drsatilalpatil Agrowon Article फवाऱ्याची खिचडी: शेतीऔषध फवारतांना एकाहून जास्त प्रॉडक्ट मिसळावे का?

फवाऱ्याची खिचडी: शेतीऔषध फवारतांना एकाहून जास्त प्रॉडक्ट मिसळावे का?

फवाऱ्याची खिचडी:  शेतीऔषध फवारतांना एकाहून जास्त प्रॉडक्ट मिसळावे का? post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 01 August, 2021

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

लहानपणा पासून एका दगडात दोन पक्षी मारण्याची शिकवण आपल्याला दिली जाते. मग ती शिकवण आपण एवढी गंभीरपणे घेतो की एका दगडात एकच काय पण एकापेक्षा जास्त पक्षी मारायचा प्रयत्न करतो. त्या शिकवणीचाच परिणाम आहे की काय, पण शेतात औषधे फवारतांना एकाच फवाऱ्यात अनेक औषधे फवारायची कसरत आपण करत असतो. कीटकनाशक, बुरशीनाशक, पोषक/टॉनिक, स्प्रेडर/स्टिकर यासारख्या शेतीऔषधांचा खिचडी फवारा पिकांवर मारला जातो. आता शेतीऔषधांचं कॉकटेल फवारण्यामागे शेतकऱ्याची मानसिकता काय असेल?

सगळ्यात पाहिलं कारण म्हणजे, एकाच रामबाण फवाऱ्यात शेतीतील सर्व समस्या खतम कराव्या हा विचार.  म्हणून एकाच फवाऱ्यात शेतीऔषधांची भाराभरती केली जाते. उद्धेश हाच की, कीड, बुरशीचं नियंत्रण व्हावं आणि पिकाला टॉनिक ही मिळावं.

काही वेळेस दोन तीन कीटकनाशकं एकत्र मिसळतात. याचा उद्देश फवारा एकदम स्ट्रॉंग बनवणे हा असतो. जास्त स्ट्रॉंग फवारा मारून एक दमात कीड उलटीपालटी करायचा प्लॅन असतो. काही लोकं तणाचा समूळ नायनाट यासाठी एकापेक्षा जास्त तणनाशकं मिसळतात. हीच मानसिकता खतांबाबतीत आहे. पिकाच्या जोमदार वाढीसाठी नत्र, स्फुरद, पालाशादी खतांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा मारा केला जातो. आपल्या काडीपहिलवान पोराला एका दिवसात पहिलवान बनवण्यासाठी एकदम सुकामेवा, भारीभारी खुराक त्याच्या तोंडात कोंबण्यासारखा हा प्रकार आहे. पण या खिचडीचा फायदा होईलच असं नाही. बऱ्याचदा याचा तोटाच होतो. आणि एका दगडात दोन पक्षी मारण्याच्या नादात हाती धुपाटणे येते.

या खिचडीचं दुसरं कारण म्हणजे, वेळ आणि मजुरी वाचवणे. सध्याच्या युगात जावई शोधणं सोपं आहे पण शेतमजूर मिळण्यासाठी देवाला कौल लावावा लागतो. अश्या परिस्थितीत कमीत कमी फवाऱ्यात जास्तीत जास्त शेतीऔषधे पिकांवर फवारण्याचा प्रयत्न असतो. 

या विषयात काही प्रश्न वारंवार विचारले जातात.

१. दोन किंवा जास्त कीटकनाशक मिसळले तर काय होईल? दोन प्रकारचे कीटकनाशके मिसळले आणि दोन्हींची काम करण्याची पद्धत सारखी असेल तर आपला खर्च वाया जाईल. पण दोन्हीं वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे, एक कीटकनाशक संपर्कजन्य आणि दुसरं आंतरप्रवाही असेल तर, अळी आणि रस शोषणाऱ्या किडींवर ही  खिचडी उपयोगी पडेल.

२. जैविक कीटकनाशके आणि रासायनिक कीटकनाशके मिसळावी का?: जर बोटॅनिकल म्हणजे वनस्पती अर्कावर आधारित कीटकनाशक, रासायनिक शेतीऔषधात मिसळले तर चालते, पण ट्रायकोडर्मा किंवा मेटारायझिअम सारखे सूक्ष्मजीवजन्य उत्पादने रासायनिक बुरशीनाशकांबरोबर मिसळणे टाळावे.   

३. जैविक आणि रासायनिक खत एकत्र मिसळावे का? शक्यतोवर रासायनिक खत आणि सूक्ष्मजीवजन्य खतांना जास्त काळ एकत्र मिसळून ठेऊ नये.पण वेगवेगळे प्रॉडक्ट एकत्र वापरायला काही हरकत नाही. 

४. दोन किंवा जास्त खते मिसळले तर चालेल काय?: चालेल. पण झाडाद्वारे शोषले जातांना काही अन्नद्रव्ये दुसऱ्याची वाट अडवतात. त्यासाठी ते मिसळण्याआधी कंपनीच्या प्रतिनिधीला किंवा डीलरला विचारावे.

५. कीटकनाशक/खतात स्टिकर, स्प्रेडर मिसळले तर काय होईल?: स्टिकर आणि स्प्रेडर, फवाऱ्याला पानावर एकसमान पसरवून चिकटवण्याचं काम करतात. त्यामुळे खते आणि कीटकनाशकांची परिणामकारकता वाढते. पण स्टिकर/स्प्रेडरचा अतिरेक टाळावा.

६. कीटकनाशकात टॉनिक, झाईम मिसळले तर काय होईल?: पहिले टॉनिक ची गरज आहे का हे जाणून घ्या. साधारणतः साडेपाच ते साडेसात पीएचचं झाईम किंवा टॉनिक असेल तर सहसा अडचण येत नाही. 

शेतीऔषधांची ही खिचडी नीट जमली तर ठीक नाहीतर पिकाला नुकसान होते. त्यामुळे पीक जळू शकतं. फवाऱ्याची कार्यक्षमता कमी होते आणि फवारणी यंत्राचं नुकसान होतं. शेवटी खर्च वाचवण्यासाठी केलेल्या खटाटोपामुळेच खर्च वाढतो. 

शेतीऔषधे मिसळताना काय काळजी घ्यावी ?

एखादं प्रॉडक्ट कोणत्या शेतीऔषधात मिसळू नये याची माहिती उत्पादनाच्या लेबलवर दिलेली असते. त्यासाठी लेबल काळजीपूर्वक वाचावं. जर ती नसेल तर  कंपनीच्या प्रतिनिधींकडून ती माहिती घ्यावी. तेही शक्य नसेल तर दुकानदारालाकडून  ती माहिती घ्यावी. सगळ्या लेबलवर कंपनीचा ग्राहक सुविधा नंबर छापलेला असतो. त्या नम्बरवरून देखील ही माहिती घेता येईल. 

शेतीऔषधं, मिश्रणक्षम नसले तर नेमकं काय होतं? हा प्रश्न आपल्याला पडणं साहजिक आहे. जर ते मिश्रणक्षम नसतील तर त्यांचं मिश्रण केल्यावर एकतर त्यांचे दोन वेगवेगळे थर  तयार होतील, त्या द्रावणावर दुधासारखी साय येईल किंवा त्यांमध्ये पिठासारखी पावडर तयार होऊन ती टाकीच्या कडेला चिकटेल, खाली बसेल किंवा स्पेअरचा नोझल चोक करेल. कधीकधी दोन विरुद्ध औषधे मिसळल्यास, पाण्यात चुनखळी टाकल्यावर जसं पाणी गरम होतं तशी उष्णता तयार होते. याप्रकारच्या गोष्टी दिसून आल्यास ते प्रॉडक्ट मिश्रणक्षम नाहीत हे समजावं आणि बळजबरीने त्यांना एकत्र फवारायचा आग्रह करू नये.

आता शेवटचा प्रश्न म्हणजे हे शेतीऔषधे मिश्रणक्षम आहेत का नाही हे कसं तपासावं? त्यासाठी आज मी आपल्याला शेतीऔषधांची मिश्रणक्षमता तपासायची सोपी पद्धत सांगतो. ती वापरून आपण घरच्याघरी कीटकनाशकांची खिचडी फवारणीसाठी चालेल का नाही हे तपासू शकाल.

एका काचेचं भांड घ्या. काचेचा जार घेतला तरी चालेल. त्यात एक लिटर पाणी टाका. जी औषधे आपल्याला फवारायचे आहेत ते, प्रमाणात मोजून या पाण्यात टाका. उदारणार्थ जर एखाद कीटकनाशक, एक मिली प्रति लिटरने फवाराचं असेल तर त्यातील एक मिली औषध जारमधील एका लिटर पाण्यात टाका. औषध मोजण्यासाठी लहान मुलाला औषध पाजण्यासाठी वापरतात तसे ड्रॉपर वापरावा म्हणजे नेमका डोस मोजता येतो.

आपल्याला जी जी औषध एकदुऱ्यात मिसळून फवारायची आहेत ती औषध खालील क्रमाने काचेच्या भांड्यातील पाण्यात टाका. 

१. सगळ्यात पहिला नंबर पावडरीचा लागतो. आपल्याला हव्या असलेल्या प्रमाणात पावडर किंवा कोरडे औषधे मोजून घ्या आणि पाण्यात टाका. यात WP, DP, ग्रॅनुल यासारखे पावडर स्वरूपातील शेतीऔषधे येतात. पाण्यात टाकल्यावर त्याला ढवळा

. त्यानंतर नंबर लागतो तो पाण्यात विरघडणाऱ्या द्रव औषधांचा. या औषधाच्या बाटलीवर SC अश्या प्रकारे उत्पादनाचा प्रकार नमूद केला असेल. एक लिटर पाण्यासाठी आवश्यक डोस मोजून भांड्यात टाका आणि ढवळा. या प्रकारात टॉनिक, झाईम आणि इतर प्रॉडक्ट येतात.

३. तिसरा नंबर EC म्हणजे इमूलसीफायेबल कॉन्सट्रेट प्रॉडक्टचा येतो. मराठीत सांगायचं झाल्यास तेल आणि पाणी मिश्रित प्रॉडक्ट. त्याला देखील एक लिटरचा डोस  मोजून भांड्यात टाका. 

४. आता सर्वात शेवटचा नंबर स्टिकर, स्प्रेडरचा लागतो. आवश्यक मात्रेत त्यांना भांड्यात टाका आणि चांगलं मिसळा.

आपल्या भांड्यात आता एक लिटर पाणी आणि चार प्रकारची औषधं जमा झाली आहेत. या मिश्रणाला चांगलं ढवळा आणि १५ मिनिट थांबा. १५ मिनिटानंतर परत एकदा मिसळून निरीक्षण करा.

निरीक्षण-१: मिश्रणक्षमता नाही:

१. भांड्याच्या तळाशी पावडर किंवा कण बसले आहेत का?

२. पाण्यावर काही तरंगत आहे का? पावडर, तेलाचे थेंब ई.

३. भांड्यात तेल पाण्यासारखे दोन थर दिसताहेत का?

. भांड्याच्या कडांना काही चिकटले आहे का ?

५. पाणी गरम झालं आहे का ?

वरील गोष्टींपैकी एक जरी गोष्ट झाली असेल तर ते मिश्रण फवारणीयोग्य नाही. त्या प्रॉडक्टची खिचडी फवारू नये.

निरीक्षण-२ मिश्रणक्षमता आहे:

१. द्रावण एकजीव झाले आहे का?

२. पाण्याचे तापमान पूर्वीइतकेच आहे का?

३. १५ मिनिटे थांबून परत ढवळल्यानंतर मिश्रण व्यवस्थित होतं का?

जर या प्रश्नांची उत्तर होय असतील तर हे मिश्रण फवारायला हरकत नाही.

 

आपल्या शेतात आपण फवारात असलेले शेतीऔषधं, योग्य पद्धतीने मिश्रणक्षमता तपासून फवारल्यास, त्यासाठी आपण खर्च केलेल्या पैशाचं मोल होईल. नाहीतर ही बिरबलाची खिचडी आपल्याला तोट्यात नेऊ शकते याची जाणीव असू द्या.  

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

2 thoughts on “फवाऱ्याची खिचडी: शेतीऔषध फवारतांना एकाहून जास्त प्रॉडक्ट मिसळावे का?”

Leave a Reply to प्रा सतिश पाटील. शिंदखेडा जि धुळे. Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

तणनाशकानं जाळलं कंबोडियासारख्या देशांचं भविष्यतणनाशकानं जाळलं कंबोडियासारख्या देशांचं भविष्य

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 25 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ पोलपॉटने बरबाद केलेल्या देशात बाईकने फिरतांना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवताहेत. व्हिएतनाम युध्दमुळे त्यांच्या देशाचं

‘फूल’ बनवणारं मलेशियन ‘फुल’‘फूल’ बनवणारं मलेशियन ‘फुल’

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 04 December , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थंडगार हवेत लपेटलेली मलेशियन सकाळ. सीटवर पहुडलेल्या साखरझोपेतल्या दवबिंदूंना दूर सारत, बाईकवर मांड

देशावर लाटणं फिरवणारा कंबोडियन पोळपाटदेशावर लाटणं फिरवणारा कंबोडियन पोळपाट

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 18 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ भगवान विष्णूच्या या देशात मी आणि माझी बाईक फिरतोय. ‘अंगकोर वाट’ मंदिराचं दर्शन घेतल्यापासून,