drsatilalpatil Agrowon Article पी एच बॅलन्सर उर्फ सामु सुधारक

पी एच बॅलन्सर उर्फ सामु सुधारक

पी एच बॅलन्सर उर्फ सामु सुधारक post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 25 July , 2021

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

बाजारात पीएच बॅलन्सर म्हणजे सामू सुधारक उत्पादनांची भरमार दिसते. पण हे सामू सुधारक म्हणजे आहेत तरी काय आणि त्यांची का गरज पाडावी? हे जाणून घेण्याअगोदर आपण पीएच म्हणजेच सामू म्हणजे काय हे  घेऊ.   सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, एखादा पदार्थ आम्ल (ऍसिड) आहे की क्षार (अल्कली) हे मापायची पट्टी. जर पदार्थाचा पिंड ऍसिडिक असेल तर पीएचच्या पट्टीवर तो शून्य ते सहा च्या दरम्यान भरतो. पण जर तो अल्कलीजन्य असेल तर त्याचा पीएच आठ ते चौदा मध्ये येतो.

ऍसिड हे आंबट असतात. म्हणून रात्रीच्या आंबटचिंबट पार्टीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंबट ढेकर येतात. याचा अर्थ पोटात जास्तीचं ऍसिड तयार झालंय. याउलट अल्कलीची चव खारट असते. म्हणून खाण्याचा सोडा खारट असतो. ऍसिडचा प्रभाव कमी करायला अल्कली कामात येते. म्हणून आंबट ऍसिडिटी कमी करायला खारट सोडा वापरतात. अगदी याच तत्वाने, शेतीऔषधांच्या फवाऱ्याची बेसीसीटी (आम्लारी) कमी करायला आपण ऍसिड वापरतो.

सात पीएच हा उदासीन असतो. निसर्गही ऍसिड आणि अल्कली या दोघांना साथीला घेऊन, हम साथ साथ आहे म्हणत, सातचा समतोल साधत, माध्यम मार्गावर चालत असतो.  

निसर्गाने आपल्या शरीरात सेन्सर बसवलेत. चिंच, आवळा यासारखे ऍसिडयुक्त फळं, किंवा साखरयुक्त मिठाई (साखरेपासून पोटात ऍसिडचा बनणार असतं) पहिली किंवा त्याची कल्पना जरी केली तरी तोंडाला पाणी सुटतं आणि लाळ तयार होते. लाळेचा पीएच सातपेक्षा जास्त म्हणजे म्हणजे आम्लारीधर्मी आहे. कारण शरीराला माहितीय की याचा स्वतःच्या हातावर आणि तोंडावर नियंत्रण नाही. हे ऍसिडान्न हा खाणार आणि याला ऍसिडिटी होणार. म्हणून ते ऍसिडिक अन्न तोंडात येण्याअगोदर शरीर तोंडात अल्कलीयुक लाळ तयार करते. 

तुम्ही विचारलं शेतात, मातीत अशी व्यवस्था निसर्गाने केलीय का? तर याचं उत्तर आहे. हो ! इथं लाळ नसते पण सूक्ष्मजीव असतात. मातीत ऍसिड आणि अल्कलीची  निर्मिती करणारे जिवाणू उपलब्ध असतात. ज्याप्रकारचं खतपाणी जमिनीत पडतं, त्याच्या विरुद्ध पक्षातले सूक्ष्मजीव, बाह्या सरसावून कामाला लागतात. उदाहरणार्थ ऍसिडिक पदार्थ मातीत पडला तर अल्कली तयार करणारे जिवाणू आणि अल्कलीयुक्त पदार्थासाठी ऍसिड बनवणारे जिवाणू वाढतात आणि त्याला सातच्या घरात आणतात.

आता फवाऱ्याच्या पाण्यात पीएचचं काय महत्व हे जाणून घेऊया.  आपल्याकडे जास्तकरून सातपेक्षा जास्त सामूचं जड पाणी असतं. पृथ्वी हा मोठा मिठाचा खडा आहे. तिच्या पोटात वेगवेगळ्या प्रकारच मीठं सामावलेले आहेत. जमिनीच्या पोटातून पाणी उपसून काढतांना, त्याबरोबर  मीठही बाहेर येतं. किंवा नद्यानाल्यातुन पाणी वाहत जातांना मातीतील मीठ विरघडून पाण्यात साठत जातं. 

शेतात औषधं फवारायला आपण जर हे जास्त सामूचं जड पाणी वापरलं तर काय होईल? हा प्रश्न डोक्याची ऍसिडिटी वाढवत असेल ना? सांगतो. फवाऱ्याचं पाणी जड असेल तर त्यावर ‘धन’ भार असतो आणि त्यात मिसळलेल्या कीटकनाशकांवर ‘ऋण’ भार असतो. जसे चुंबकाचे ‘धन’ आणि ‘ऋण’ टोकं एकदुसऱ्याला  चिकटतात, तसेच ‘ऋण’ शेतीऔषध आणि ‘धन’ भारित जड-पाणी एकदुसऱ्याच्या बंधनात अडकतात. फवारल्यावर ते विलग होत नाही, पर्यायाने  शेतीऔषधांची परिणामकारकता कमी होते. या ‘ऋण’ शी युती होऊन, ‘धन’ शेतीरासायन जड, पाण्याच्या ऋणात अडकतं.

या युतीचा तोटा म्हणजे, फवाऱ्याच्या टाकीत, कीटकनाशक आणि जड पाणी मिसळल्यावर, त्यांची अभिक्रिया सुरु होते. कीटकनाशकांचे मिठात रूपांतर होऊन ते खाली बसते किंवा टाकीच्या कडांना चिकटते. त्यामुळे कीटकनाशकांची परिणामकारकता कमी होते.

कीटकनाशकांचा ‘हाफ लाईफ पिरिअड’ म्हणजे एखादं कीटकनाशक फवारल्यावर त्यातील ५०% औषधाचा नाश व्हायला लागणार कालावधी महत्वाचा असतो. पाण्याच्या पीएच मुळे कीटकनाशकांचा ‘हाफ लाईफ पिरिअड’ कमी होतो. उदाहरणार्थ ‘कॅप्टन’ हे बुरशीनाशक, पाच पीएचच्या पाण्यात मिसळून फवारल्यावर, त्याचे सक्रिय घटक ३२ तासात ५० टक्के विघटित होतात. पण तेच औषध, सात पीएचच्या पाण्यात मिसळून फवारले, तर त्याचा ‘हाफ लाईफ पिरिअड’ ७ तासापर्यंत खाली येतो. हा पीएच अजून आठ पर्यंत वाढवला, तर कॅप्टन चे सक्रिय घटक फक्त दहा मिनिटात नष्ट होतात. म्हणजे पाच पीचच्या पाण्यात ज्याचा ‘हाफ लाईफ पिरिअड’ ३२ तास होता तो आठ पीएचला फक्त दहा मिनिटावर आला. यावरून अयोग्य सामूचा फवारा किती धोकादायक आहे याची कल्पना येईल.

आता फवाऱ्याच्या पाण्याचा पीएच मोजायचा कसा ?  ते अगदी सोप्पंय! पाण्यात पीएच पेपर बुडवायचा आणि त्याचा रंग कोणत्या रंगाशी मिळतो ते त्यावरच्या पट्टीत पाहायचं. बाजारात पेनच्या आकाराचे ‘पीएच-मीटर’ मिळतात. तेही वापरू शकतो. पण पीएच पेपर हाच भरवश्याचा ‘पीएच-मित्र’. तो स्वस्तही असतो, वापरायला सोपा आहे आणि महत्वाचे म्हणजे त्याला कॅलिब्रेशनची गरज पडत नाही. 

पाण्याचा पीएच मोजला आणि तो सातच्या वरती आहे. आता त्याला विरोधी उमेदवारासारखा खाली कसा बसवायचा ? हा प्रश्न पडलाय ना? त्यासाठी बाजारात ‘पीएच-बॅलन्सर’ म्हणजे ‘सामू-सुधारक’ उत्पादने उपलब्ध आहेत. ते वापरून आपण फवाऱ्याचा सामू, सहा ते सातच्या आत आणू शकतो. सामूसुधारकांचे ‘ऋण’ भार जड पाण्यातील ‘धन’ भारला चिकटून बसतात आणि त्यांना उदासीन बनवतात. मग या उदास पाण्यात कीटकनाशकाची परिणामकारकता वाढते. जर बाजारातील उत्पादने वापरायचे नसतील तर सिट्रिक ऍसिड हा उत्तम पर्याय आहे. आपल्याकडे सिट्रिक ऍसिडदेखील नसेल तर शेतातल्या लिंबूच्या झाडावरून रसरशीत लिंबू तोडून त्याचा रस काढायचा आणि हा रस पीएच कमी करायला वापरायचा. एवढंच काय पण पीएच जास्त नसेल तर ताक देखील वापरता येऊ शकेल. ताकाला जाऊन फवाऱ्याचं भांड लपवन्यात काहीच अर्थ नाहीये.  हे घरगुती पर्याय वापरायला हरकत नाही. पण सिट्रिक ऍसिडचे, ताकाचे किंवा लिंबूरसाचे प्रमाण किती घालायचे याची कसरत आपल्याला करावी लागते. त्यासाठी एक लिटर पाणी मोजून घेऊन, त्याचा पीएच सातच्या घरात आणायला प्रतिलिटर किती लिंबूरस, ताक किंवा सिट्रिक ऍसिड लागते याचे प्रमाण ठरून घ्या. त्यानुसार मोठ्या टाकीसाठी प्रमाण ठरवा.

पीएच बॅलन्सर दोन प्रकारचे असतात. एक फक्त पीएच कमी करतात. त्यामध्ये ऍसिड वापरलेलं असत. जेवढं हे प्रॉडक्ट पाण्यात घातलं, तेवढा  पाण्याचा पीएच कमी होईल. डोस जास्त झाल्यास पाण्याचा पीएच अजून तळाला जाईल. यामुळे पिकाला इजा होऊ शकते. दुसऱ्या प्रकारच्या उत्पादनाला ‘बफर’ म्हणतात. हे बफर आपल्याला हव्या असलेल्या पल्ल्यात पीएच आणून ठेवतात. म्हणजे जर आपल्याला सहा ते सात च्या मध्ये पाण्याचा पीएच हवा असेल, तर बफर त्याला सहा-सात च्या घरातच धरून ठेवेतात. बफरचा डोस दुप्पट, तिप्पट जरी झाला तरी पाण्याचा पीएच सहा-सात दरम्यानच राहतो.

सामू सुधारक निवडतांना आणि वापरतांना घ्यावयाची काळजी.

१.  स्प्रेडर बरोबर पीएच कमी करणारे प्रॉडक्ट वापरू नये. कमी पीएच मुळे स्प्रेडरची परिणामकारकता कमी होते.

२. हे प्रॉडक्ट बॅलन्सर आहे की बफर? ते तपासा

३. काही प्रॉडक्टमध्ये सलप्यूरीक किंवा हैड्रोक्लोरिक ऍसिड वापरतात. त्यामुळे पिकाचे नुकसान होते.

४. प्रॉडक्टचे लेबल काळजीपूर्वक वाचा.

५. डोस आणि इतर प्रॉडक्ट बरोबरची मिश्रणक्षमता तपासा.

६. आपल्या शेतातील पाण्याचा जडपणा आणि सामू तपासा आणि त्यासाठी किती लिंबू किंवा सिट्रिक ऍसिड लागतं याचं गणित वहीत मांडून ठेवा.

अश्या प्रकारे फवाऱ्याच्या पाण्याचा सामू नियंत्रित करून आपण शेतीऔषधांचा परिणामकारक वापर करू शकतो. 

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

5 thoughts on “पी एच बॅलन्सर उर्फ सामु सुधारक”

  1. लालित्याच्या जोडीला तुमच्या लेखनाचे अजून एक वैशिष्ट्य आहे,ते म्हणजे विषय समजावून देण्याची तुमची हातोटी.ही हातोटी एका हाडांच्या शिक्षकाची आहे.हाडाचा शिक्षक असा असतो की वर्गातला ढ मधला ढ विद्यार्थीही धडा शिकवल्यावर अचूक उत्तरे देतो.हे मी पाहिले आहे.कारण माझे वडील ते तसे शिक्षक होते.व त्यांच्या वर्गातले विद्यार्थी बहुतेक सगळे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असत.किती सोपी सरळ भाषा.पटतील अशी रोजच्या व्यवहारातील उदाहरणे.म्हणूनच पर्यावरणावरील तुमचा लेख मला देऊळगावकरांच्या नेहमीच्या लेखां पेक्षा वेगळा वाटला होता व अधिक भावला होता.पृथ्वीला ताप आल्याचे तुम्ही त्यात छान समजावून दिले आहे….खूप खूप धन्यवाद…. पी.एच.बॅलन्सिंगसाठी ताक अथवा लिंबाचा रस वापरावा हे कळले पण पी.एच.बॅलन्स झालाय हे ओळखण्यासाठी असेच कुठले हाताशी असलेले द्रव्य इंडिकेटर म्हणून शेतकऱ्याने वापरावे.

    1. धन्यवाद सर,
      शेतकऱ्यापर्यंत सोप्या भाषेत तांत्रिक माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. त्यात काही सूचना असतील तर निश्चित कराव्यात.

      पीएच बॅलन्स झाला हे समजण्यासाठी पीएच पेपर किंवा पीएच मीटर वापरावा. त्यावर साडेसहा ते साडेसात च्या दरम्यान पीएच आल्यास तो न्यूट्रल म्हणजे उदासीन झाला असं समजावं.

Leave a Reply to अतुल देशमुख Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

फुलशेतीचं ब्युटी’फुल’ थायलंडफुलशेतीचं ब्युटी’फुल’ थायलंड

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 08 May , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडच्या हिरव्यागार वातावरणात बुलेट धकधकत निवांत निघालीय. रस्त्यावर नजर ठेवून इतरत्र

भगवान विष्णूच्या देशात !भगवान विष्णूच्या देशात !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 04 September , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थायलंडमधील प्रवास आज संपलाये . माझी बाईक थायलंड- कंबोडियाच्या बॉर्डरवर उभी आहे. थायलंडच्या हिरव्यागार

भाग-४: अनर्थभाग-४: अनर्थ

भाग-४: अनर्थ आमावसेची काळीकुट्ट रात्र होती. राकीड्यांची किरकिर तिची भयानकता अजून वाढवत होती. सगळीकडे स्मशान शांतता होती. असणारच, कारण ते स्मशानच होतं. साधूच्या सांगण्यावरून राजा विक्रमादित्य स्मशानातून झाडावर लटकणारं प्रेत