून आले. मध्य थाईलँडमध्ये ३१ ते ३६ टक्के, ईशान्य भागात २७ ते २१ आणि उत्तरेने दक्षिणेसोबत टाय साधत १८ ते २० टक्क्यापर्यंत शेतीरासायनपीडित सापडले. पीडितांमध्ये शेतकरी आणि शेतमजूर जास्त होते. मे ते ऑगस्टच्या दरम्यान पेशंटची संख्या जास्त होती, कारण हा पावसाळ्याचा काळ असल्याने याच काळात जास्त फवारे उडतात. बहुतांश केसेस ऑरगॅनोफॉस्फेट, कार्बामेट आणि तणनाशकांमुळे असतात असं आकडे सांगताहेत. 

हालहाल पचवणारा तिसरा शंकर म्हणजे ही अन्नधानने, फळं, भाजीपाले खाणारा माणूस. फॅक्टरीतून निघालेली रसायनाची ही विनाथांबा बस पार आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत येऊन पोहोचते. कॅन्सर, रक्तदाब, पॅरालिसिस, ताणतणाव, मधुमेह यासारख्या कित्येक रोगांना या बसने आपल्या शरीराच्या आगारात आणून सोडलंय. काबाडकष्ट करून कमावलेले पैसे हॉस्पिटलची बँक खाती फुगवताहेत. ही रसायने शोधणारे पाश्चिमात्य देश, या रोगावरची औषध देखील विकताहेत.

थायलंड सरकारने पावलं उचलत नियम कडक केले. काही कीटकनाशकांवर बंदी घातली. त्यामध्ये ग्लायफोसेट वर देखील बंदी घालायचं ठरलं पण अमेरिकी कंपन्यांनी शासनदरबारी आपलं वजन वापरलं. अमेरिकी सरकारकडून  थाईलंडवर दबाव वाढला आणि ग्लायफोसेट बंदीचा निर्णय डब्यात बंद झाला. सरकारने ग्लायफोसेट वरील बंदी मागे घेत आपला निर्णय अन-डू केला. ‘भारतातल्या रासायनिक कीटकनाशकांच्या देशी बंदीचा बार फुसका होण्यामागे असाच परदेशी जोर असेल का?, डोक्यात शंकेची रासायनिक पाल चुकचुकली. 

इथून काहीही खरेदी न करता बाहेर पडलो. पुढे टपरी सापडली. बाईक रस्त्याच्या कडेला दाबली. तिथल्या अन्नपदार्थांवर लांबूनच एक नजर टाकली. ‘त्यात तणनाशकाचे रेणू वळवळतांना दिसताहेत का? बघ जरा, अश्या नकारात्मक, रासायनिक विचारांचे तण डोक्यात माजू लागले. ‘जाऊदे !’ असं म्हणतं, सकारात्मक विचारांचं तणनाशक मारून त्याला नष्ट केलं. जेवण ऑर्डर केलं. क्षुधाशांती केली. वरुन जठराग्नीच्या होमकुंडात स्वाःहा म्हणत कॉफीच तुप ओतलं आणि रस्त्याला लागलो.

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

5 thoughts on “हलाहल पचवणारा थाई शंकर”

Leave a Reply to प्रा सतिश पाटील. शिंदखेडा जि धुळे. Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

खाईके पान बर्मा वालाखाईके पान बर्मा वाला

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 13 March, 2020 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ म्यानमारच्या खेड्यापाड्यातून मी फिरत होतो. रस्त्याच्या आजूबाजूला लुंगीवाले लोक फिरताना दिसत होते. गैरसमज

कृषिरसायनांशी मेळ …म्हणजे विषाशी खेळकृषिरसायनांशी मेळ …म्हणजे विषाशी खेळ

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 29 August , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ शेतीचा हंगाम सुरु झाला की शेतीरासायनांच्या विषबाधेच्या बातम्या ऐकायला मिळतात. शेतीरासायने वापरतांना काळजी न

कंबोडियातील भारतीय सण !कंबोडियातील भारतीय सण !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 30 October , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भारतातून निघून आम्हाला आता जवळपास महिनाभर झालाय. इतके दिवस बाईक चालवत, हजारो किलोमीटरचे रस्ते