drsatilalpatil Agrowon Article जगातील आनंदमयी स्वर्गाचा निरोप!

जगातील आनंदमयी स्वर्गाचा निरोप!

जगातील आनंदमयी स्वर्गाचा निरोप! post thumbnail image

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.

Date: 13 February, 2020

Published by: अग्रोवन

डॉ. सतीलाल पाटील
0९९२२४५९७८४

भूतान मधील आज शेवटचा दिवस. जाताजाता या देशासंबंधी जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. पंचेंद्रियांच्या सेन्सर मधून जेवढा भूतान माझ्यात सामावून घेता येईल तेवढा घेतोय. येथील मुक्त वातावरण मनावर गरुड घालतंय. ही मुक्तता भूतानच्या रक्तातच आहे, निसर्गाचं देणं मुक्तहस्ते मिळालेल्या आणि अंतर्बाह्य स्वतंत्र असलेल्या या देशाने, आजपर्यंत आपलं स्वातंत्र्य कधीही गमावलं नाहीये. निबिड अरण्यातील हिमालयातील पर्वतराजीतील दुर्गम स्थान आणि येथील राजांनी इंग्रजांबरोबर ठेवलेले मुत्सद्दी संबंध यामुळे भुतानचा पंछी इंग्रजी शिकाऱ्यापासून वाचला होता.

या इंग्रजांच्या वाकड्या नजरेतून सुटलेल्या देशाबाबत संपूर्ण जग अनभिज्ञ  होते. १९७४ पर्यंत हा देश विलुप्त होता. पण भूतानचं अस्तित्व जगाला १९७४ साली, जेव्हा राजाचा राज्याभिषेक सोहळा कव्हर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मीडिया ला परवानगी मिळाली तेव्हा कळलं. त्यावेळी पहिल्यांदा भूतान बाहेरील जगाच्या संपर्कात आला आणि बंद बाटलीतलं भूतानी भूत जगासमोर आलं.

भुतानच्या उज्वल भविष्यासाठी राजेशाही उपयोगी नाही हे जाणून ‘राजा सींगये वांगचुक’ ह्यांनी २००५ मध्ये राजेशाही सोडून निवडणूका लावल्या आणि संविधानवादी राजसत्ता आमलात आणली. दुसऱ्याच्या बुडाखालील खुर्ची ओढुन घेणाऱ्या, रातोरात मंत्रीसंत्री बदलून हातचलाखी करणाऱ्यांच्या जगात, स्वतःहून राजगादी सोडणारा धन्य तो राजा! म्हणूनच येथील लोक या राजा माणसावर मनापासून प्रेम करतात.

‘वाघ’ राष्ट्रीय प्राणी असणाऱ्या भारताच्या या शेजाऱ्याचा राष्ट्रीय प्राणी आहे ‘बकरी’. हो !  ‘ताकिन’ ही बकरी येथील राष्ट्रीय प्राणी आहे. भारत-भूतान मैत्रीचा असा हा चत्कारिक विरोधाभासी ‘वाघाबकरी’ शेजार आहे. येथील राष्ट्रीय खेळ आहे धनुर्विद्या. भुतानची धनुर्विद्येची ऑलिम्पिक टीम देखील आहे. मजेदार गोष्ट म्हणावे हिमालयात येति हा महामानव अस्तित्वात असून तो डोंगरदऱ्यात हिंडत असतो असा येथील लोकांचा विश्वास आहे. मात्र भविष्यात ‘येति’ चे पुरावे जेव्हा समोर ‘येती’ल तेव्हाच या विश्वासाचं पुष्टीकरण होईल.

येथील अनोख्या गोष्टींच्या भांडारात एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते, ते म्हणजे इथं सर्व देशातील लोकांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. आल्या ना डोक्याला मुंग्या? मग मुंग्या झटकून ऐका! इथं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक वर्षाची भर पडते. दुसऱ्या अर्थाने, सर्वांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. हे तर एकाच मांडवात सामुदायिक विवाहसोहळा उरकण्यासारखं झालं. यांचं नवीन वर्ष तिबेटियन कॅलेंडर नुसार असतं. गेल्या वर्षी समग्र देशवासीयांचा वाढदिवस २४ फेब्रुवारी ला होता. एक बरं झालं वर्षभर हॅपी बर्थडे म्हणत गिफ्ट वाटण्यापेक्षा एकाच दिवशी ‘टीटीएमएम’ करून शुभेच्छा आणि गिफ्ट देऊन मोकळं व्हावं.

रस्त्यावरून जातांना रंगीबेरंगी पारंपरिक कपडे घालून लोकं फिरताहेत. काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम असेल असं सुरवातीला वाटलं. पण भूतानमध्ये राष्ट्रीय पोशाख घालणं कंपलसरी आहे असं नंतर कळलं. त्यामुळं अक्खा देश यूनिफार्म मध्ये असल्यासारखा वाटतो.

बाईक वरून फिरतांना आजूबाजूला बऱ्याच घरांवर लिंगाची मोठमोठी चित्रं रंगवलेली दिसताहेत. ही चित्रं शुभचिन्ह म्हणून आणि पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून घरावर काढली जातात. एक तरी भूतानी गुबगुबीत पुत्र होऊ दे असं लिंगाप्पाला साकळं घालत घरावर ही चित्रं रंगवतात. आपल्याकडील पिंडीत असणारं लिंग इथं ब्रह्मांडी अवतरल्याचा भास होतो.

बुद्धांच्या मार्गाने चालणाऱ्या या देशात गुन्हेगारीचं प्रमाण फारच नगण्य आहे. किरकोळ गुन्हे वगळता खून दरोड्यासारखे गुन्हे इथं घडत नाही. गुन्हेच काय पण, संप आणि बंद सुद्धा होत नाहीत. हो ! इथं बंद होत नाहीत पण बऱ्याच गोष्टींवर बंदी मात्र आहे. सगळ्यात पहिली बंदी म्हणजे ‘प्लास्टिकबंदी’. इथं संपूर्ण प्लास्टिकबंदी आहे आणि ती सर्वत्र प्रामाणिकपणे आमलात आणली जाते.

भूतानमध्ये सार्वजनिक जागेवर धुम्रपानास बंदी आहे. बिडीकाडी वाल्यांसाठी विशिष्ट जागा दिल्या आहेत. तिथं जाऊनच आपली फुकनी फुकायची. एवढंच नाही तर तंबाखूची लागवड, काढणी आणि विक्रीवरही बंदी आहे. तंबाखू फक्त आयात होते आणि त्यावरही भरभक्कम टॅक्स लावले जातात. एखाद्या फुकणीच्याने जर हा नियम मोडला तर मात्र त्याला ३ ते ५ वर्षांची सजा होऊ शकते.

इथली अहिंसक बंदी म्हणजे, कोणत्याही पक्षी किंवा प्राण्याला मारायला इथं बंदी आहे. बुद्धांच्या शिकवणीनुसार प्राण्यांना मारणे वर्ज्य असल्याने हा निर्णय घेतला गेला. इथं तर मोठ्या प्रमाणात मांस खाल्लं जात! मग हे मांस येतं कुठून हा प्रश पडला? तेव्हा कळलं कि, भूतान हे सर्व मांस आयात करतो. पण सरकार पूर्णपणे मांसभक्षणावर  बंदी आणायचा विचार करतय असं समजलं.  म्हणजे, ना राहेगा मांस और ना करेंगे मांसाहार.

अजून एक अनोखी बंदी इथं आहे ती म्हणजॆ चढाईबंदी. १९८७ नंतर भूतान ने देशातील पर्वतांवर चढाईबंदी केली. त्यामुळे जगात कधीही सर न केला गेलेला  ‘गांखार पुइंसूम’ पर्वत, हिम्मत असेल तर चढून दाखवा असं म्हणत दिमाखात उभा आहे. 

इतर सर्व बाबतीत पहिला नंबर असणाऱ्या या विद्यार्थ्यांचा नंबर, एका बाबतीत मात्र सर्वात शेवटी लागतो. भूतान जगातील सर्वात शेवटी टीव्ही चा स्वीकार करणारा देश ठरला. सखा शेजारी भारतात १९५९ मध्ये काड्यांचा अँटेना मिरवत कृंषधवल वळवळणाऱ्या मुंग्यांचा टीव्ही अवतरला. पण मुंग्यांची ही साथ भूतानमध्ये पोहोचायला पुढची चाळीस वर्ष गेली. १९९९ मध्ये इथं पहिल्यांदया टेलिव्हिजन आला. या इडियट बॉक्स मुळे देशातील सांस्कृतिक वातावरणावर विपरीत परिणाम होतील अशी त्यांना भीती होती. 

माझी बुलेट तर या देशातून नाराजीने का होईना, पण बाहेर पडतेय. पण जाताजाता इथं पोहोचायचा मार्ग तुम्हाला सांगून जातोय. पृथ्वीवरील या स्वर्गात जायचं कसं? रस्त्याने जायचं असेल तर गेलेफु, साम्द्रूप जोंखार आणि जयगाव अश्या तीन ठिकाणांतून प्रवेश करता येतो. पण सर्वांना जयगाव जास्त सोयीचं पडतं.  विमानाने जायचं असेल तर एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘पारो’ ला जायचं. पारो हे तसं धोकादायक विमानतळ म्हणून गणलं जातं. त्यामुळे फक्त ८ पायलट ना इथून उड्डाण करायला परवानगी आहे. हो आणि आमच्यासारखं मोटरसायकल ने जायचं असल्यास, सरळ सिलिगुडीमार्गे जयगाव ला पोहोचा, बॉर्डर वर आरटीओ ची परवानगी घ्या आणि बुंगाट बाईक चालवत या आनंदी देशात आनंदाने फिरा. महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीयांना इथं व्हिजा ची गरज नाहीये. इतर देशातील लोकांना भूतानमध्ये फिरण्यासाठी दररोज १८००० रुपये मोजावे लागतात. पण आपल्यासाठी ते चाकटफू आहे. तेव्हा उचला बॅग आणि लावा पाठीला! ऑल द  बेस्ट !

 

5 thoughts on “जगातील आनंदमयी स्वर्गाचा निरोप!”

  1. अतिशय अभ्यासपूर्ण लेख आणि उत्तम ओघवती भाषा शैली.

  2. साध्या आणि सोप्या शब्दात मांडलेलं हे प्रवास वर्णन मनाला भावतं. भूतानच्या संस्कृतीतील बारीकसारीक गोष्टींची खूप छान माहिती मिळाली दिली आहे.

  3. आपल्यामुळे भूतान देशाविषयी नवीन चांगली माहिती मिळाली.

  4. खूपच छान ! आपल्या देशाचे जेवढे प्रधानमंत्री झाले त्यांनी प्रथम कोणत्या देशाला भेट दिली असेल तर तो देश म्हणजे भूतान होय! या देशाबद्दल माहिती मिळवण्याची उत्कंठा होती आपण दिलेली माहिती खूपच छान व सुंदर आहे त्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद !

Leave a Reply to Dinesh Waghmode Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

थायलंडचे साखर सम्राटथायलंडचे साखर सम्राट

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 26 Jun , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ थाकसिन विद्यापीठातील चर्चा आता रंगलीय. अजून एक गरमागरम ‘ग्रीन टी’ चा कप

थाई विद्येचं पिठ !थाई विद्येचं पिठ !

Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers. Date: 12 Jun , 2021 Published by: अग्रोवन डॉ. सतीलाल पाटील 0९९२२४५९७८४ रस्त्यावरचे गिचमिड थाई फलक वाचण्याचा अयशस्वी प्रयत्न करत माझा दुचाकी प्रवास

भाग-५: अ-विश्वासभाग-५: अ-विश्वास

भाग ५ : अ-विश्वास डोळ्यावर काळाकुट्ट अंधार पसरला होता. वातावरणात स्पिरिटचा मंद दर्प रुंजी घालत होता. लांबवर कुठेशी हळू आवाजात कुजबुज ऐकू येत होती. आपण नेमके कुठे आहोत हे  रावसाहेबांना