drsatilalpatil Agrowon Article फुलशेतीचं ब्युटी’फुल’ थायलंड

फुलशेतीचं ब्युटी’फुल’ थायलंड

फुलशेतीचं ब्युटी’फुल’ थायलंड post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 08 May , 2021

Published by: अग्रोवन

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

थायलंडच्या हिरव्यागार वातावरणात बुलेट धकधकत निवांत निघालीय. रस्त्यावर नजर ठेवून इतरत्र झाडं, पक्षी, प्राणी, आजूबाजूची घरं, गावं, लोकं यासारख्या चर-आचर निसर्गाचा आनंद घेत प्रवास करतोय. रस्त्यानं जाताजाता माझ्या या दुरदृष्टीने लांबूनच काहीतरी वेगळं दृश्य हेरलं. एका टपरीत लाकडी स्टॅन्डवर भरपूर दारुच्या बाटल्या रचून ठेवल्या होत्या. पण त्यांना लेबलं नव्हती. लाल आणि निळ्या लेबलात मिरवणाऱ्या बाटल्या मात्र इथं बिनालेबलच्या वस्रहीन उभ्या होत्या. इथं हातभट्टीचा गृहउद्योग चालतो की काय? अशी मादक शंका चाटून गेली. पण तसं वाटत नाहीये. बुलेट थांबवून तिथं गेलो. पाहतो तर काय?… दारुच्या शंभर दीडशे बाटल्या लाकड़ी स्टॅन्डवर मांडल्या होत्या. त्यामध्ये पारदर्शक  अॅक्वाकल्चरचा मेडीया भरलेला आणि त्यात लावलेली हिरवीगार रोपं. क्या बात है ! सुसज्ज टिश्यू कल्चर प्रयोगशाळेत काळजीपूर्वक बनवल्या गेलेल्या अॅक्वाकल्चरची गुणवत्ता या निरोगी रोपांपुढे झक मारेल.

एक बाई तिथं बसलीय. शेजारी शेंबडं पोरगं खेळतंय. पोराची आणि रोपांची आई हीच असावी, हा कयास बांधणं कठीन नव्हतं. तिला रोपांबद्दल माहिती विचारायचा प्रयत्न केला, पण भाषेची अडचण दोन शास्रज्ञांच्या संवादाची वैरीण झाली. हातवाऱ्याने जे काही मुक्या बहिऱ्यासारखे बोललो तेवढंच. पोटच्या शेंबड्या पोराएवढंच ती या रोपांवरही प्रेम करत असावी. पोराच्या आणि रोपांच्या गुटगुटीत तब्बेतीवरुन याची कल्पना येतेय.

थायलंडमध्ये वनस्पतीशास्र हा पारंपरिक व्यवसाय आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पोराला सांभाळता सांभाळता टिश्यू कल्चरचं विरजण लावण्याचं काम गृहीणी सहज करतात. चूल, मूल आणि फुल या तिघांना सांभाळत थाई बाईचा दिनक्रम सुरु असतो.

उष्णकटिबंधीय फुलपिकांसाठी थायलंड प्रमुख देश आहे. इथल्या फुलशेतीचा विकासाचं रोपटं खासगी क्षेत्राच्या मेहनतीबरोबरच शासनाच्या मदतीच्या खतपाण्यामुळे पोसल गेलय. वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्किड आणि कटफ्लॉवर चा व्यवसाय इथं जोरात चालतो. डेंड्रोबिअम ऑर्किड ही प्रमुख पीकं. वर्षभर पाण्याचा पुरवठा आणि इथलं पोषक वातावरण फुलझाडांना मानवलय. 

ऑर्किडच्या वेगवेगळ्या जातींचं थायलंड माहेरघर आहे. म्हणूनच फुलझाडांच्या मुख्यतः ऑर्किडच्या धंद्यात थायलंडचा हात कुणी धरु शकणार नाही. इथं ऑर्किडच्या तब्ब्ल ११२० प्रजाती आढळतात. गेल्या शंभर वर्षांपासून ऑर्किड वाढवणं हा श्रीमंतांचा शौक मानला जायचा. पण डेंड्रोबीएम च्या उगमानंतर मात्र हा श्रीमंत शौक सामान्य माणसाचा उंबरठा ओलांडत माजघरात आला.

आपल्या देशातील स्थानिक फुलांच्या जातींचं संवर्धन करून जागतिक बाजारपेठ काबीज करण्यात थाई लोकांचा हात कुणीच पकडू शकणार नाही. नवीन जाती विकसित करून त्यांचा वेगाने प्रसार करणे यात थाई लोकांच्या यशाचं गमक आहे. १९६६ मध्ये अगदी छोट्या प्रमाणात फुलं काही युरोपियन देशात निर्यात व्हायची. पण पहिल्या गिअरमध्ये चालणाऱ्या फुलगाडीने पुढच्याच दशकात टॉप गिअर टाकत जगाच्या प्रमुख ऑर्किड उत्पादक आणि निर्यातदारांच्या यादीत मानाचं स्थान मिळवलं. कट फ्लॉवर बरोबरच कुंडीतील फुलझाडे आणि अडेनिअम, सायकॅड, यूफोर्बिया आणि पाम सारख्या रोपांचा निर्यातीत मोठा वाटा आहे. या धंद्यातील स्पर्धात्मकता लक्षात घेऊन नवीन फुलांच्या जाती विकसित करण्याबरोबरच त्यासंबंधीची बौद्धिक संपदा आणि परवाने विकून डॉलरचा ओघ देशात आणला जातोय.

सतत संशोधन आणि विकास करत नवीन तंत्रज्ञान स्वकारणं हा ‘थाई’ शेतकऱ्याचा स्थायीभाव आहे. कमी खर्चात उत्पादन, ग्रीन हाऊस तंत्रज्ञान, लागवडीसाठीचं सामान, कीड आणि रोगांचा प्रतिबंध, उतिसंवर्धन, वनस्पती प्रजनन, काढणीपश्चात तंत्रज्ञान, पॅकिंग यासारख्या विषयांवर आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला जातो. या सारख्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे उत्पादन आणि गुणवत्ता तर वाढलीच पण पिकांचं नुकसान कमी होऊन फायदा उंचावला.

२०१२ च्या आकड्यानुसार ७४२० एकरवर पसरलेली फुलशेती प्रतिएकर २४०३ किलोचं दान शेतकऱ्याच्या पदरात टाकत होती. या कटफ्लॉवर ची निर्यात १४८ देशात करून ६३६० कोटी डॉलरचा हिरवागार फुलोरा मायदेशी फुलवला होता. त्याचबरोबर कुंडीतील रोपांची आणि झाडांची निर्यात १६० देशात करून घसघशीत १७८० कोटी डॉलर थाई पदरात पडून घेतले होते. ‘पैसे झाडाला लागत नाहीत!’ ही म्हण थाई शेतकऱ्याने खोटी करून दाखवत जणू थाईलँडचा शेतकरी म्हणतोय  ‘लक्षात ठेवा! आपल्या धंद्यात पैसे झाडालाच लागतात!’

इथं अजुन एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे, ती म्हणजे एकूण ऑर्किड उत्पादनापैकी ५४ टक्के निर्यात होतात पण ४६ टक्के फुलं स्थानिक बाजारात विकली जातात. देशातील दर्दी ग्राहक, फुलं विकत घेत आपला शौक पूर्ण करून बळीराजाच्या कष्टाचं चीज करतात. बँकॉक मध्ये ‘पाक ख्लॉंग तलत’ हे मोठं फुलांचं मार्केट आहे. सतराव्या शतकातील राजा राम-१ याच्या काळापासून हा फुलाचा बाजार बहरतोय. पूर्वी हा बाजार  पाण्यावर भरायचा नंतर मात्र तो जमिनीवर आला. मोकळ्या जागेवर भरणारा हा बाजार २०१६ मध्ये इनडोअर झाला. या मार्केटची खासियत म्हणजे हे बारा महिने चोवीस तास उघडं असत. देशविदेशातील ग्राहकांनी ते सदैव गजबजलेलं असत.

थाईलंडमध्ये प्रत्येक घरात, अंगणात फुलझाडं दिसतात. घरोघरी फुलं सजवण्याची प्रथा आहे. फुलांबरोबर रंगेबेरंगी बाहुल्या शुभशकुन म्हणून सजवल्या जातात. प्रत्येक घरात फुलझाडांच्या कुंड्या हमखास मिळतील. जसं आपण कुत्र्याला नाव देतो तसं काहीजण घरातील झाडांना नाव देऊन त्यांना घरातील सदस्यत्व देतात. इथं दैनंदिन व्यवहारात फुलांना मोठं स्थान आहे. सणाच्या दिवशी तर फुलाशिवाय त्यांचं पान हालत नाही.

सात कोटी लोकसंख्येचा देश जर आपल्या देशातील ५४ टक्के फुलं देशातच विकत असेल तर सव्वाशे कोटीच्या आपल्या देशात काय चमत्कार होऊ शकतो याची आपण कल्पनाच करू शकतो. त्यासाठी बऱ्याच गोष्टी करता येतील. जसं घरी आलेल्या पाहुण्याला एखादं फुल भेट देणं, ‘मित्रा कटिंग चहा काय मागतो,त्याऐवजी फुल घे!’ असं म्हणत एखादं गुलाबाचं फुल पुढे करणं (मात्र समोर मित्र आहे की मैत्रीण याचा रागरंग पाहून तुम्ही गुलाबाचा रंग ठरावालच!), कुणाकडे जातांना खाली हाताने न जाता, एखादा जरबेरा किंवा गुलाबाचा गुच्छ घेऊन जाणं. घरात चिनी, प्लॅस्टिकची कृत्रिम फुलं वापरून स्वतःला आणि इतरांना फुल बनवण्याऐवजी जितीजागती फुलं सजऊन नैसर्गिक आनंद घेणं. दसऱ्यासारख्या सणाला आपट्याच्या झाडाचं वस्त्रहरण करण्या ऐवजी फुलांच्या पाकळ्या वाटणं. अगदीच आपट्याचा आग्रह असेल तर एका आपट्याच्या पानाबरोबर, पानावर सुपारी ठेवल्यागत काही पाकळ्या देण्यास सुरवात करता येईल. अगदी सुवासिनींनी ओटी भारतांनासुद्धा धान्य आणि नाराळासोबत एखादं फुल पदरात टाकायची आधुनिक प्रथा आपण सुरु करू शकतो. जमिनीवर पाट टाकून जेवायला बसायच्या जुन्या प्रथेला जसं गोऱ्या साहेबी प्रभावाने डायनिंग टेबलावर घेऊन बसवलं, तसंच जुन्या प्रथांमध्ये हा रंगीत आधुनिक बदल घडवून, फुलांचा वापर सुरु करून आपण शेतकऱ्यांच्या आणि पर्यायाने आपल्या जीवनात समृद्धीची फुलं फुलवू शकु असा फुल्ल-टू विश्वास मला वाटतो. 

थाई फुलांच्या विचाराने मन कसं प्रफुल्लित झालय. दारूच्या बाटलीत झाडं उगवूनही, ढगात न जाता कष्टाने नर्सरीत राबणाऱ्या नर्सरेश्वरीला नमस्कार केला. तिनेही हसून मान डोलवत त्यांचा स्वीकार केला. बुलेटला किक मारली आणि फुलांच्या देशातून ‘फुल’कित होतं सफर परत सुरु केली. 

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

3 thoughts on “फुलशेतीचं ब्युटी’फुल’ थायलंड”

    1. अप्रतिम सरजी छान लिखाण आणि आपण घेतलेले फाेटाे तर मन माेहुन घेतात अभिनंदन आपले हा लेख जर खरच मनावर घेतला तर देशात फुल क्रांती घडून येईल.
      धन्यवाद..

  1. Nice article on floriculture in Thailand…. We should adopt their floriculture…. Thailand really beautiful country…Less population. Photos are ver good…. Excellent…. Nice information given in article.

Leave a Reply to Dr Sanjay Patil Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

पी एच बॅलन्सर उर्फ सामु सुधारकपी एच बॅलन्सर उर्फ सामु सुधारक

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 25 July , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ बाजारात पीएच बॅलन्सर म्हणजे सामू सुधारक उत्पादनांची भरमार दिसते. पण हे सामू सुधारक म्हणजे

चहा खाणारे म्यानमारी लोकंचहा खाणारे म्यानमारी लोकं

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 17 April, 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ बुलेटवरील बर्मीज सफर बहरात आलीय. येथील स्थानिक अन्नपदार्थांची चव चाखत, म्यानमारी पाहुणचार खात

बुरशीनाशक कसे वापरावे ?बुरशीनाशक कसे वापरावे ?

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 24 October , 2021 डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ बुरशीच्या रोगांमुळे दरवर्षी पिकांचे भरपूर नुकसान होते. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशके वापरतो. ही